आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atish Nagpure's Artical On Hindu Muslim Community Relation

माझ्या पिढीचं वृत्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1992-93ची गोष्ट. त्या वेळी मी कदाचित तिसरीत असेन. बाबरी मशिद नुकतीच उद्ध्वस्त करण्यात आली होती. मुंबई आणि देशभरात अनेक ठिकाणी दंगली सुरू होत्या. माणसांच्या कत्तलींच्या बातम्या दररोज कानावर पडत होत्या. अमुक ठिकाणी इतके हिंदू मारले गेले, तमुक ठिकाणी इतक्या मुसलमानांचा बळी गेला... या सर्व बातम्यांमुळे काही काळ मनाचा थरकाप उडत असला, तरी तो काळ माझ्यासारख्या शाळकरी मुलासाठी मजेशीर असाच होता. शाळेला अचानक सुट्टी मिळायची. अभ्यासाचा खोळंबा झाल्याने ‘यंदा सरकार सगळ्यांना पास करणार’ असं उडतउडत कानावर यायचं. इतर अफवांशी माझं तसं काही घेणं-देणं नव्हतं; पण या अफवेमुळे मनाला अगदी आनंद वाटायचा. अभ्यास न करण्याचा बहाणाही मिळाल्याने मी आणि माझ्या मित्रांची अगदी धम्माल होती.
त्या काळी मी मुंबईतील एका झोपडपट्टीच्या वस्तीत राहायचो. या हिंदूबहुल वस्तीत काही मुस्लिमांचीही घरं होती. दंगलीच्या काळात हिंदूंनी वेचून वेचून मुस्लिमांची घरं फोडली, घरातील सामान लुटलं. अखेर जिवाच्या भीतीने या कुटुंबांनी तेथून पळ काढला. त्या काळात मी मित्रांसोबत ही फोडलेली घरं पाहायला जायचो. ते सारं बघताना मनाला वाईट वगैरे अजिबात वाटायचं नाही. त्या वेळी माझ्यात आणि माझ्या पिढीत आजूबाजूच्या परिस्थितीने विद्वेष भरला होता. (जसा तो माझ्यासारख्या हिंदू बालमनात होता, तसाच तो कदाचित मुस्लिम मुलांतही असेल) खरोखरीच माझी अख्खी पिढी विद्वेषावरच उभी आहे का?
तेव्हाचा एक प्रसंग अंधुकसा का होईना, मला आजही आठवतोय. रात्रीचे दीड वाजले असावेत. आई, ताई झोपली होती. मला झोप लागत नसल्याने मी जागाच होतो. तितक्यात गल्लीच्या कोप-यावर एकच आरडाओरड सुरू झाली. ‘पकडो साले को...’, अशा आशयाचे शब्द कानावर पडले. खिडकीचा पडदा हलकासा बाजूला सारून मी बाहेर पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. तितक्यात आईने हटकलं आणि मी मागे झालो. काही काळ भेदरलेल्या अवस्थेत आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. बाहेर किंकाळ्या ऐकू आल्या. नेमकं काय घडलं ते कळलं नाही. पण काहीतरी अघटित घडलं होतं, एवढं नक्की. त्यानंतर आम्ही सर्व जण झोपायचा प्रयत्न करत नुसते पडून राहिलो. पहाटेपर्यंत मला झोप लागली. सकाळी उठल्यावर त्या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू होती. पण या घटनेमुळे कुणाचंही मन हेलावलं नव्हतं. हल्ला झालेला मनुष्य मुस्लिमांचा खब-या होता; त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली, अशीच बहुतेकांची प्रतिक्रिया होती. त्या लहान वयातही किती हिंदू आणि किती मुस्लिम मारले गेले, हे जाणून घ्यायला आम्हाला आवडायचं. किंबहुना, कुठे मुस्लिमांवर हल्ला झाला तर ‘बरंच झालं, त्यांच्याबरोबर असंच केलं पाहिजे’, असं आम्ही मुलं म्हणायचो. मुस्लिमांना मारल्याची बातमी कानावर पडली, की अभिमान वाटायचा. छाती पाव सेंटिमीटरने तरी फुगायची. किती मोठी विकृती त्या लहान वयातच सभोवतालच्या परिस्थितीने माझ्यात आणि माझ्या पिढीत निर्माण केली होती. पुढील काही महिन्यांत दंगली थांबल्या. शहरात शांतता प्रस्थापित झाली. हळूहळू शहर पूर्ववत होऊ लागलं. पण खरोखरच त्या घटनेनंतर मुंबई शहर आणि हा देश कधी पूर्वपदावर येऊ शकला का? का तो तिथेच थांबलाय, मनामनांत विद्वेषाची बीजं रोवून? माझ्या पिढीच्या मनावरील धूळ अजूनही उडालेली आहे का? गतकाळात रुजलेल्या पूर्वग्रहांतून ती बाहेर आलीय का?
विशिष्ट प्रकारच्या सामाजिक-राजकीय स्थितीमुळे माझी पिढी ‘माणूस’ म्हणून कमी आणि प्रामुख्याने हिंदू आणि मुस्लिम म्हणून वाढली. नंतरच्या काळात तिच्यावर उदारीकरणाचे संस्कार झाले. पण त्याला वैचारिक पाया नसल्याने ते तसे वरवरचेच होते. कदाचित म्हणूनच गुजरातमध्ये दंगली होताच माझ्या पिढीतील बहुतेक हिंदू तरुणांची मनं सुखावली आणि तेव्हापासूनच नरेंद्र मोदींसारख्या ‘कणखर’ व्यक्तीने देशाचं नेतृत्व करावं, असं त्यापैकी बहुसंख्यांना मनोमन वाटू लागलं. मोदींनीही हुशारीने त्यावर ‘विकास पुरुषा’चा मुलामा चढवला. त्यामुळे मोदींनाच नव्हे, तर माझ्या पिढीलाही त्यांचं हे नवं रूप सोयीचं वाटलं. कारण असं झाल्याने जातीयवादी असल्याचा शिक्का माझ्या पिढीवर बसणार नव्हता आणि विकासाच्या मुखवट्याआड त्यांच्या मनातील जातीयवादी कोपराही सुखावणार होता. मी इथे उल्लेख करत असलेली माझी पिढी म्हणजे, माझ्यापेक्षा वयाने दहा वर्षे मोठी व तितक्याच वर्षांनी लहान असलेली पिढी. कारण बाबरीचा विषय तसा 80च्या दशकातच सुरू झाला होता आणि दुर्दैवाने त्यामुळे निर्माण झालेली धर्मांध मानसिकता आजही मूळ धरून आहे. किंबहुना तिला आता पालवी फुटली असून येत्या काळात तिच्या बहराची शक्यता नाकारता येत नाही.
माझ्या पिढीकडे येईपर्यंत या देशाचे सगळे दीपस्तंभ समज-गैरसमजांमुळे काळवंडून गेले होते. ज्यांनी या देशाचा पाया रचला, ते सर्व माझ्या पिढीसाठी देशाचे प्रमुख खलनायक ठरले होते. गांधींमुळे देशाची फाळणी झाली, नेहरूंनी मुस्लिमांना लाडावून हिंदूंवर अन्याय केला आणि बाबासाहेबांनी आरक्षण देऊन देशाच्या प्रगतीत अडसर निर्माण केला, असे दावे पटवून दिले जात होते. कदाचित बाबासाहेबांविषयी उच्चवर्णीयांमध्ये असलेल्या द्वेषामुळे तीव्र आंबेडकरविरोध देशात सुरुवातीपासूनच होता. पण गांधी आणि नेहरूविरोध यापूर्वी कधीही आजच्याइतका तीव्र असेल, असं मला वाटत नाही.
उदारीकरणामुळे माझ्या पिढीने वेगवेगळी वेष्टणं धारण केली आहेत; पण तिच्या आतमध्ये एकाच प्रकारचा मसाला भरलेला आहे. म्हणूनच अतिश्रीमंतापासून ते एकवेळच्या जेवणाची भ्रांत असलेलाही बापूंच्या आहारी जातो, धर्मांधांच्या नादी लागतो. जितक्या सहज वैज्ञानिक विचार उचलून धरतो, तितक्याच सहजपणे अंधश्रद्धांचं उदात्तीकरण करतो. माझ्या संपूर्ण पिढीतच ही हतबलता का आली आहे? अनेकदा ही संपूर्ण पिढी एकाच पद्धतीने विचार करते. किंबहुना ती माध्यमप्रेमी असून लोकप्रियतेच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट जोखते. त्यामुळेच एखादा नवीन प्रवाह निर्माण होताना दिसत नाही. असला तरी तो इतका क्षीण, कमकुवत असतो, की तो दिसण्यातही येत नाही. ज्ञानाच्या महाजालात अडकलेल्या माझ्या पिढीजवळ स्वतंत्र विचार नाही का, असा प्रश्न मनात निर्माण होतो.
माझ्या पिढीच्या या अवस्थेसाठी आम्ही पूर्णपणे जबाबदार नाही. यासाठी जबाबदार आहे, ती यामागची परिस्थिती आणि आमच्या आधीची पिढी. पण आता क्षण कसोटीचा आहे. लवकरच देशात लोकसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. आणि माझीच पिढी या देशाचं भवितव्य ठरवणार, असा दावा केला जातोय आणि त्यात तथ्यही आहे. त्यामुळेच आता तरी माझ्या पिढीने स्वचिकित्सा करण्याची, स्वत:ला काही मूलभूत प्रश्न विचारण्याची गरज आहे. काहींच्या मते, आंबेडकर-गांधी-नेहरू या त्रयींकडून ऐतिहासिक चुका झाल्या असतील; काहींना त्या घोडचुकाही वाटत असतील; पण आपल्याला स्वातंत्र्य, समता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि तितकाच महत्त्वाचा शास्त्रीय विचार यांसारखी मूल्यं देणा-या या महापुरुषांचं महत्त्व त्यामुळे कणभरही कमी होत नाही. हिंदू राष्टÑवाद, जातीव्यवस्था या मानसिकतेतून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पूर्वग्रहांतून बाहेर येणं हे माझ्या पिढीसमोरील प्रमुख आव्हान आहे. समोर येणा-या प्रत्येक माहितीची चिकित्सा करणं, त्याचा विविध अंगाने खुलेपणाने अभ्यास करणं, अजाणतेपणे बनलेल्या मतांना पुन्हा एकदा तपासून पाहणं, ही आज माझ्या पिढीची सर्वात मोठी गरज आहे.
उदारीकरणाचा सर्वाधिक प्रभाव माझ्या पिढीवरच झाला. पण तरीही विचारांमध्ये मोकळेपणा येऊ शकला नाही. अंबानींच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘गुरू’ सिनेमाला यशस्वी करणारी माझी पिढी अण्णांच्या आंदोलनात सहभागी होते, तेव्हा क्षणभर गोंधळायला होतं. माझ्या पिढीने देशातील सर्व आंदोलनं, चळवळींचा इव्हेंट केला. खरं तर आयुष्यच एक इव्हेंट असला पाहिजे; पण त्याला आशय असावा. आशयसंपन्नता असावी. असं झालं तरच दोन-एक दशकांनंतरच्या पिढ्यांना, अपराधी भावनेनं ‘माझ्या पिढीचं वृत्त’ लिहावं लागणार नाही.
a5nagpure@gmail.com