आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधी सरळ प्रेमाची गोष्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटाच्या पोस्टरवर असलेल्या टॅगलाइनशी इतका प्रामाणिक चित्रपट एखादाच असावा. ‘प्रेमाची गोष्ट’च्या पोस्टरवर लिहिलेले आहे, ‘साधी सरळ’ प्रेमाची गोष्ट. आणि चित्रपटही खरोखरच तसाच आहे. फारसे ताणतणाव, वळणे, धक्के, इमोशनल अत्याचार काहीही नसलेली ही प्रेमाची गोष्ट. अतुल कुलकर्णीची पहिलीवहिली रोमँटिक भूमिका आणि अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या सागरिका घाटगेचे मराठी पदार्पण, हे या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीतले महत्त्वाचे घटक.

चित्रपटाची गोष्ट अगदी आजची. मध्यमवर्गीय सुशिक्षितांमध्ये चाळिशीच्या नंतर घटस्फोटांचे प्रमाण वाढते आहे, या वस्तुस्थितीला धरून असलेली. लग्नाला काही वर्षे लोटल्यानंतर एकमेकांपासून फारकत घेऊ इच्छिणारी दोन जोडपी. राम (अतुल कुलकर्णी) - रागिणी (सुरेखा तळवलकर) आणि समित (अजय पूरकर) - सोनल (सागरिका घाटगे). रामला आणि समितला लग्न टिकवायचंय. रागिणी परत येईल म्हणून राम वाट पाहतोय. तो अगदी आदर्श, समजूतदार वगैरे आहे. समितलाही लग्न मोडायचं नाहीये. पण सोनलला स्पष्ट कळत नाहीए, काय करायला हवं ते. अशा परिस्थितीत राम आणि सोनल कामाच्या निमित्ताने एकत्र येतात, प्रेमात पडतात. चित्रपटाची गोष्ट पुढे काय होतं, यापेक्षा कसं कसं होतं याची जास्त आहे.

राम चित्रपटाची गोष्ट लिहिणारा. त्याच्या ओरिजिनल गोष्टीवर कोणी चित्रपट काढायला तयार नाही, म्हणून दाक्षिणात्य चित्रपटावर आधारित गोष्ट लिहून देणारा. रागिणी अभिनेत्री, यशाची घाई असलेली. रामचं इंडस्ट्रीत काही खरं नाही म्हणून त्याला सोडून देणारी. पण रामचा पक्का विश्वास आहे, की ती परत येईल, तो तिला वेळ द्यायला तयार आहे. सोनल काय काम करायची ते स्पष्ट होत नाही; परंतु आक्रमक नव-यापासून लवकरात लवकर सुटका हवी, अशी इच्छा असणारी.
रामच्या ऑफिसात त्याची सेक्रेटरी म्हणून ती काम सुरू करते आणि त्याच्या प्रोत्साहनाने लिहिण्यात मदत करणारी असोशिएट होते. ती तिच्या मैत्रिणीच्या- मीराच्या घरी राहतेय. समितला बायकोने आपल्याला घटस्फोट द्यावा, या गोष्टीची चीड असावी, असे वाटते. त्याचा पुरुषी अहंभाव डिवचला गेलाय.

आजूबाजूची पात्रंही खूप स्पष्ट लक्षात येणारी. रामची आई (रोहिणी हट्टंगडी) आहे, एखाद्याच वाक्यातून किंवा भुवईच्या हालचालींतून रागिणीविषयीचा राग दाखवणारी. रामचा आल्टरइगो असलेला त्याचा मित्र स्वराज (सतीश राजवाडे) आणि सोनलचाच आल्टरइगो असलेली तिची मैत्रीण मीरा (मीरा वेलणकर). स्वराज आणि मीरा सतत राम आणि सोनलला त्यांच्या मनातल्या खळबळीची स्पष्ट जाणीव करून देतात. या महत्त्वाच्या पात्रांमध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल, रामची अ‍ॅक्टिवा नि त्याच्या हेल्मेटचा, कॉफीचा आणि चहात बुडवून खाल्ल्या जाणा-या खारीचा.

चित्रपटातले संवाद अतिशय ताजे, कुरकुरीत. फेसबुकच्या लाइक्सची भाषा बोलणारे. शब्दबंबाळ अजिबात नव्हेत. त्यातला अर्थ कळून प्रेक्षकाला हसायला लावणारे, क्वचित टाळ्याही घेणारे. उदा. ‘लग्न म्हणजे रोमिंग फ्री आणि लोकल कॉलला पैसे पडतात...’ ‘तू प्रेमाची गोष्ट लिहितोस चांगली, पण ती तुला जगता येत नाही.’ ‘तुझी बुद्धी आणि मन सतत भांडत असतात, आणि त्यात कायम बुद्धी जिंकत आलीय.’

चित्रपटाचा शेवट काय होणार, यापेक्षा काय व्हावा, असं प्रेक्षकाला मध्यंतरानंतर वाटू लागलेलं असतं, ही जमेची बाजू. पठडीतला मराठी चित्रपट असता तर कदाचित शेवट प्रचलित, सामाजिक अपेक्षांना धरून झालाही असता; पण या चित्रपटाचे वेगळेपण त्याच्या शेवटातही आहेच. खेरीज रेड लेबल चहाची चित्रपटाच्या कथेचा भाग म्हणून येणारी जाहिरात हा ब्रँडिंगचा प्रयोग मराठीत ‘प्रेमाची गोष्ट’मुळे आला तर तो मराठी चित्रपटांना पैसे मिळवून देणारा ट्रेंड ठरू शकतो.
सोनलचे कपडे अगदी तुम्हीआम्ही वापरतो तसे, रामच्या आईच्या साड्या आपली आई नेसते तशा. रागिणी चित्रपट व्यवसायातली म्हणून थोडीशी ग्लॅमरस. एकदम बिलिव्हेबल. मार्टिन्स हे इराण्याचे हॉटेल. दीर्घकाळ डोक्यात घुमत राहणारे कैलास खेरचे गाणे, साजणा... हे ठळक लक्षात राहिलेले चांगले मुद्दे. जेमतेम दोन तासांचा चित्रपट पाहताना कंटाळा तर येत नाहीच, पण खूपसा चित्रपट आपल्याला स्वत:ला कसा लागू पडतोय, हे जाणवत राहते.

रामला प्रेमाची गोष्ट इतकी छान लिहिता येते की, ती वाचून कुणीही प्रेमात पडू शकतं, पण ते प्रेम तो ना रागिणीजवळ व्यक्त करू शकलेला असतो, ना सोनलजवळ. सोनल रामच्या प्रेमात पडली आहे, तिला ते माहीत आहे; पण रामच्याच या स्वभावामुळे नक्की काय करावं, या संभ्रमात पडलेली. समित टिपिकल नव-यासारखा, सोनलने परत यावंसं वाटणारा, पण ती जशी आहे तसं तिला स्वीकारता न येणारा, प्रसंगी हातही उगारणारा. रागिणी त्यातल्या त्यात स्पष्ट आहे, राम का आवडेनासा झाला आणि परत का त्याच्या जवळ जावंसं वाटतंय, हे कळून चुकलेली. तीच चित्रपटाला त्याच्या नेमक्या
शेवटाकडे घेऊन जाते. ही अशी पात्रं आपल्या सभोवती दिसणारी, वावरणारी.

कुठलीही मनाला भिडणारी कथा, कविता, गोष्ट लिहिणा-याच्या अनुभवविश्वाला ओलांडून जात नाही, ती 100 टक्के कल्पनाशक्तीचा आविष्कार नसते. त्यातली पात्रं कुठे ना कुठे भेटलेली असतात, जशीच्या तशी नाही तरी काही अंशी नक्की, असं मानणा-यांना ‘पे्रमाची गोष्ट’ हा पुरावा म्हणावा का? सोनल तिचा पहिलावहिला सीन लिहिते, त्यात ती तिच्या रामबद्दलच्या भावना जशाच्या तशा शब्दांत मांडते. चहात बुडून गेलेल्या खारीच्या पापुद्र्यासारखी तुझ्यात मिसळून गेलेय, असं तिची नायिका म्हणते, तेव्हा रामबरोबर खाल्लेल्या खारीची आठवण प्रेक्षकांनासुद्धा येतेच.

या दोन्ही जोडप्यांना ( प्रेक्षकांच्या नशिबाने) मूल नाही. पटकथेची सोय होते, खेरीज त्यामुळेच चित्रपटात इमोशनल अत्याचार नाही. पण यातून मनोरंजनाखेरीज चोख हाती काय लागतं? तर दुस-याचा विचार केला पाहिजे, त्याला थोडा वेळ दिला पाहिजे, त्याचबरोबर स्वत:चाही विचार जाणूनबुजून केला पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, ही विचारसरणी. अभिनय, दिग्दर्शन, संगीत, नेत्रसुखद छायाचित्रण आणि संवाद अशा या पे्रमाच्या गोष्टीच्या जमेच्या बाजू. मराठीत असे सगळे योग जुळून येणा-या चित्रपटांची संख्या फारशी नसते, त्यामुळे त्याचे स्वागत करायला हवे.
mrinmayee.r@dainikbhaskargroup.com