आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटक माझा प्राण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाटक आपल्याला वेडेपणा करण्याचं स्वातंत्र्य देतं. तिथे गेल्यावर काय येतं, हे दाखवण्यापेक्षा काय येत नाही, हे दाखवणं महत्त्वाचं ठरतं... नाशिकमध्ये नुकतीच कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या रंगमंचावर ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, रंगकर्मी अतुल पेठे यांची प्रथमच जाहीर मुलाखत रंगली. त्या मुलाखतीवर आधारित हे मनोगत...

मला लहानपणी प्रचंड न्यूनगंड होता. दहावीपर्यंत नाटकाशी काहीही संबंध नव्हता. शाळेचा प्रचंड राग होता. घरच्यांसाठी शाळेत जायचे, म्हणून जायचो. मठ्ठगोळा वगैरे नव्हतो; पण ते चौकटीतलं शिक्षण, जगणं मला कधी भावलंच नाही. त्यातही मी पुण्यात शनिवारपेठेत राहायचो. या शनिवार पेठी संस्कृतीची तर, मला अआजही प्रचंड चीड आहे. यामुळेच मला माझ्या बाबांचाही प्रचंड राग होता. मग काही वर्षांनी आम्ही, कोथरूडला राहायला गेलो. इथेही काही वेगळी संस्कृती नव्हती. पण त्यातल्या त्यात मी जरा तरी, रमायला लागलो होतो. कोथरूडच्या अभिनव विद्यालयातच आपण कविता लिहू शक्तो, याचा साक्षात्कार झाला. आता इयत्ता आठवत नाही, पण आंतरशालेय नाट्य स्पर्धा होती. मला बाईंनी विचारलं की, करशील का काम? मला प्रचंड वेगळं काहीतरी वाटलं. मी कविता लिहायचो, बोलणं, वगैरे तर आपलं एकदम फाडफाड वक्त्यासारखं. बाईंनी म्हणून आपल्याला विचारलं असेल, असा विचार करून, मीही त्यांना "हो' म्हटलं. स्पर्धा झाली, आणि त्या स्पर्धेत मला अभिनयाचे पहिले पारितोषिकही मिळाले. तिथे मला दिशा सापडल्यासारखी वाटते.

मग मला माझे काका शिशूरंजन या संस्थेत घेऊन गेले. मी तर त्या संस्थेत भारावूनच गेलो होतो. मी तिथे जवळजवळ रोजच जो विषय येईल, त्यावर नाटक लिहायचो. (मिश्कीलपणे हसत)अर्थात त्याला किती अर्थ असायचा, हे आज मला कळतंय. पण, नाटक रक्ताच्या थेंबाथेंबात भिनत चाललंय, हे मला कळू लागलं होतं. माझे आजोबा अनंत हरी गद्रे, जे २५व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते, त्यांच्या नाट्यक्षेत्रातील वावरामुळे आमच्या घरी नाटकाचे फुकट पास अनेकदा येत. मग आई-बाबा, मला नाटक बघायला घेऊन जात. पुढे कॉलेजला गेलो. अनेक एकांकिका लिहिल्या. पण, इथे एक गंमत अशी लक्षात आली की, हे नाटकात काम करणं, लिहिणं हे काम काही स्कॉलर पोरांचं नाहीच. त्यांना हे जमूच शकत नाही, यावर माझा आजही विश्वास आहे. त्यासाठी थोडं उडाणटप्पूच असलं पाहिजे. त्याच काळात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आली हाहोती. ती स्पर्धा मी गाजवली. "चेस' ही एकांकिका मी लिहिली होती. लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी सगळी पारितोषिकं फक्त मला मिळाली आणि अतुल पेठे अनेकांना माहीत झाला.
शिशूरंजनचा पुढचा टप्पा म्हणजे, थिएटर अकॅडमी. मी थिएटर अकॅडमीत जायला लागलो. इथे तर नाटकाविषयीचा खजिनाच होता. इथे खरी जडणघडण झाली. अस्तित्वाला धुमारे फुटले. या प्रक्रियेत दिग्गज कलाकार होते आणि अखंड चर्चा होती, ती नाटकाची. तेव्हाच कुठेतरी मनाशी खूणगाठ बांधली होती की, बस्स... आपल्याला असंच या लोकांसारखंच व्हायचं. हे डोक्यात ठेवूनच मग मी नाटकाचं काम करत राहिलो, आणि करतोय.

नाटकाचे हे वेड माझे एक व्यसनच झाले. नाटक... नाटक... आणि नाटकच... या पलीकडे काहीच नाही. यामुळे मात्र आधी आई-वडील घाबरायचे. पण नंतर अनेक बक्षिसे मिळायला लागल्यावर त्यांनाही बरं वाटलं. असं सगळं उत्तम सुरू असतानाही माझ्या मनात मात्र नेहमी एकच प्रश्न येत असे की, जगण्याचा अर्थ काय? कशासाठी सुरू आहे ही प्रत्येकाची धावपळ, पळापळ... तेव्हा उदास, नैराश्य, भीती, दहशत वाटायची. मधल्या काळात मला जरा एकाकीपणाही आला होता. पण, हा एकाकीपणाच खूप काही शिकवून जातो. तेव्हाच मला कळलं की, आपल्याला हवं तसं नाटक करायचं असेल आणि कोणाच्या तालावर नाचायचं नसेल, तर आपल्याला नोकरी वा छोटा व्यवसाय करण्यावाचून पर्याय नाही. त्याच्या आधीची एक गंमत सांगतो. मी एस.वाय. बी.कॉम.ला होतो. नंतर काय मी घर जवळजवळ सोडूनच दिलं होतं. पण शिक्षण पूर्ण केलं नाही, हे घरी सांगितलं नव्हतं. घरी थापच मारलेली होती. शिक्षणात-बिक्षणात रमणारा मी नव्हतोच. त्याच वेळी विजयाबाई काहीतरी नाटक करत होत्या. मी त्यांच्याकडे गेलो. ते नाटक पुढे झालंच नाही. पुन्हा पुण्यात आल्यावर मात्र मी एका मुलीच्या प्रेमात पडलो. अर्थात तीही... तिचे वडील म्हणजे माझे सासरे शेतकरीच होते, तिकडचे निऱ्याचे, बारामतीचे. माझ्या मनात प्रश्न की, आपण काही करत नाही, नाटक हा काही उदरनिर्वाहाचा धंदा नाही, तरीही ही माझ्या प्रेमात पडलीच कशी आणि तिच्या वडिलांनी आपल्याशी तिला लग्न करण्याची परवानगी दिलीच कशी. पण, ते बरेच आजारी होते. मी आपला पहिल्यापासूनच समाजसेवी, कोणालाही मदत करायचो. मी त्यांची खूप सेवा करायचो. ते तिचे बाबा म्हणून नाही, तर माझ्या स्वभावातच अशी सेवाबिवा करणं आहे. त्या वेळी न राहवून मी त्यांना विचारलंच की, मी काही करत नाही, नाटक... नाटक... धरून बसतो, तरी तुम्ही मला जावई म्हणून का स्वीकारता? तेव्हा त्यांनी एक सुरेख उत्तर दिलं, ते मी कधीच विसरू शकत नाही. ते म्हणाले की, ‘हे बघ पोरा, मी शेतकरी आहे. जमिनीची मशागत करणं, बी पेरणं माझं काम. एकदा का पाऊस पडला की, माझं काम संपलं. मग पेरलेलं बी आपोआप अंकुरतं. तुझंही तसंच आहे, फक्त पाऊस पडण्याची वाट आहे.’ कधीही न रडणारा मी, त्या दिवशी मात्र डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

आपल्याला उत्तम नाटक करायचं असेल तर आपण पैसेही कमावले पाहिजे, हे जेव्हा लक्षात आलं; तेव्हा नोकरी किंवा छोटासा व्यवसाय आपल्याला करावा लागेल, याला पर्यायच नाही, हे कळलं आणि मी नोकरीचा मार्ग स्वीकारला. नोकरीत जे पैसे मिळायचे, ते सगळे मी नाटकात घातले. किंबहुना, मी नोकरीच नाटकासाठी केली. नाशिकला मुक्त विद्यापीठात नोकरी केली. या विद्यापीठातील माझे सहकारीही खूप चांगले होते. नाशिकमध्ये तर आम्ही नाटकाची धम्माल केली. ते दिवस कधीच विसरता येणार नाहीत. म्हणूनच तर मी पुण्याचा असूनही, माझी आजही अनेक ठिकाणी ओळख ही ‘मी नाशिकचा’ अशीच सांगितली जाते, ती मला प्रिय आहे.
आम्ही कुठेही तालमी करायचो, रस्त्यावर तालीम केलेली मला आठवते. कालिदासच्या (कालिदास कलामंदिर) बाहेर, प.सा.च्या (परशुराम साईखेडकर नाट्यगृह) बाहेर, असं कुठेही नाटक करायचो आणि कुठेही हॉल मिळो तिथे जाऊन ते नाटक सादर करायचो. पैसा हा गौण होता. बस एक धम्माल होती. मला अनेक जण आजही विचारतात की, तुमची नाटकं वेगळ्या धाटणीची असतात. तर, मला हे नक्कीच सांगावंसं वाटतं की, नाटकातून पैसे मिळवणं हा हेतू चुकीचा नाही. त्यातही अनेक प्रयोग झालेच की. ‘तो मी नव्हेच’ नाटकामध्ये पहिला फिरता रंगमंच आला. माझ्या लेखी नाटक कधी आशयानुदानी, तर कधी अंतरानुदानी असतं. नाटकात अपयश असलं पाहिजे. मला जे करायचं, ते अभिव्यक्त होता आलं पाहिजे. मरेपर्यंत कलाकार नाटक करतात तरी त्यांना नाटकाची व्याख्या करता येत नाही, एवढा मोठा हा विषय आहे. पण, एक आहे; इथे मी-तू पणाची बोळवण होते.’ मी कधी संस्था काढली नाही. कारण संस्था काढली की, तिचे संस्थान होते आणि संस्थानिक तयार होतात. पण, एक नक्की सांग्तो की, जे अस्सल असतं ते नाटकात असतं, बाकी सगळं टीव्हीवर. म्हणूनच नाटक माझा प्राण आहे. किंबहुना माझा कण अन‌् कण नाटक आहे, क्षण अन‌् क्षण नाटक आहे.
(atulpethe50@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...