आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atul Pethkar Article About Ghuman Sahitya Sammelan

पंजाबी दिलदारीचा घुमानोत्सव !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबला गेल्यावर आठवणीने पाहायचे स्थळ म्हणजे, सुवर्ण मंदिर आणि जालियनवाला बाग. त्या पलीकडे पंजाबात काही पाहायचे असते, हे कोणाच्या गावी असायचे कारण नाही. पण ३ ते ५ एप्रिल दरम्यान पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील घुमान येथे पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनानंतर त्यात आणखी एका स्थळाची भर पडली आहे- ‘बाबा नामदेव यांचे घुमान’. या संमेलनाच्या निमित्ताने घुमानचे नाव संपूर्ण देशात पोहोचले आणि घुमानचा कायापालट होण्यासही सुरुवात झाली. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी घुमान विकास प्राधिकरणाची स्थापना केली. ‘अगली बार आओगे तो घुमान पुरा बदला हुआ नजर आयेगा’, असे सांगितले. पंजाबी आणि मराठी माणसे मुळातच रांगडी; पण दोघांचीही मने मातीच्या मऊ ढेकळासारखी. नामदेवांनी सातशे वर्षांपूर्वी विणलेली मराठी संस्कृतीची ओळख मधल्या काळात तुटल्यासारखीच होती. घुमान साहित्य संमेलनाने ही आेळख नव्याने जोडली. पंजाब व महाराष्ट्राला एक नवे अवकाश मिळवून दिले.

राजकारण्यांचा साहित्याच्या व्यासपीठावरील वावर हा कायम वाद आणि चर्चेचा विषय. घुमान येथेही राजकारणी होतेच; परंतु एक काळ असाही होता, जेव्हा साहित्यिकांची लोकप्रियता अमाप होती. इतकी, की राजकारण्यांच्या सभांना गर्दी व्हावी, म्हणून साहित्यिकांना आदर आणि आग्रहाने बोलावले जात असे. आज साहित्यिकांच्या कार्यक्रमांना गर्दी व्हावी आणि ग्लॅमर यावे, म्हणून राजकारण्यांना बोलावले जाते. हे बदललेले वास्तव साहित्यिकांनी आणि यावरून नाहक चर्चा करणार्‍यांनी स्वीकारले पाहिजे. पूर्वी कला, साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उदार लोकाश्रय होता. तो आपण का गमावला, साहित्यिकांची उंची कमी झाली की राजकारण्यांची वाढली, याचाही विचार झाला पाहिजे. संमेलने आता इव्हेंट झाली आहेत. संमेलनांचे खर्च निवडणूक खर्च मर्यादेसारखे झाले आहे. संमेलन असो वा निवडणूक. ते २५ लाखांत कधीच होत नाही. कोट्यवधींच्या घरात संमेलनाचा खर्च जातो. अशा वेळी राजाश्रय आवश्यक ठरतो. आणि लोकशाही व्यवस्थेत राजाश्रय फक्त राजकारणीच देऊ शकतात.

घुमानचे संमेलन पंजाब सरकारने शासकीय कार्यक्रम म्हणून जाहीर केले होते. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी जातीने लक्ष घालून तयारीचा आढावा घेतला होता. पंजाब सरकारची यंत्रणा (पंजाब सरकारने संमेलनावर दीड कोटीचा खर्च केल्याचे सांगितले जाते.) अक्षरश: राबत होती. पंजाब सरकार, पंजाबी माणूस आणि स्थानिक घुमानकरांनी संमेलनात कोणतीही कसर ठेवली नव्हती. पंजाब सरकारने अमृतसर ते घुमान हा ५४ किमीचा रस्ताही चकाचक केला होता. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी आता महाराष्ट्रात पंजाबी साहित्य संमेलन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यावर पंजाबी साहित्य संमेलन महाराष्ट्रात घेऊ, असे गडकरींनी सांगितले.

या संमेलनात घोषणांचा गडगडाट होऊन धो धो पाऊसही पडला. अमृतसरच्या गुरुनानक विद्यापीठात संत नामदेव अध्यासन सुरू करण्याची घोषणा प्रकाशसिंह बादल यांनी केली, तर नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात गुरू गोविंदसिंग अध्यासन सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नितीन गडकरींनी घुमान पुणे-हरगोविंदपूर हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला. घुमानला बाबा नामदेव कला-वाणिज्य महाविद्यालय, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संकुलात मराठी दुकानांसाठी स्वस्त दरात गाळे, अशा अनेक घोषणा झाल्या. दरवर्षी मराठी संमेलन पंजाबात आणि पंजाबी संमेलन महाराष्ट्रात व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. एकूणच महाराष्ट्रात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे आंबे मोहाेर गळला, तरी घुमानच्या साहित्य संमेलनात इच्छा आणि आकांक्षांना चांगलाच मोहोर फुटला. या आकांक्षा प्रत्यक्षात येऊन आनंद पूर्तीचा रस रसिकांना चाखायला मिळाला तर संमेलनाचे सार्थक झाले, असे म्हणता येईल...

संत नामदेव हे शिंपी समाजाचे. घुमान आणि पंजाबमध्ये छिबा आणि बावा पंथाचे लोक शिंपी समाजाचे आहे. त्यांची संख्याही निवडणुकीची समीकरणे बदलू शकतील, इतकी मोठी आहे. त्यामुळे २०१७मध्ये होणार्‍या निवडणुकीत संमेलनाचा फायदा राजकारणी करून घेतील, यात वाद नाही. राहिला प्रश्न साहित्य रसिक व सामान्य माणसांचा तर त्यांच्यात संवादाचा सेतू निर्माण झाला, हे निश्चित. महाराष्ट्र व पंजाबचे भावनिक, प्राचीन संबंध आहेतच. त्याला आता साहित्यिक संबंधांचीही किनार मिळाली आहे. त्यामुळे पंजाब आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध कायम राहतील. याची काळजी घेणे ही मराठी माणसांचीही जबाबदारी आहे.

संमेलनात रेल्वेने येणार्‍या साहित्य रसिकांची आबाळ आणि गैरसोय झाली. बहुतांश पत्रकारांना मीडिया पासेस आणि संमेलनाध्यक्षांचे भाषणही मिळाले नाही. अशा काही गोष्टी वगळता ‘रिकामटेकड्यांच्या संमेलना’ने पहिल्यांदा भरपूर काही दिले. नोकरीदेखील गावातच पाहिजे, असे म्हणणारा मराठी माणूस अपवाद वगळता असे धाडस करीत नाही. संमेलनाच्या निमित्ताने पर्यटनाच्या निमित्ताने का होईना, तो सीमोल्लंघन करील, हे या संमेलनाचे फलित म्हणायला हवे. त्यामुळे यापुढे नेमाडेंनी म्हटल्याप्रमाणे, मराठीचा वास जेथे येईल तेथे साहित्य संमेलन भरवण्यास काहीच हरकत नाही. आमेन!
pethkaratul09@gmail.com