आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय स्टिफन बारसे- दी मिरॅकल मॅन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रधर्म, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्तीच्या नवनव्या व्याख्या जनतेच्या मनावर थोपवल्या जात आहेत. संभ्रमित समाजमन स्वत्व विसरून सत्ताधाऱ्यांनी टाकलेल्या या जाळ्यात अडकत चालले असताना गाजावाजा न करता खऱ्याखुऱ्या राष्ट्रभक्तीचे प्रत्यय देणारे आयुष्य नागपूरचे क्रीडा शिक्षक विजय स्टिफन बारसे आजवर जगत आले आहेत. ध्येयासक्त वृत्तीच्या बारसेंमुळेच झोपडपट्टीतल्या एरवी उपेक्षित राहणाऱ्या मुला-मुलींमध्ये फुटबॉल खेळाचे प्रेम रुजले आहे. बारसे आणि त्यांच्या उच्चशिक्षित मुलाने राबवलेल्या ‘स्लम सॉकर’ उपक्रमातून पुढे आलेली मुले आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून अभिमानाने चमकताहेत. क्रीडा संस्कारातून सामाजिक परिवर्तनाचे  नकळत उद्दिष्ट साध्य झालेल्या बारसेंच्या या लोकविलक्षण आयुष्यावर नागराज मंजुळे चित्रपट साकारताहेत आणि अमिताभ बच्चन बारसेंची भूमिका साकारणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरचा हा विशेष लेख. एका रोमहर्षक जगण्याचा पट उलगडणारा...  

पिंजारलेल्या केसांची, तारवटलेल्या डोळ्यांची, बेदरकार भाव असलेली मुले सकाळ झाली की, घराच्या दारात रिकामटेकडी बसलेली असायची. या बेपर्वा मुलामुलींकडे पाहून अनेकांना शिसारी येत. मात्र, हिस्लाॅप काॅलेजमध्ये शारीरिक शिक्षक असलेले विजय स्टिफन बारसे आणि चंद्रपुरला शारिरीक शिक्षिका असलेली त्यांची पत्नी रंजना यांनी आपले जीवन या मुलामुलींसाठीच वाहिले होते. एका असाध्य उपक्रमात अडकलेला आपला बाप आपल्यासाठी काही म्हणून ठेवणार नाही, आपल्याला इथे भविष्य नाही, अशा समजूतीने मोठा मुलगा डाॅ. अभिजित घर सोडून थेट अमेरिकेतल्या बिल्टमोर युनिव्हर्सिटीत प्राध्यापक म्हणून रूजू झाला होता. एक दिवस न्यूयाॅर्क टाइम्स’मध्ये त्याने आपल्या वडिलांविषयीचा वृत्तांत वाचला. सर्व गोष्टींचा अभाव असताना विजय बारसे नावाचा एक माणूस महाराष्ट्रातील नागपुरात झोपडपट्टी फुटबाॅल आयोजित करतो. तो हे सर्व कसे करतो, हे आश्चर्यच आहे, वगैरे वगैरे... ते वाचून डाॅ.अभिजित बारसेला सर्वार्थाने आपला बाप आकळतो. तडक डॉ. अभिजित नागपूर गाठतो. आता डाॅ.अभिजित सीईओ या नात्याने ‘स्लम साॅकर’ म्हणजेच झोपडपट्टी फुटबाॅलचे संपूर्ण व्यवस्थापन पाहत आहेत. आपल्या वडिलांइतकीच मुलांची काळजी घेत आहेत. फरक इतकाच की आता जमाना खूप बदललाय... आता मुले स्मार्ट झालीय. चोऱ्या करणारे, खिसा कापणारे, क्षुल्लक कारणावरून चाकू चालवणारे, आॅटो फोडणारे हात आता संगणकाशी खेळताहेत, सफाईदार इंग्रजी लिहिताहेत... घर ते जेल एवढंच जग ठाऊक असताना आता देश-विदेशात विमानाने प्रवास करताहेत...
 
एरवी, झोपडपट्टी हा शब्द ऐकताच पांढरपेशांच्या चेहऱ्यावर तुच्छतेचे भाव उमटतात.  झोपडपट्ट्यांमध्ये जन्माला येणारी मुले मोरीच्या पाण्यावर टरारणाऱ्या चमकोऱ्यासारखी वाढतात आणि देवाला सोडलेल्या सांडासारखी उंडारत राहतात, अशी अनेकांची समजूतही असते. अशा उपेक्षित मुलांच्या जीवनात विजय बारसे यांनी जगण्याची नवी उमेद जागवली...ती जाणीवपूर्वक रुजवली... आता या उमेदीचा वड झालाय. या वडाला नव्या आशा-आकांक्षांच्या पारंब्या फुटल्या आहेत. विजय बारसे यांच्या ‘स्लम सॉकर’ या संकल्पनेने नागपुरातल्या झोपडपट्टीतील मुले फुटबाॅल स्टार झाली आहेत.   मोडक्या-तोडक्या बादल्या, प्लास्टिकची भांडी हीच झोपडपट्ट्या आणि रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या मुलांची खेळण्याची साधने. कुठून तरी आणलेल्या फुटबाॅलमध्ये चिंध्या भरू भरू खुन्नस काढल्यासारखे खेळत राहणे, एवढेच त्यांना माहीत. २००१ मध्ये अशीच काही झोपडपट्टीतील मुले ऊन-पावसाची तमा न बाळगता अनवाणी फुटबॉल खेळताना बारसे यांना दिसली. कुठलीही साधने नसताना तहानभूक विसरून फुटबाॅल खेळणारी मुले पाहून या मुलांमधून अव्वल फुटबॉलपटू घडविण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात शिरली. झोपडपट्टीतील गुणवत्ता शोधणाऱ्या ‘स्लम सॉकर’चा जन्म हा असा झाला.
 
२००१ मध्ये नागपूरातील वसंतराव नाईक झोपडपट्टीतील आठ मुलांना घेऊन बारसे यांनी झोपडपट्टी फुटबाॅल सुरू केला. चार मुले राखीव आणि चार मुलांचा संघ असा हा सामना होता. पहिल्याच वर्षी शहरात १२८ संघ तयार झाले. प्रत्येक संघात १५ खेळाडू होते. सारेच अनवाणी पायांनी खेळत होते. या स्पर्धेसाठी फुटबाॅलचे प्रचलित नियम नव्हते. अगदी ‘आॅफ साइड’चा नियमही काढून टाकण्यात आला होता. खेळाडूंसाठी कोणताही ड्रेसकोड नव्हता. अगदी लुंगी गुंडाळून कोणीही खेळू शकत होते. मात्र टाॅस हरलेल्या संघाने शर्ट व बनियन काढून खेळायचे हा दंडक होता. सामना सुरु झाला की, संबंधित झोपडपट्टीच्या दादाकडे रेफ्रीची जबाबदारी दिली जायची. म्हणजे, कोणी भांडणतट्टा करायचा प्रश्नच नसे. एखाद्याने चुकूनही भांडण केले तरी संपूर्ण स्पर्धाच रद्द होत असे. त्यामुळे २००१ पासून आजतागायत स्पर्धेत भांडणतट्टा झालेला नाही : इति विजय बारसे. विशेष म्हणजे, यात जिंकलेल्या आणि हरलेल्या अशा दोन्ही संघांना फुटबाॅल भेट देण्यात येई. कारण, रोख रक्कम खाण्यापिण्यात खर्च होण्याची भीती. त्यापेक्षा फुटबाॅल दिला, तर मुले तो चिध्या होईपर्यत खेळतील ही आशा.   
 
नागपुरातल्या एका कोपऱ्यात सुरू झालेली ‘स्लम फुटबॉल’ स्पर्धा. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर होत आहे. जगातील इतर देशांमध्ये अशीच पार्श्वभूमी असलेल्या मुलांसाठी ‘होमलेस फुटबॉल वर्ल्डकप’ स्पर्धा होते. या स्पर्धेत भारतीय संघही सहभागी होऊ लागला आहे. राष्ट्रीय स्पर्धांमधून या संघाची निवड होत आहे. आज ७५ देशांनी स्पर्धेच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याची दखल घेतली आहे. ‘युनिसेफ’नेही झोपडपट्टीत राहणाऱ्या किंवा वंचित मुलांचा फुटबॉलच्या माध्यमातून विकास होऊ शकतो, हे सूत्र स्वीकारले आहे. समाधानाची बाब म्हणजे, काही मुले स्वत:पुरते खेळून थांबलेली नाहीत, तर प्रशिक्षक म्हणूनही भूमिका पार पाडत आहेत. बारसे यांनी फुटबॉलचे मैदान असे मारले आहे! मात्र सुरुवातीला मित्रांनी, घरच्यांनी वेड्यात काढले, विरोधही झाला. पण त्याने बारसे यांचा निर्धार आणखी पक्का होत गेला. पगारातून घर खर्च भागवल्यानंतर काही रक्कम शिल्लक राहायची. त्या उरलेल्या रकमेतून समाजासाठी काही करता येईल का, हा प्रश्न त्यांना सतत अस्वस्थ करायचा.

स्वत: शारीरिक शिक्षक असल्यामुळे त्यात खेळासाठी काहीतरी असावे हा यामागचा विचार होता. त्यातून झोपडपट्टी फुटबाॅल करायचे नक्की केले. त्यातूनच त्यांनी मुलांशी संवाद साधला, त्यांना खेळण्यासाठी फुटबॉल दिला. या कल्पनेला सर्व वर्तमानपत्रांनी खूपच उचलले. त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांतून तसेच राज्याच्या इतरही भागांतून विचारणा होत गेली. तसतशी स्पर्धा लोकप्रिय होत गेली. अगदी ‘बीबीसी’नेही दखल घेतल्यामुळे स्पर्धा जागतिक पातळीवर पोहोचली. दरम्यान, बारसे यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यांची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावरही होऊ लागल्यानंतर त्यांचा मुलगा अभिजित भारतात परतला. झोपडपट्टी फुटबॉलचे नामकरण ‘स्लम सॉकर’ असे केले. त्यानंतर स्लम सॉकरचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू झाला. झोपडपट्टींतल्या मुलांना व्यसनापासून रोखण्यासाठीच्या या प्रयत्नाला पुढे शिक्षणाची जोड देण्यास सुरुवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून ‘एज्यु किक’ उपक्रमातून मुलांना शिक्षणही दिले जाते. या उपक्रमाची दखल जागतिक फुटबॉल महासंघानेही घेतली. ‘फिफा’ने २०१६ मध्ये ‘डायव्हर्सिटी’ पुरस्काराने त्यांचा गौरव केला.
 
या प्रक्रियेत अनेक मुला-मुलींचे आयुष्य पालटले. होमकांत सुरंदसे हा यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंतचा. नाथजोगी समाजाचे हे कुटुंब भटकत भटकत नेरला येऊन थांबले. अंगापिंडाने मजबूत असलेला तेजतर्रार होमकांत एका संघटनेत काम करू लागला. दोन मोठ्या भावांपैकी एक मुंबईत बँकेत, तर दुसरा गावाकडेच ‘महावितरण’मध्ये लागला. रामकृष्ण आणि पुष्पा सुरंजसे हे त्यांचे आई-वडील. दोन वेळ जेवणे, मस्त भटकणे, संघटनेचे काम करणे आणि सायंकाळी शेजारच्या मुस्लिमपुऱ्यातील मुलांसोबत फुटबाॅल खेळणे एवढेच त्याचे जीवन होते. मग कधीतरी यवतमाळच्या नंदुरकर काॅलेजला झोपडपट्टी फुटबाॅल खेळले जात असल्याचे त्याला कळले. २००३-०४ मध्ये त्याने तेथे खेळणे सुरू केले. पण त्याने पोटापाण्याचा प्रश्न सुटला नव्हता. इकडे आई-वडीलही कावले होते. एक दिवस रागाच्या भरात घर सोडून त्याने सरळ नागपूर गाठले. नागपूरला एका मित्राने चहाच्या टपरीवर कामाला लावून दिले. तिथे असलेल्या आजीच्या झोपडीतच होमकांत राहू लागला. योगायोगाने एक दिवस विजय बारसे टपरीवर चहा प्यायला आले. झोपडपट्टी फुटबाॅल खेळत असल्याने ते होमकांतला ओळखत होते.  ‘तू इथे कसा?’ या बारसे यांच्या प्रश्नानंतर होमकांता सोबत त्यांच्या घरी आला. तिथून त्याच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. फुटबाॅलसोबत शिक्षणही सुरू झाले. त्याचे बीपीएड झाले. एपीएडसाठी त्याने आॅनलाइन अर्ज भरला. आता तो होमलेस वर्ल्डकपसाठी जाणाऱ्या फुटबाॅल संघाचा प्रशिक्षक आणि निवडकर्ता आहे...

पंकज महाजन हा नागपूरपासून जवळच असलेल्या गोधनीचा. गोधनी म्हणजे, एकदम खतरनाक वस्ती. मारायला आणि मरायलाही इथे कारण लागत नाही. वडील पानठेला चालवायचे. आई लीला महाजन गृहिणी. पण अपंग. मोठा भाऊ आकाशने नववीपासून शिक्षण सोडलेले. अशा वातावरणात पंकज एरंडासारखा वाढत होता. वडील दारूच्या आहारी गेलेले. दारू पिऊन आईला बडवणेही रोजचेच. एक दिवस दारूनेच त्यांना संपवले. पंकजकडे कोणाचेच लक्ष नव्हते. त्यामुळे पान, तंबाखू, गुटखा सुरू झाले. सोबतीला फुटबाॅल नसता पंकज कदाचित कुख्यात गुंडच व्हायचा. होमकांत सुरंदसे त्याच्या घरावरून जाणेयेणे करायचे. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर पंकज फुटबाॅल खेळायला लागला. हळूहळू चांगलाच रमला. व्यसने आणि वाईट संगतही सुटली. स्टेट, नॅशनल खेळता खेळता २०१३ मध्ये तो पोलंडला जाऊन ‘हाेमलेस वर्ल्डकप’ खेळून आला. आता बारसे यांच्याकडे, तो ‘शक्ती’ नावाचा प्रकल्प चालवतो. ग्रामीण भागातील मुलींमध्ये फुटबाॅलची आवड रुजवून त्यांच्यातून उत्तम खेळाडू तयार करण्याचे काम करतो...
 
ऋतिका आमले ही कोराडी जवळच्या पांजरा गावाची. आई-वडील दोघेही हातमजुरीची कामे करतात. ऋतिका सध्या बी. ए. सेकंड इयरला आहे. झाेपडपट्टी फुटबाॅल खेळायला लागली, तेव्हा पोरीच्या जातीला हे बरे नाही, म्हणत आईने विरोध केला. आईने विरोध केल्यानंतर एक वर्ष तिचे फुटबाॅल खेळणे थांबले. वर्षभरानंतर पुन्हा खेळणे सुरू झाले. अॅमस्टरडॅम, जर्मनी, फ्रान्स येथील ‘होमलेस वर्ल्डकप’ ती खेळून आली. त्यानंतर मात्र आई-वडीलांचा विरोध मावळला. आता ती तिच्या मोहल्ल्यात स्टार आहे.
 
कधी काळी पांजरा येथून पायी येणारी ऋतिका सायंकाळच्या फ्लाइटने मुंबईला आणि तिथून पुढे फ्लाइट बदलून जर्मनीला फुटबाॅल खेळायला जाते आहे. आयुष्याने रेड काॅर्ड दाखवलेल्या या मुलांनी अंधाऱ्या आयुष्याला लाथाडून यशाचा गोल केला आहे. कोच विजय स्टिफन बारसे या अवलियाच्या परिसस्पर्शाची ही जादू आहे...

बारसेंच्या भूमिकेत साक्षात बच्चन!
विजय बारसेंवर ‘सैराट’फेम नागनाथ मंजुळे हिंदीत चित्रपट करतोय. त्यात बारसे यांची भूमिका साक्षात अमिताभ बच्चन साकारणार आहेत. पण त्यामुळे बारसे यांच्या जगण्यात काहीही फरक पडलेला नाही. ते अजूनही मोबाइल घरीच विसरूनच समोरच्याच्या हृदयाचे ठोके वाढवतात. त्यांच्याजवळ १९९९ मध्ये घेतलेली ‘बजाज चेतक’ ही स्कूटर आहे. चित्रपटाबद्दल विचारले असता, ते फक्त हसले. म्हणाले, यापूर्वीही एकदा माझ्यावर चित्रपट निर्मितीचा प्रयत्न झाला होता. अनेकांनी संपर्कही केला होता. पण योग आला नाही. मुलं म्हणाली सर ते डाॅक्युमेंट्री करतील, दोन दिवसही चालणार नाही. त्यामुळे फारसा रस घेतला नाही. पण मंजुळे यांच्या बोलण्यात आणि कथेतही आश्वासकता अाहे. अमिताभ बच्चन माझी भूमिका करणार आहे, असे म्हणतात. माझ्या आयुष्यावर कधी चित्रपट निर्मिती होईल, असा विचारही कधी केला नव्हता... नागपुरकराच्या आयुष्याच्या कथानकावर बेतलेली ही दुसरी चित्रपट निर्मिती. यापूर्वी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख श्रीनिवास रामचंद्र शिरास यांच्या जीवनावर ‘अलिगढ’ चित्रपटाची निर्मिती झाली. मनोज वाजपेयीची त्यात प्रमुख भूमिका हाेती...

‘स्लम सॉकर’ची मुहूर्तमेढ
३६ वर्षे हिस्लॉप कॉलेजमध्ये शारीरिक शिक्षणाचे प्राध्यापक असलेले बारसे २००६ मध्ये सेवानिवृत्त झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे तसेच महाराष्ट्र स्पोर्ट््स कौन्सिलचे ते सदस्य होते. त्यांच्या कार्यासाठी त्यांना रिलायन्स फॉऊन्डेशनतर्फे ‘द रिअल हीरो’ हा पुरस्कारही मिळाला. सचिन तेंडुलकरच्या हस्ते हा पुरस्कार त्यांनी स्वीकारला. ते नागपूर महापालिकेचे नामनिर्देशित सदस्यही होते. झोपडपट्टीतील मुलांना कमी वयात वाईट व्यसने, चोरीची सवय लागते. अशा मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी दिवसातील दोन तास एकत्र आणले, तर या सर्व वाईट गोष्टींपासून त्यांना दूर ठेवता येईल, हा या ‘स्लम सॉकर’ संकल्पनेमागचा त्यांचा उद्देश होता.
 
लेखकाचा संपर्क - ८५५४९८५६६२

pethkaratul09@gmail.com
बातम्या आणखी आहेत...