आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सृजनशील नृत्यशिल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नृत्यकलेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी चौकटीबाहेर येऊन, कालानुरूप सादरीकरण आवश्यक आहे. औरंगाबाद वेरूळ महोत्सव पूर्वरंग आणि सुरमणी दत्ता चौगुले
स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादेत झालेल्या एका कार्यक्रमातून ही बाब प्रकर्षानं समोर येते...
रंगमंचावर हळुवार दिव्याचा प्रकाश वाढत गेला तसे घुंगरांचे मंजुळ बोल कानी पडू लागतात. संघातील एका नृत्यांगनेने नृत्याचा परिचय दिल्यानंतर प्रत्यक्ष
नृत्याला सुरुवात होते ती कथ्थक नृत्याच्या परंपरेप्रमाणे दुर्गास्तुतीने. तोडे, तिहाया अन‌् परण या रचना होतात. एरवी कृष्णलीला, अष्टनायिका अशा अंगाने जाणारा पुढील प्रवास होणार, असं रसिकांना माहीत असतं. आजकाल पारंपरिक शैलीतील कलावंत यामध्ये नवनवे प्रयोग करतातही. पण, अजिंठा-वेरूळ महोत्सवाच्या ‘पूर्वरंगा’त सादर झालेला नृत्याविष्कार केवळ एक प्रयोग नव्हता, ते एक सृजनशील नृत्यशिल्प होते. आशा जोगळेकर यांच्या शिष्या
डॉ. परिणीता शहा, वैदेही परशुरामे अाणि भक्ती भाटवडेकर यांचं हे नृत्य आजच्या युगाच्या हातात हात घेऊन पुढे जाणारे होते.
नेहमीप्रमाणे प्रत्येक नृत्य प्रस्तृतीनंतर मिळणारी टाळ्यांची दाद या नृत्यांना तोकडी ठरली असती, त्यामुळे नृत्य संपता संपता संपूर्ण सभागृह उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद देऊन जातं. प्रयोगाच्या यशाची ही पावती असते. अद्वितीय असे हे नृत्य शेवटपर्यंत रसिकांशी संवाद साधत होते, याचं हे लक्षण असतं. या कार्यक्रमात, लयीशी खेळताना तिघी नृत्यांगनांनी मानवी स्वभावाच्या स्थिर, चंचल आणि धीट अशा तीन स्वभावांचे दर्शन घडवले. स्थिरचित्ताची नृत्यांगना कशा पद्धतीने स्वत:ला व्यक्त करते, तर धीट अन‌् चंचल स्वभावाच्या कशा व्यक्त करतील, याचे चमत्कृतीपूर्ण सादरीकरण लक्ष वेधणारे होते. पदन्यासाच्या साथीने दमदार अभिनय अन‌् नृत्यातील हुकमत बेजोड होती. पारंपरिक नृत्याला कलावंतांनी आजच्या काळाची जोड दिल्याशिवाय ते आजच्या समाजाचा भाग होणार नाही, ही बाब लक्षात घेत त्यांनी केलेल्या रचना रसिकांशी मुक्त संवाद साधत होत्या. प्रत्येक नृत्याला मिळणारी उत्स्फूर्त दाद उत्तम संवादाची प्रचिती देत होती. ताकदीचा कलावंतच हे करू शकताे, हे तिघींनीही दाखवून दिले.
अष्टनायिका प्रस्तृत करतानाही तीन स्वभावांचे दर्शन त्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने घडवले होते की, सभागृहातील एकाही रसिकाची नजर क्षणभरही मंचावरून ओझल झाली नाही. अष्टनायिकांतील खंडनायिका त्यांनी इतक्या वेगळ्या पद्धतीने दाखवली की, रसिकांना मंचावरच खिळवून टाकले होते. पती निराळ्या स्त्रीबरोबर संग करून आला आहे. अशा वेळी पतीपत्नीतील प्रसंग कसा असेल, हे दाखवताना प्राचीन काळातील स्थिरचित्ताची स्त्री कशी वावरेल, तर चंचल स्वभावाची साठच्या दशकातील स्त्री कशी सामोरी जाईल, अन‌् आजच्या युगातील स्त्री ही ‘सिच्युएशन कशी हँडल करेल’ याचे उत्तम सादरीकरण क्षणोक्षणी दादच मिळवत गेले. उरीच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यालाही कथ्थकमध्ये दाखवण्याची सृजनशीलता या नृत्यांगनांमध्ये दिसली.
छोट्या पडद्यावर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे नृत्य आता फक्त रंगमंचीय सादरीकरणामध्ये केंद्रित झाले आहे. त्यातही नवे प्रयोग होतात. पण, ते सर्कशीतील प्रयोगासारखे वाटावे असे चित्तथरारक असतात. शास्त्रीय नृत्याचे जतन, संवर्धन व्हावे यासाठी जातिवंत कलाकार खूप प्रयत्न करत आहेत. गुरुकुलांतून विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे कामही अतिशय संयमाने सुरू आहे. पण, एवढे पुरेसे नाही. अभिजात नृत्य आनंद देणारे आहे. भावना व्यक्त करण्यासाठी नृत्य हे सर्वेात्तम माध्यम आहे. कलांचा उगम झाला त्या काळातील परिस्थितीनुसार नृत्यरचना होत गेल्या. देवादिकांच्या कहाण्या त्यातून सांगत नीतिमूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले जात होते. काळाच्या ओघात त्यात गुणी कलावंतांनी नवे प्रयोगही केले. मात्र, एका चौकटीत राहून केलेले प्रयोग करताना चौकटीबाहेरच्या जगालाही विचारात घेणेही महत्त्वाचे होते. ते न केल्यामुळेच शास्त्रीय नृत्याकडे पाठ करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. नृत्याच्या पाठीशी असलेले सतत त्याला वाचवण्यासाठी झगडा करत आहेत.
पठडीबाहेर येणे आता गरजेचे
नृत्य वाचवण्यासाठी झगडा करण्याची गरज नाही, तर चौकटीबाहेर येऊन आजच्या रसिकांना, समाजाला विचारात घेऊन ते सादर होणे गरजेचे आहे. पूर्वरंगात झालेले हे सादरीकरण अशाच पद्धतीचे असल्याने प्रत्येक उपस्थिताला ते पूर्णवेळ खिळवून ठेवणारे ठरले. आजच्या संदर्भातून मांडल्यामुळे रसिकांना ते आपलेसे वाटले. पारंपरिक नृत्य हाच पाया ठेवून नृत्यांगनांनी केलेला हा नवा प्रयोग शास्त्रीय नृत्याचा गंध नसलेल्यांनाही भावला. हीच अपेक्षा नव्या पिढीतील कलावंतांकडून केली जाते. कारण सादरीकरणाला मिळणारा असा उत्स्फूर्त प्रतिसादच कलेला जिवंत ठेवू शकतो. नृत्यातील तिघी नृत्यांगनांची हुकमत थक्क करणारी होती. त्यांच्या अभिनयाची मोहिनी रसिकांवर गारूड करून होती. तबल्यावर रंगलेली जुगलबंदीही अप्रतिम. टाळ्यांचा कडकडाट कानांत साठवावा असा नजारा प्रथमच औरंगाबादकरांनी अनुभवला. प्रत्येकाला भावलेले हे नृत्य संपले तेव्हा नृत्यांगनांना मानवंदना देण्यासाठी प्रत्येक जण आपसूकच उठून उभा राहिला. एका सृजनशील नृत्यशिल्पाला डोळ्यांदेखत उभे राहताना पाहण्याचा आनंद अशी सादरीकरणेच देऊ शकतील. काळाशी सुसंगत असे अभ्यासपूर्ण प्रयोग शास्त्रीय नृत्याला उंचीवर घेऊन जातील, याची प्रचिती हे सादरीकरण पाहताना आली. अशा नृत्यशिल्पांना शेकडो वर्षे रसिक डोक्यावर घेतील, यात शंका नाही.
rroshaniss9@gmail.com
बातम्या आणखी आहेत...