आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑ‍शवित्झच्‍या क्रॉर्याचा शोध!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुमार नवाथे यांचे ‘नाझी नरसंहार’ हे पुस्तक चार वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले. त्याचा आउशवित्झ-दि डेथ फॅक्टरी या नावाने इंग्रजीत झालेला अनुवाददेखील हादरवून टाकणारा आहे. हा युरोपातील विषय, त्याचे साहित्य तिकडून येणार व ते मराठीत रूपांतरित होणार, हा स्वाभाविक प्रवास झाला. कुमार नवाथे यांचे कौतुक यासाठी वाटते, की त्यांनी भारतीय नागरिकाच्या अंगाने त्या दुर्घटनेकडे पाहिले आणि त्यांची भावना व्यक्त केली. खरे तर त्यांच्या बाबतीत भारतीय दृष्टी म्हणणेदेखील गैर आहे, कारण त्यांचे मन देश, वंश, भाषा, वर्ण या सर्वांच्या पलीकडे आहे. ते फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक घटनेकडे पाहतात आणि म्हणून हिटलरचा हिंसाचार असो वा इदी अमीनचा... त्यांना सारखाच व्यथित करतो.


हिटलरने 1933 ते 1945 या बारा वर्षांत साठ लाखांहून अधिक ज्यूंची कत्तल केली. त्याने व त्याच्या हस्तकांनी त्या सार्‍यांना युरोपच्या वेगवेगळ्या देशांमधून छळछावण्यांमध्ये आणले. तेथे त्यांच्या अनंत हालअपेष्टा केल्या व अखेरीस त्यांना गोळ्यांच्या फैर्‍यांनी अथवा गॅस चेंबरमध्ये मारून टाकले. सर्वात मोठी छळछावणी होती पोलंडमधील आउशवित्झ येथे. त्या एका छळछावणीत तीस लाख ज्यूंची हत्या करण्यात आली. नवाथे हे ‘शिंडलर्स लिस्ट’ नावाचा सिनेमा पाहून अस्वस्थ झाले. तेथून त्यांच्या नाझी हत्याकांडाचा शोध सुरू झाला. दुसर्‍या बाजूस, ते शिंडलरच्या व त्याच्यासारख्यांच्या धीरोदात्ततेच्या कथांनी प्रभावित झाले. म्हणजे, माणूस एका बाजूला अत्यंत दुष्टपणा
दाखवत असताना दुसरीकडे, त्यांना माणसाचा सुष्टपणा सुखावून जातो. त्या सहृदयतेच्या भावनेमधून त्यांची संवेदना व रसिकता घडली गेली आहे. मात्र नवाथे केवळ भावनाविष्कारात रमत नाहीत, ते तपशील जाणून घेतात. तद्वत त्यांनी ज्यूंच्या प्रश्नामुळे व्यथित झाल्यानंतर तत्संबंधी साहित्याचा पाठपुरावा केला. हिटलर आणि त्याची कृष्णकृत्ये जाणून घेतली. त्यांनी महत्त्वाची गोष्ट नोंदली आहे ती ही की, दुसरे महायुद्ध आणि ज्यूंचा छळ या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हिटलरने ज्यूंचा दुष्टावा केला, तो त्याच्या उच्च वंशवादी धोरणामुळे. त्याने तो तिरस्कार जर्मन तरुणांमध्ये बिंबवला आणि त्यामधून नाझींचे वर्णश्रेष्ठत्वाचे धोरण तयार झाले.
नवाथे यांनी आउशवित्झ येथील छळछावणीची, तेथील कार्यपद्धतीची तपशीलवार वर्णने केली आहेत. ती वाचताना अंगावर काटा येतो. माणूस एवढा क्रूर कसा होऊ शकतो, याबद्दल जसा अचंबा वाटतो तसाच तो इतक्या दयनीय स्थितीमध्ये जगू कसा शकतो, याचे आश्चर्य वाटते. माणसाच्या शरीराला त्याचा जीव पराकोटीच्या हीनदीन अवस्थेत इतका प्यारा असू शकतो?
नवाथे यांना कुतूहल एवढे की, ते पोलंडला जाऊन सद्य:स्थितीतील आउशवित्झ पाहून आले. ते युद्धकाळातील ‘घेटो’ वस्त्यांचा शोध घेत होते, तर एक म्हातारा उद्गारला की ते उभे आहेत तीच जागा ‘घेटो’ची आहे. नवाथे यांनी त्यानंतर स्मृतिस्तंभाच्या जागेवरील एक प्रसंग वर्णन केला आहे. त्या जागी प्रार्थना करणार्‍या ख्रिश्चन जोडप्याला नवाथे यांच्या रूपातील एक हिंदू सद्गदित झालेला पाहून आश्चर्य वाटले. उलट, नवाथे ‘आउशवित्झ’ जाणून घेता घेता त्या हिंदुत्वाच्या पलीकडे केव्हाच पोहोचले होते! किंबहुना, खरे हिंदुत्व, नव्हे भारतीयत्व त्यातच आहे. म्हणून नवाथे पुढे नोंद करतात, की ज्यूंना मानवी इतिहासात प्रत्येक भूभागामध्ये सतत छळ सहन करावा लागला. अपवाद फक्त भारताचा. भारतात ते या समाजाचा भाग होऊन गेले. ज्यू जनजीवन हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, जरी बरेचसे ज्यू इस्रायलचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाल्यावर तिकडे गेले असले तरी!
नवाथे यांनी पुस्तकाची रचना आउशवित्झच्या शोधाची व्यक्तिगत कहाणी आणि तेथील इतिहासाचे वस्तुनिष्ठ तपशील एकत्र गुंफून केली आहे. त्यामुळे पुस्तकास विशिष्टता लाभली आहे. त्यामुळेच ते हिटलर व नाझी यांच्यासंबंधीच्या जगभरच्या वाङ्मयात उठून दिसणार आहे. नाझी हत्याकांड घडल्याला सत्तराहून अधिक वर्षे होत आहेत, तरीसुद्धा जगभरात वंशाधारित व धर्माधारित द्वेषभावनेला आणि त्यातून उद्भवणार्‍या हिंसाचाराला खीळ नाही. किंबहुना, त्यामधून जगभर दहशतवाद बोकाळला आहे. त्यामुळे नवाथे यांचे पुस्तक प्रासंगिक औचित्याचे व महत्त्वाचेदेखील ठरले आहे. अरविंद दीक्षित यांनी पुस्तकाचा मराठी गाभा अचूक पकडून बिनचूक भाषांतर केले आहे. त्यामुळे मूळ पुस्तकाची खासियत जपली गेली आहे.

आउशवित्झ - दि डेथ फॅक्टरी
कुमार नवाथे, अनुवाद - अरविंद दीक्षित
पद्मगंधा प्रकाशन, पुणे
मूल्य 180 रुपये