आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधे आणि‍ सच्चे !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्मचरित्र हा साहित्यप्रकार अनेक कारणांमुळे भुरळ घालतो. दुसर्‍याच्या आयुष्याविषयी कुतूहल हा एक महत्त्वाचा भाग असतोच, पण ते आयुष्य डॉ. जयंत नारळीकरांसारख्या बहुश्रुत शास्त्रज्ञ-लेखकाचे असेल तर वाचकाचे कुतूहल शतपटीने वाढलेले असते. हे कुतूहल शमवण्याचे काम ‘मौज’ प्रकाशित ‘चार नगरांतील विश्व माझे’ हे आत्मचरित्र करते. नारळीकरांचे बालपण सुसंस्कृत, उच्चशिक्षित व उच्चमूल्ये असणार्‍या आईवडलांच्या सान्निध्यात गेले. नारळीकरांचे वडीलही केंब्रिजचे रँग्लर व केंब्रिजमध्येच पुढे अध्यापनाची संधी असणारे! सुटीवर भारतात आले असताना मदनमोहन मालवीय म्हणाले म्हणून परत परदेशी न जाता त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. आई संस्कृतची एम. ए.. दोन मुलांचे संगोपन करताना तिने स्वत:च्या संस्कृत ज्ञानाचा उपयोग तर केलाच, परंतु मुलांना सुटीत गणितातली कोडी घालत त्याही विषयातील गोडी वाढवली. जवळची हिंदी माध्यमातील शाळा निवडून, मुलांना कायम सामान्य माणसांशी संवाद साधणे शक्य केले. दर दोन वर्षांनी महाराष्ट्रात येऊन मुलांची महाराष्ट्राशी ओळखही पक्की ठेवली. या संस्कारांमुळेच पुढे नारळीकर मुंबईला परत आल्यावर, बरोबरीचे वैज्ञानिक स्वत:च्या मुलांना महागड्या इंग्रजी माध्यमांच्या शाळात घालत असताना, त्यांनी स्वत:च्या मुलींसाठी जवळची केंद्रीय विद्यालय ही शाळा निवडली. इंग्रजीचे महत्त्व त्यांना नाकबूल नाही; परंतु गणित, विज्ञान वा भाषा यांचे मूलभूत आकलन होण्यासाठी, माणसाचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेत वा तिच्या जवळच्या भाषेत झाले पाहिजे, त्यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. याविषयीची चर्चा जिज्ञासूंनी या पुस्तकाच्या माध्यमातून मुळातूनच वाचावी अशी आहे.
मॅट्रिक व इंटर सायन्सला पहिले आल्यावर इंजिनिअरिंगला जाण्याऐवजी त्यांनी प्युअर सायन्सला जाण्याचे ठरवले व त्याप्रमाणे बी. एस्सी.लाही प्रथम क्रमांक मिळवला. साहजिकच वडलांप्रमाणे केंब्रिजला जाऊन गणित व भौतिकशास्त्रात उच्च शिक्षण मिळवण्याचे त्यांनी ठरवले.
लहानपणापासून समजून, लक्षपूर्वक अभ्यास केल्याने त्यांना केंब्रिजच्या अभ्यासाचा ताण आला नसावा. इंग्रजीत म्हण आहे की, 'अ’’ ६ङ्म१‘ ंल्ल िल्लङ्म स्र’ं८ ें‘ी२ खंू‘ ४ि’’ ंल्ल िॅ१ी८.' अत्यंत यशस्वी माणसांच्या बाबतीत त्यांच्याविषयी अशी समजूत असते, की ते असामान्य असल्यामुळे वा मौजमजेचा त्याग केल्यामुळे त्यांनी यश मिळवले. त्यामुळे सामान्यांनी त्यांचे अनुकरण करणे अशक्य! परंतु असामान्य अनेक बाबतीत सगळ्यांसारखेच आयुष्य जगत असतात व म्हणून सर्वच जण असामान्य होऊ शकतात, हा विश्वास प्रस्तुत पुस्तक देते. मात्र त्यासाठी आपल्या विषयावर मनापासून प्रेम हवे व आवडत्या विषयासाठी मेहनत घेण्याची तयारी हवी. वयाच्या 24-25व्या वर्षी नारळीकरांना रँग्लर बनण्यात यश आले. भारतात व विशेषत: महाराष्ट्रात त्यांचे खूप कौतुक झाले. त्यांना पद्मश्री देण्यात आली व भारतात ठिकठिकाणी त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. या व्याख्यानांना सर्वसामान्य लोकांनी उत्साहाने हजेरी लावली. खरे म्हणजे या व्याख्यानांचे आयोजन भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने केले होते. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक त्यांना ऐकण्यास व बघण्यास आले की या व्याख्यानांचे रूपांतर जाहीर भाषणात झाले. सर्वसामान्य लोक त्यांची व्याख्याने ऐकायला आल्याचे बघून नारळीकरांनी स्वत:च्या व्याख्यानांचा विषय सुलभ करून सामान्यांना समजेल, अशा भाषेत सांगितला. पुढेसुद्धा नारळीकरांनी ही विशेषता जपली. कारण सामान्य माणसापर्यंत विज्ञान पोहोचले पाहिजे, ही त्यांची आस्था व कळकळ होती. त्यांचे गुरू फ्रेड हॉयल यांच्याकडून आत्मसात केलेल्या अनेक गोष्टींपैकी ही एक!
वर म्हटल्याप्रमाणे सामान्य माणसांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी सोपे व सुलभ करून लिहिणे व बोलणे, यासाठी विज्ञानावर प्रेम व सामान्य माणसांबद्दल जी आस्था लागते ती गुरू व शिष्य या दोघांत भरपूर होती. ट्रेकिंग व हायकिंगबद्दल प्रेमही. विरंगुळा म्हणून विज्ञानकथा लिहिणे, नाटके लिहिणे वगैरे होतेच. हॉयल जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक. त्यांनी पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सारख्याच आस्थेने शिकवले. नारळीकरांनी अर्थात नाटके लिहिली नाहीत, पण जे-जे करावेसे वाटले ते सर्व केले व कुठलेही काम श्रेष्ठ वा कनिष्ठ मानले नाही. केंब्रिजमध्येच हॉयलने आंतरराष्ट्रीय दर्जाची खगोलशास्त्राला वाहिलेली संशोधन संस्था उभी केली. काही वर्षे यात काम करून व समृद्ध अनुभव गाठीशी बांधून नारळीकरांनी परत यायचे ठरवले. आधीच ठरवल्याप्रमाणे ते टीआयएफआर या संस्थेत भौतिकशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक म्हणून आले. भाभांनी ही संस्था जेव्हा उभारली तेव्हा त्यांच्या जाणिवांचे क्षितिज खूप विस्तारलेले होते. त्यांना समर्थपणे साथ दिली पंडित नेहरू यांनी! त्याचे प्रतिबिंब इमारतींच्या उभारणीत, तसेच प्राध्यापकांना जागतिक विचारविनिमयासाठी मिळणार्‍या सवलतीत पडलेले आढळते. भाभांचा जो विचार प्रत्यक्षात येऊ शकला नाही व ज्याच्याविषयी नारळीकरांना अतिशय कळकळीने वाटते, तेही त्यांच्या ‘टीआयएफआर’विषयीच्या चिंतनात आढळते. शिवाय नारळीकरांना असेही वाटते की, शिकवणे व संशोधन यातील परस्परावलंबित्वही बर्‍याच जणांच्या लक्षात येत नाही. त्यांचे हे म्हणणे शिक्षकी पेशातील सर्वांनीच विचार करण्याजोगे आहे.
1972 ते 1987-88 अशी वर्षे मुंबईला काढल्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष यशपाल यांनी त्यांच्यावर आयुकाच्या उभारणीची जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी जशी मोठी होती तशीच नारळीकरांना स्वत:च्या संस्थेबाबत सर्व कल्पना सत्यात उतरवण्याची एक अमूल्य संधी होती. त्याप्रमाणे त्यांनी पुणे विद्यापीठाच्या आवारात ‘आयुका’ची उभारणी केली. हे सर्व मुळातूनच वाचण्यासारखे आहे. खरे म्हणजे या पुस्तकात बरेच अधिक सांगण्यासारखे आहे. इथे एवढेच म्हणणे पुरेसे होईल की संपूर्ण पुस्तकातून डॉ. जयंत नारळीकरांचा साधेपणा, सच्चेपणा आपल्या मनाला भिडत राहतो...

चार नगरांतील माझे विश्व
ले. जयंत विष्णू नारळीकर
मौज प्रकाशन, 2012, पृष्ठसंख्या 533
किंमत रु. 500