आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबड्याच्या हाडांचे फ्रॅक्चर टाळण्यासाठी : हेल्मेट सक्ती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वाढती लोकसंख्या, वाहनींची बेसुमार वाढ, बेशिस्त ट्रॅफिक त्यामुळे रस्त्यावर हमखास अपघात होतात. अशा अपघातात मेंदूला, हातापायाच्या हाडांना किंवा जबड्याच्या हाडांना मार लागतो आणि हाड फ्रॅक्चर होते. जबड्याच्या हाडाचे फ्रॅक्चर दुरुस्त करण्याचे काम ओरल सर्जन कुशलतेने करतात. कारण प्रत्येक ओरल सर्जन हा आधी दंतरोगतज्ज्ञच असतो. त्यामुळे दातांची ठेवण, रचना (occlusion) यांचे अचूक ज्ञान ओरल सर्जनला असते. आपल्या दातांची एकमेकंवर असणारी जी रचना आहे ती इतकी काटेकोर (precise) असते की, त्या रचनेत तसूभर फरक जरी आला तरी पेशंट बेचैन होतात. तोंड नीट बंद होत नाही. नीट खाता येत नाही. त्यामुळे योग्य त्या रचनेत (centric occlusion) जबड्याला फॅक्चर झाल्यानंतर दात व्यवस्थित जुळवावे लागतात. अन्यथा ते चुकीच्या रचनेत जुळले गेल्यास जबड्याचे फ्रॅक्चर जरी दूर झाले तरी दातांच्या रचनेत मोठा दोष शिल्लक राहतो आणि पेशंट खूपच बेचैन होतो. शिवाय इतर हाडांच्या फ्रॅक्चरमध्ये आणि जबड्याच्या फ्रॅक्चरमध्ये एक महत्त्वाचा फरक म्हणजे इतर हाडांच्या पोकळीत फक्त ‘बोन मॅरो’च असते.

जबड्याच्या हाडाच्या पोकळीत बोन मॅरोव्यतिरिक्त बत्तीस दात त्यांच्या विविध मुळांना जोडणा-या नसा-शिरा असतात. त्यामुळे फ्रॅक्चर दुरुस्त करताना दाताच्या मुळांचा, नसांचा बारकाईने विचार करावा लागते. जबड्यातील दातांच्या अस्तित्वाचे कायम भान ठेवायला लागते. त्यामुळे जबड्याचे फ्रॅक्चर दुरुस्त करण्याचे काम फारच कौशल्याचे आणि जिकिरीचे ठरते. पूर्वीच्या काळी असे फ्रॅक्चर प्लास्टिक सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, जनरल सर्जन तज्ज्ञच दुरुस्त करीत असत. मात्र, आजकाल तालुका पातळीवर उपलब्ध असलेल्या ‘ओरल सर्जन’च्या सेवेमुळे जबड्याचे फ्रॅक्चर अधिक चांगल्या प्रकारे दुरुस्त होऊ शकते. कोणत्याही फ्रॅक्चर झालेल्या हाडाला दुरुस्त करण्याचे प्रमुख तत्त्व म्हणजे फ्रॅक्चर झालेल्या हाडाची दोन टोके पूर्ववत जुळवणे आणि जोडलेल्या अवस्थेत किमान सहा आठवडे तरी स्थिर अवस्थेत ठेवणे. शरीरातील इतर हाडांच्या बबतीत प्लास्टर करून हाडे स्थिर अवस्थेत राखता येतात. मात्र, जबड्याच्या हाडांना प्लास्टर करता येत नाही. फॅ्रक्चर झालेले जबड्याचे हाड मूळ जागेतून फारसे सटकले नसल्यास दातांना विशिष्ट प्रकारे वायर गुंफून नंतर खालचा जबडा व वरचा जबडा वायरने एकमेकांना बांधून किमान सहा आठवडे तरी ठेवावा लागतो. दात आणि गालाच्या पोकळीतून पेशंट द्रवपदार्थ सेवन करू शकतो. त्यामुळे पेशंटची उपासमार होत नाही.

बोन-प्लेट लावल्यामुळे फ्रॅक्चर दुरुस्तीला एक प्रकारचा भरभक्कमपणा प्राप्त होतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बोन प्लेटमुळे पेशंटचे तोंड बंद ठेवण्याची गरज पडत नाही. शिवाय बोन प्लेट्स वापरल्यामुळे पेशंट काही हलके, सौम्य खाद्यपदार्थही खाऊ शकतो. मात्र, बोन प्लेट लावणे हे खर्चीक ठरू शकते. जबड्याच्या हाडांचे फ्रॅक्चर हे त्याच्या सान्निध्यात असणा-या श्वासनलिका, अन्ननलिका, प्रमुख रक्तवाहिन्या आदी महत्त्वाच्या अवयवांमुळे फारच गंभीर स्वरूपाचे असते. शिवाय पेशंटचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व चेह-या च्या सौंदर्यावर अवलंबून असल्यामुळे हे फ्रॅक्चर नीट दुरुस्त करून चेह-या चे सौंदर्य पूर्ववत करणे फारच महत्त्वाचे ठरते. जबड्याच्या हाडाचे फ्रॅक्चर होऊ नये यासाठी प्रत्येक दुचाकी चालकाने हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. विशेषत: खालचा जबडा तो हलणारा जबडा असतो. त्यास मार लागल्यास फ्रॅक्चर होण्याची जी शक्यता असते ती हेल्मेटच्या वापरामुळे कमी होऊ शकते.

aniketbadwe@gmail.com