आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मागच्या लेखात आपण स्वयंपाकघरातील उपकरणांपैकी मायक्रोवेव्हचा वापर कसा व किती मर्यादित करावा, याची माहिती घेतली. फक्त विद्युतचुंबकीय उपकरणेच नाही तर स्वयंपाकघरातील इतर उपकरणे वापरतानाही काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: जी उपकरणे लाकडाची असतात त्यांचा वापर केल्यानंतर त्यांची स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. उदा. - लाकडाची रवी किंवा लाकडाची विळी, पोळपाट या वस्तू स्वच्छ न ठेवल्यास लोणी किंवा कणीक त्यात अडकून राहते. परिणामी जंतूंचा प्रादुर्भाव होऊन आजार होण्याची शक्यता असते. लाकडाच्या विळीमध्ये भाज्या व फळांचे छोटे छोटे तुकडे तसेच राहून सडतात व आजाराची शक्यता निर्माण होते. याकरिता अशी लाकडाची उपकरणे वापरल्यानंतर स्वच्छ धुऊन कोरडी करून ठेवावी. याच प्रकारे फूड प्रोसेसर, मिक्सर, ग्राइंडर यांच्या वापरानंतर ती स्वच्छ करून ठेवणे आवश्यक आहे. फूड प्रोसेसरचा अतिरेक स्वयंपाकघरात टाळावा. फूड प्रोसेसरचा वापर फळांचे रस काढण्यासाठी केला जातो. हे उपकरण घरात असल्यास आवश्यकता नसताना फळांचे रस काढून सेवन केले जाते. पूर्ण फळांचे सेवन कमी होते. फळांचा रस तयार करताना त्यातील महत्त्वाच्या घटकांचे विघटन होते असे लक्षात आले आहे व परिणामी त्यांचे पोषकत्व कमी होते. म्हणून अशा उपकरणांचा वापर मर्यादित केलेला बरे.
अलीकडील संशोधनात असे लक्षात आले आहे की फळांच्या रसापेक्षा नुसती फळे सेवन करणे अधिक आरोग्यदायी असते. फळांच्या रसात तंतुमय पदार्थ अत्यल्प असल्याने फळांचे पूर्ण गुणधर्म आपल्याला मिळू शकत नाहीत व गोड पदार्थांमुळे मधुमेह व जाडपणा येण्याची शक्यता असते. म्हणून अशा उपकरणांचा जास्त वापर करणे टाळलेले बरे. स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचे उपकरण म्हणजे फ्रिज. त्याइतका चुकीचा उपयोग इतर कुठल्या उपकरणाचा होत असेल असे वाटत नाही. बहुतांश कुटुंबात फ्रिजचा उपयोग पाणी थंड करणे, उरलेले अन्न ठेवणे (भाजी, वरण), घरच्या घरी आइस्क्रीम तयार करणे व शिजवलेले अन्न साठवण्यासाठी होतो. यामागे सर्वात मोठा गैरसमज आहे की फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खराब होत नाही. फ्रिजमध्ये शिजवलेले अन्न ठेवल्याने अन्न खराब होण्याची गती नक्कीच मंदावते, मात्र ती प्रक्रिया सुरूच असते. शीत वातावरणात जंतूंची वाढ मंद गतीने होत असल्याने हा परिणाम जाणवतो. याशिवाय अन्नामधील आॅक्सिडेशनमुळे होणारा बदल अन्न फ्रिजमध्ये ठेवल्याने टळू शकत नाही व परिणामी अन्नाचे गुणधर्म विषाक्त होतात. उदा. मळलेली कणीक, हिरवी चटणी, उकडलेले बटाटे काळे पडतात, इ. वास्तविक पाहता फ्रिजचा उपयोग हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध, दही, सुका मेवा, कडधान्य इत्यादी पदार्थ साठवण्यासाठी करावा. हे पदार्थ शीत वातावरणात जास्त दिवस टिकतात. बरीच मंडळी फ्रिजमधील पदार्थ काढल्या-काढल्या गरम करून खातात, हीदेखील अतिशय चुकीची गोष्ट आहे. असे केल्याने अन्नातील पोषक तत्त्व अधिक खराब होतात व अन्नाचे पोषकत्व जाते. वरील सर्व बाबींचा विचार केल्यास स्वयंपाकघरातील उपकरणे मर्यादित व काळजीपूर्वक वापरणेच योग्य ठरते
sangitahdesh@rediffmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.