आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवलीची नवी ओळख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खूप दिवसांनंतर एक छानसं पुस्तक वाचनात आलं. संत तुकाराम महाराजांची पत्नी आवली ऊर्फ जिजाई. तीच जिजाई जिला सर्वांनी एक भांडखोर, पतीला त्रास देणारी, खाष्ट, कजाग स्त्री म्हणून दूषणं दिली, त्याच आवलीच्या जीवनावर आधारित मृणालिनी जोशी लिखित, आनंदाचे डोही आनंद तरंग हे नितांत सुंदर पुस्तक. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याल्या आवलीची नव्या रूपात ओळख होते. तिच्याबद्दल अपार करुणा, माया मनात एकवटून येते. आवली ही तुकाराम महाराजांची दुसरी पत्नी. त्यांच्या पहिल्या पत्नीला दमा म्हणून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांची दुसरी सोयरीक जमवली. खात्यापित्या घरातली, पुण्याच्या गुळवे सावकाराची ही नऊ-दहा वर्षांची लेक देहूतल्या अत्यंत संपन्न अशा तुकारामांच्या घरात येते आणि साखरेसारखी विरघळून जाते. आपल्या सवतीवर मनापासून प्रेम करणारी, तिच्या लहान मुलाला आपलाच मुलगा मानणारी, मोठ्या जावेवर बहिणीसारखी माया करणारी, या जावेच्या अव्यक्त अशा पतीविरहाच्या दु:खानं स्वत: दु:खी होणारी ही आवली, घरातल्या वडीलधा-यांच्या छत्राखाली सुखसमाधानाने नांदते. पतीला परमेश्वर मानते. तुकाराम महाराज मात्र लग्नाच्या आधी आणि नंतरही विठूच्या भक्तीत इतके तल्लीन आहेत की त्यांना प्रपंचाचा विसर पडला आहे. दोघांच्या जगण्याच्या पातळ्या भिन्न आहेत.

आवलीचे म्हणणे आहे की भक्ती एके भक्ती करून प्रपंच चालत नाही. यामुळे तिचं वैतागणं स्वाभाविक वाटून जातं. आणि अशा वैतागलेल्या भरात जर ती तुकारामांशी भांडते तर तिला खाष्ट, कजाग, भांडकुदळ ठरवणं कितपत योग्य आहे? प्रत्यक्षात मात्र आवलीने आपला संसार मोठ्या हिमतीने, आत्मविश्वासाने तडीला नेलेला आहे. अशा परिस्थितीतही ती आनंदी आहे. मात्र, तिच्या या आनंदीपणाला दृष्ट लागते. डोक्यावरचं वडीलधा-यांचं छत्र एकेक करत कोसळतं. तुकारामांच्या प्रतिष्ठेचं दिवाळं निघतं. आणि अशा वेळी ज्याच्या विश्वासावर, प्रेमावर, आयुष्यभर साथ देणा-या आणाभाकांवर जिनं या परिस्थितीला सामोरं जायचं, तो तिचा पतीच तिला प्रपंचाच्या वा-यावर सोडून परमार्थाच्या वाटेनं एकटाच निघून जातो. संसाराची सर्व जबाबदारी पोरसवदा आवलीवर येते. गुणदोषांसह पतीवर प्रेम करणं हे परमेश्वरावर प्रेम करण्याहूनही कठीण आहे. म्हणूनच आवलीची ओळख नव्यानं होण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकानं वाचायलाच हवं.