आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबाबदारीचे भान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदित्यला आईने बजावले, अन्वयाचे ट्रेनिंग तू घ्यायचे. त्याला हसू आले. आई कोणताही शब्द कुठेही वापरते. दहावी उत्तम मार्कांनी पास झालेली बहीण, तिच्यापेक्षा तीन वर्षांनी आपण मोठे. कॉलेजचे तीन पावसाळे जास्त पाहिले असल्याने आपणच तिला सर्व टिप्स द्यायच्या, हा आईचा आग्रह. पहिल्यांदा त्याला वाटले, हे काम खूपच सोपे आहे. नंतर लक्षात आले, प्रचंड अवघड आहे हे प्रकरण. कॉलेजबद्दल जे आपले ग्रह झाले, तेच तिचे करून देणे, हा तर अन्यायच. तिथले वातावरण, ती अटेंड करणार असलेली लेक्चर्स, शिकवायला येणारे प्राध्यापक, या सर्वांवर कॉमेंट्स करणे आणि त्या सगळ्यांची टर उडवणे, अगदी सहज शक्य आहे. जे आपल्याला आवडले नाही, ज्याच्यात आपल्याला इंटरेस्ट वाटला नाही, त्यात तिलाही रस वाटू नये, असे करावे का? खरे तर ज्या अपेक्षेने त्याने या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, ते अप्रूप तीन वर्षांत संपून गेले. कधी लेक्चरला बसायचे, तर कधी दांडी मारायची.

मित्र जसे सांगतील तसे. आज काय क्लासमध्ये धुडगूस घालायचा, आज बोलायचेच नाही, नुसते गप्प बसायचे, आज लेक्चर अटेंड न करता कँटीन गाठायचे. रोज मित्रांची वेगळी फर्माईश. एकाला शिकवता येत नाही, एखादा दिसायलाच बोअर आहे, एकाची भाषा अशुद्ध आहे, एकाला इंग्लिश बोलता येत नाही, एक जण अत्यंत एकसुरी बोलतो... क्लासबाहेर प्रत्येक प्राध्यापकाच्या शिकवण्याचे पोस्टमार्टेम करण्यात केवढी मजा यायची. आत्ता त्याला जाणवले, आपण कोणाचेच तास पूर्ण अटेंड केले नाहीत. त्यांना शिकवता येते की नाही, हे पाहण्यासाठी 45 मिनिटेच नव्हेत तर काही महिने वाट पाहणे गरजेचे होते. केवळ अ‍ॅपिरियन्सला महत्त्व नि परफॉर्मन्सची वाट न पाहता रिजेक्शनची तयारी. काय मूल्यमापन केले आपण या सा-यांचे? कॉलेजमध्ये अनेक इव्हेंट्स होतात, आपण सहभागी झालोदेखील; पण बक्षीस मिळाले नाही म्हणून खट्टू होत गोंधळ घातला. फंडिंग दिले जात नाही, म्हणून नाराजी व्यक्त केली. कदाचित आपल्याजवळ कन्व्हेन्स करण्याची क्षमता नसेल. अन्वयाजवळ एक उत्सुक मन आहे, उत्साह आहे. कॉलेज खूप छान असते, तिथे हवे ते पुस्तक वाचायला मिळते, संधी चक्क चालून येते, भरपूर मित्र-मैत्रिणी मिळतात, असा शाळेत असल्यापासून पक्का समज झालाय तिचा. केवळ आपल्या पूर्वग्रहांमुळे तिच्या मनातले कॉलेज खराब करण्याचा आपल्याला काय हक्क? अन्वया भरपूर वेळ टीव्ही पाहणारी. हिंदी-मराठी चित्रपटांचा चोखंदळपणे आस्वाद घेणारी. तिच्या मनातले कॉलेज मोकळे, आनंददायी. वेगळे विषय, शिकवणारे प्राध्यापक शाळेतल्या शिक्षकांपेक्षा खूप वेगळे, ग्रुप डिस्कशन घडवणारे, फील्ड वर्कसाठी बाहेर घेऊन जाणारे, अनेक प्रश्नांची उत्तरे ठाऊक असलेले. आपली डेव्हलपमेंट होणार ती कॉलेजमध्येच, हा ठाम विश्वास असल्याने भावाच्या, आदित्यच्या कॉलेजबद्दल तिला आकर्षण होतेच. त्याचे मित्रांशी बोलणे, प्रोग्रामसाठी तयारी करणे, तासन्तास झोकून देऊन काम करणे, हे पाहायला तिला आवडत होते.

कॉलेजचा पहिला दिवस, किंबहुना पहिला महिना तिच्या आयुष्याला वळण लावणारा ठरणार होता. अपेक्षापूर्ती, अपेक्षाभंग, नैराश्य, प्रसन्नता, ऊर्जा यातील कोणती न कोणती छटा तिच्या व्यक्तिमत्त्वाला व्यापून टाकणार होती. आईने आदित्यला बजावल्यावर तिला छान वाटले होते. आईबाबा कसे वागावे, वागू नको, हे सांगत नव्हते. त्यांनी याच पिढीकडे सहज ही सूत्रे सोपवली होती. तीनच वर्षांनी मोठा असणारा भाऊ नक्कीच तिला समजून घेणार, हेही ती जाणून होतीच. आदित्यला हे नव्याने समजल्याने कॉलेज कसे आहे, तिथे कसे वागावे, स्वत:ला कसे घडवावे, हे वाटतात तितके सहज, साधे, सोपे प्रश्न नसून परीक्षेचा पेपर सोडवावा इतके अवघड आहेत, हे कळले. प्रगल्भ होत तो अन्वयासमोर बसला...