आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेदिक उपचाराने वाचले पित्ताशय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदा लग्नसमारंभासाठी हैदराबादला जाणे झाले. जेवल्यानंतर सायंकाळी पोट दुखणे सुरू झाले. इमर्जन्सीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजीमध्ये रेफर केले. तसा हा त्रास वर्षभरापासून कमी-जास्त प्रमाणात होतच होता. हॉस्पिटलमधील विशेषज्ञ डॉक्टरांनी भरती करून तीन दिवस वेगवेगळ्या तपासण्या केल्या. अगदी हिमोग्लोबिनपासून तर सीटी स्कॅनपर्यंत सर्व तपासण्या झाल्या. अखेर पित्ताशयाचा (गॅल ब्लॅडर) आजार आहे असे निदान झाले. ताबडतोब शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला, अन्यथा काहीही झाले तर तुम्ही जबाबदार व्हाल, असे सांगण्यात आले. त्यांनी केलेल्या औषधोपचाराने पोट दुखणे कमी झाले. शस्त्रक्रियेची सर्व तयारी झाली, पण औरंगाबाद येथील माझा भाऊ प्रदीप धोका यांना संपर्क केला असता त्यांनी त्यांच्या परिचित डॉक्टरांचा नंबर दिला व इंटरनेटद्वारा सर्व वैद्यकीय अहवाल (रिपोर्ट्स) पाठवले. रिपोर्ट बघून त्या डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णाला औरंगाबादला आणा. आयुर्वेदिक औषधोपचाराने हा त्रास कमी होऊ शकतो. शस्त्रक्रिया करण्याची गरज पडणार नाही.
मन घट्ट करून आम्ही औरंगाबादला निघालो. येथे सिडकोत आल्यावर तेथील प्रसिद्ध डॉक्टर, पंचकर्म व आयुर्वेदतज्ज्ञ यांना दाखवून उपचार सुरू केले. 8-10 दिवसांत पोट हलके वाटून दुखणे थोडे कमी झाले. मनाला धीर आला आणि येथे पूर्ण बरे होणार असे वाटत होते. संपूर्ण कोर्स तीन महिन्यांचा राहील आणि नंतर सोनोग्राफी करा, असे त्या आयुर्वेदतज्ज्ञ डॉक्टरांनी सागितले. मध्येच एक बस्ती या पंचकर्माचा कोर्स केला. संपूर्ण सहा महिन्यांनंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सोनोग्राफी केली. रिपोर्ट बघितल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसला. सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. पित्ताशयातील सूज, खडे पूर्णपणे नष्ट झालेले होते व पित्ताशय नॉर्मल असा रिपोर्ट होता. ज्या आजारासाठी हैदराबादला इमर्जन्सी ऑपरेशन करण्याची गरज होती. तो आजार आयुर्वेदिक औषधीने व पंचकर्माने केवळ तीन महिन्यांत पूर्णपणे बरा झाला. यासाठी औरंगाबाद, सिडको येथील त्या देवदूताप्रमाणे भासलेल्या पंचकर्म व आयुर्वेदतज्ज्ञ डॉक्टरांचे आभार मानणे शक्यच नाही. मात्र, ही आयुर्वेदाची महती सर्व गरजू रुग्णांना कळायला हवी. त्यांना जागृत केले पाहिजे, असे यानिमित्त वाटले.