पहाटे जागे झाल्यानंतर घशास कोरड पडलेली असताना औदुंबराची अंत:साल, पान अथवा काड्यांच्या गुळण्या कराव्यात. माठातील पाण्याचे उष:पान करावे. फ्रिजचे पाणी पिऊ नये. यानंतर फिरायला जावे, कपाळावर घाम येईपर्यंत व्यायाम करावा. सकाळी साडेसहा ते सात दरम्यान कोवळे ऊन अंगावर घ्यावे. तीळ तेल किंवा खोबरे तेलाने अंगाची मालिश करावी. काळी माती हे एक श्रेष्ठ रसायन आणि बहुगुणी आहे. त्यात पाणी घालून त्याचा लेप लावावा. नंतर अंग धुऊन घ्यावे किंवा अंगास हळद पावडर, तीळ आणि आवळकाठी पावडर दूध मिश्रीत लेपाने लावावे, नंतर गार पाण्याने स्वच्छ स्नान केल्याने रंध्रे मोकळी होतात. घामावाटे दिवसभर शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडत राहतात. यामुळे शरीर हलके आणि निरोगी बनते.
चहा, चिवडा, भजी, तेलकट आणि तुपकट पदार्थ तसेच जडान्ने, शिळे अन्न, मद्य, मांसाहार सर्वथा टाळावा. याऐवजी मोड आलेले चणे, मूग, मेथ्या, द्विदल धान्याच्या उसळी किंचीत चटकदार लावून खाल्ल्याने आरोग्याचे संवर्धन होते. दुपारच्या जेवणात संतुलित सुपाचा आहार असावा. भाकरी, पोळी, कोबी, लाल टोमॅटो, कच्ची कोशिंबीर, मधुर ताक, जेवणाच्या शेवटी दही, आंब्याची किंवा चिंचेची चटणी असा आहार असावा. अशा आहारात पाणी पिण्याची गरज पडत नाही. कारण या सर्व पदार्थांत जलतत्त्व भरपूर असते. आमरसही घ्यावा. जेवणानंतर दीड दोन तासांनी माठातले वाळ्याचे पाणी प्यावे. दिवसातून पाच तांबे पाणी प्यावे. वामकुक्षीही घ्यावी.
दुपारी चार वाजता पन्हे, सरबत घ्यावे. चहा, कॉफी वर्ज्यच करावी. रात्री पोळी भाजी, कच्ची कोशिंबीर, भात आणि मूगडाळीचे वरण, असा ताजा आणि गरम आहार घ्यावा. जास्तीत जास्त ब्रह्मचर्याचे पालन करावे. कारण उन्हाळ्यात शुक्रधातू तयार होण्यास 15 दिवस लागतात.
उन्हाळयात साधारणपणे आंबट ढेकर, शौचास साफ न होणे, ताप, झोप न येणे, उन्हाळी लागणे, सर्दी, माथा दुखून येणे, डोक्यावर काहीतरी जड ठेवल्यासारखे वाटणे असे काही विकार दिसून येतात. तेव्हा यापासून काळजी घेतली तर उन्हाळा बाधणार नाही. उलट घामाद्वारे शरीरातील रोगजंतू जातात. उन्हाळा हा तसा शरीर निरोगी ठेवण्याचा काळ आहे,हे लक्षात घ्यावे.