आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखंड ध्यासपर्व बाबासाहेब पुरंदरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या आयुष्याचा 70 वर्षांहून अधिक काळ बाबासाहेब ऊर्फ बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व, प्रशासन आणि पराक्रम कथन करण्यात सार्थकी लावले आहे. पुरंदरे यांच्या मूळच्या अस्खलित, तेजस्वी वाणीला शिवचरित्र कथन करताना जी धार चढते, तो निखळ श्रवणानंद राज्यभरातील श्रोत्यांच्या आयुष्यातला कायमचा मौल्यवान ठेवा बनला आहे. मात्र पुरंदरे यांचे कर्तृत्व शिवचरित्रकथनापुरतेच मर्यादित नाही. ते अत्यंत डोळस, चिकित्सक इतिहास संशोधक आहेत. उत्तम लेखक आहेत, नाटककार आहेत, भाषेचे जाणकार आहेत. भारतीय कला, परंपरा, साहित्य, राजकारण यांचे अभ्यासक आहेत. त्यांच्या या योगदानाचा गौरव महाराष्ट्रभूषण पुरस्कार, कालिदास सन्मान (मध्य प्रदेश) यासारख्या असंख्य पुरस्कारांनी करण्यात आला आहे.
पुरंदरे यांची व्याख्याने ‘ठिणग्या’ या शीर्षकांतर्गत ग्रंथबद्ध झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या चरित्रात्मक ग्रंथाच्या कित्येक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या आणि बसवलेल्या ‘जाणता राजा’ या भव्य नाटकाचे प्रयोग शेकडोंच्या संख्येने राज्यात झाले आहेत. या नाटकाची लोकप्रियता इतकी आहे की ते हिंदी आणि इंग्रजीत अनुवादित करूनही त्याचे प्रयोग देशात अनेक ठिकाणी आणि विदेशातही झाले आहेत. इतकेच नव्हे तर नव्या पिढीच्या बच्चे कंपनीला घेऊन बाबासाहेब या वयातही गडकोटांवर फिरतात आणि त्या गडांचा इतिहास, तेथील इमारती, तेथे घडलेल्या ऐतिहासिक घटना, गडाची बांधणी, स्थापत्य, त्याची वैशिष्ट्ये, खुब्या, गडांचे लष्करीदृष्ट्या महत्त्व या सा-यांची महती पटवून देतात.
क्रियेवीण वाचाळता, हा दोष पुरंदरे यांच्या आसपासही गेल्या 90 वर्षांत फिरकू शकलेला नाही. वेदकाळापासूनचा इतिहास
त्यांना मुखोद्गत आहे. कल्पनाशक्तीचे, प्रतिभेचे वरदान लाभले आहे, पण त्या सा-याला संशोधनाच्या, अभ्यासाच्या तटबंद्या आहेत. पुराव्याअभावी ते विधान करत नाहीत आणि बोलतही नाहीत. आयुष्यभर शिवाजी महाराजांच्या चरित्राचा, कर्तृत्वाचा डोळस वेध घेण्याचा त्यांचा उपक्रमच त्यांची शताब्दीकडे होणारी वाटचाल उजळून टाकेल. या ध्यासाला परतीच्या वाटा नाहीत, म्हणूनच सदैव पुढेच जाण्याचे असिधारा व्रत स्वीकारलेल्या शिवशाहिरांना त्यांच्या शिवचरित्राच्या संकल्पसिद्धीसाठी शुभकामना.