आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅचलर ऑफ डिझाइन अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या काळानुरूप मानवाची जीवनशैलीदेखील बदलत असते. जगात निर्माण होणारे नवनवीन तंत्रज्ञान व कलाविष्कार हे मानवी जीवनशैलीवर परिणाम करत आले आहेत. अशी कालसुसंगत जीवनशैली त्या काळातील उत्पादने, वस्त्रप्रावरणे, वास्तुकला इ. माध्यमातून त्या त्या काळाची ओळख ठरलेली आहे. पूर्वी हा होणारा बदल काही दशकांनंतर अनुभवण्यास मिळत असे. परंतु 21 व्या शतकात वेगाने बदलणारे तंत्रज्ञान व माहिती क्षेत्राच्या व्याप्तीची त्यास मिळालेली जोड यामुळे आज जीवनशैलीचे स्वरूपही प्रवाही व बदलते झाले आहे. सर्व प्रकारच्या जीवनशैलीला पूरक ठरणारी उत्पादने निर्माण करण्यासाठी मोठे उद्योग समूह वेगवेगळे व्यवसाय देशात व परदेशात प्रस्थापित करत असतानाच स्वत:ची एक ओळख निर्माण करण्यासाठीची स्पर्धाही पाहायला मिळते.

याच स्पर्धात्मक वातावरणामुळे वेगळेपणा ठसवणार्‍या डिझाइन (संकल्पनविद्या) या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.
उदारीकरणाच्या धोरणामुळे भारतीय बाजारपेठेत दाखल झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांमध्ये भारतीय उत्पादने निर्माण करण्यासाठी भारतीय मानसिकता जाणणार्‍या डिझाइनर्सची मागणी विशेष प्रमाणात असते. तसेच भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय उद्योग समूहाशी स्पर्धा करताना अद्ययावत तांत्रिक बाजूंबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नावीन्यपूर्ण संकल्पना (Innovative Concepts) देऊ शकणार्‍या चांगल्या प्रशिक्षित डिझायनर्सची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील पाश्चिमात्य मक्तेदारी लक्षात घेता तेथे हे क्षेत्र बर्‍याच पूर्वी प्रस्थापित झालेले दिसून येते. त्यामुळेच भारतापेक्षा तुलनेने कमी लोकसंख्या असलेल्या देशात भारतापेक्षा कितीतरी पटीने अधिक डिझाइनर्स आहेत. उदा - इंग्लंडमध्ये ही संख्या अडीच लाख असून चीन व तैवानमध्ये ही संख्या दीड लाखाएवढी आढळते.

या पार्श्वभूमीवर भारतात ही संख्या केवळ 7000 ते 8000 एवढीच आहे. या मागणी व पुरवठ्यातील प्रचंड तफावतीचा विचार करता या क्षेत्रात काम करणार्‍या प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी मोठ्या प्रमाणावर भारतात व जागातिक स्तरावर होताना दिसते. मात्र आपल्याकडे अजूनही जनमानसात या क्षेत्राबद्दल अनभिज्ञता असल्याने उपयुक्त अशा अभ्यासक्रमांची माहिती देणे व घेणे हे आवश्यक ठरते.

या क्षेत्रातील मूलभूत पदवी बॅचलर ऑफ डिझाइन (बी. डेस) ही असून ती विविध शाखांमध्ये प्रदान केली जाते. हे शिक्षण बारावीनंतर चार वर्षांच्या प्रमाणित अभ्यासक्रमाच्या स्वरूपात भारतात उपलब्ध आहे. राष्ट्रीय डिझाइन संस्था (National Institute of Design ) तसेच भारतीय प्रौद्योगिक संस्था ( IIT) या क्षेत्रातील अग्रणी शिक्षण संस्था असून या ठिकाणी (संकल्पन विद्या पदवी समकक्ष पदविका) हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या राष्ट्रीय संस्थांबरोबरच हा अभ्यासक्रम नाशिक येथील म.वि.प्र समाजाचे वास्तुकला महाविद्यालय व सेंटर फॉर डिझाइन येथेही उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमात प्रॉडक्ट डिझाइन, इंटेरियर डिझाइन, फर्निचर डिझाइन, सेट डिझाइन अशा अनेकविध शाखांची निवड केली जाऊ शकते. येथील पदवी अभ्यासक्रम हा पुणे विद्यापीठ तसेच महाराष्ट्र शासनाने प्रमाणित केलेला आहे.

या अभ्यासक्रमाच्या पात्रतेसाठी बारावी तसेच शासन मान्य पदवि 50% गुणानिशी प्राप्त असणे गरजेचे असून संस्थेची प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे. प्रवेश परीक्षेतील कामगिरीनुसार गुण तालिके (मेरीट लिस्ट) प्रमाणे प्रवेश दिले जातात. इच्छुक विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक दृष्टिकोन, तंत्रज्ञानाची समज व काही वेगळे करून दाखवण्याची ऊर्मी असेल तर या क्षेत्रात प्रचंड वाव आहे. व्यावसायिक उपलब्धतेबरोबरच मोठ्या कंपन्यांमध्ये आकर्षक वाढीव पगाराच्या नोकर्‍याही उपलब्ध आहेत. तसेच स्वत: व्यवसाय सुरू करण्यासाठी हे शिक्षण उपयुक्त ठरते. या क्षेत्रात घेतलेली पदवी परदेशातही स्वीकृत असून इटली, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड या देशातही विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. ते नोकरीही करू शकतात.

एकंदरीतच बॅचलर ऑफ डिझाइन हा अभ्यासक्रम हा नेहमीच्या इंजिनिअरिंग तसेच आर्किटेक्चरला सक्षम पर्याय असून कला व तंत्रज्ञानाची मूलभूत आवड अंगी जोपासण्यासाठी हे एक उज्ज्वल करिअर ठरू शकते यात शंकाच नाही.