आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंबरदुखी आणि आयुर्वेद उपचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, त्रास मात्र कंबरेच्या दुखण्याचा. मग कधी कोणते तरी तेल चोळ, कधी कशाने तरी शेक घे, कोणत्याही गोळ्या घे असे नाना प्रकार वैद्याच्या सल्ल्याशिवाय चाललेले असतात. त्यामध्ये अपयश आले की मग वैद्याकडे जाऊन आपली तब्येत दाखवायची, अशी सर्वसाधारण पद्धत आढळते. कंबरदुखी नेमकी कशामुळे होत आहे याचे कारण शोधणे प्रामुख्याने आवश्यक असते. ते न शोधताच स्वतःचे स्वतः उपचार केले तर ते तापदायक ठरू शकते. म्हणून सर्वप्रथम कंबरदुखीची विविध कारणे लक्षात घेतली पाहिजेत.

कंबरदुखीची तक्रार सर्वात जास्त आढळून येते ती श्रमजीवी वर्गामध्ये. या व्यक्तींमध्ये सतत निरनिराळ्या तऱ्हेची ओझी उचलल्यामुळे कंबरदुखी निर्माण होते. (अर्थात मध्यमवर्गीयांमध्येदेखील गॅस सिलिंडरसारख्या वस्तू उचलणे, पाणी भरणे इत्यादी काही जड कामे केल्यानेही कंबरदुखी निर्माण होऊ शकते.)

सततच्या उभे राहण्याने कंबरेचे दुखणे निर्माण होऊ शकते. तसेच सततच्या बैठकीमुळेही हे दुखणे त्रास देऊ शकते. मोठे अधिकारी ज्या Executive chair वर बसतात, त्या खुर्चीचा पाठीचा कोन (Angle) सदोष असल्यास त्यामुळे या अधिकारीवर्गात पाठीच्या खालचा भाग दुखण्याचा त्रास होऊ शकतो.

दुचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यावरून सतत आणि बराच काळ दूरपर्यंत प्रवास करण्याची गरजही वाढत चालली आहे. सततच्या वाहन चालविण्याने कंबरेचे दुखणे सुरू होते आणि काहीवेळा तर वाहन चालवणे सोडायचीही वेळ काहीजणांवर येते. रस्ते चांगले नसणे, दुचाकी वाहनांचे चांगले नसणे अशी बरीच दुय्यम कारणेही कंबरदुखीस कारणीभूत ठरू शकतात.
पाठीच्या मणक्यांच्या काही विकृतीमुळे कंबरदुखी होते. मणक्यांना सूज येणे, त्यातील अंतरात बदल होणे, दोन मणक्यातील चकती सरकणे अशा कारणांनीही कंबरदुखी होते. या मणक्यांच्या बाजूला असलेली स्नायूबंधने दुखावल्यासदेखील तीव्र
स्वरूपाची कंबरदुखी निर्माण होते, म्हणून कंबरदुखी अस्थीमधील विकृतीमुळे आहे की, स्नायूंतील विकृतीमुळे आहे हे वैद्यकीय सल्लागारांना दाखवून मग ठरवावे.

शरीरातील चरबीचे प्रमाण वाढून त्यामुळे शरीराची जाडी वाढल्यानेही कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.
स्त्रीवर्गामध्ये या त्रासाचे प्रमाण फार मोठे आहे असे दिसते. गृहिणीला घरकामाचा पडणारा ताण तसेच गर्भाशयाशी संबंधित काही तक्रारी या कंबरदुखीस कारणीभूत ठरतात. यामध्ये मासिक पाळीच्या तक्रारी, अंगावर पांढरे जाणे (ज्यास श्वेतप्रदर म्हटले जाते.) अशा तक्रारी स्त्रियांमध्ये कंबरदुखी निर्माण करतात. अशाप्रकारे यापैकी कोणत्याही एक किंवा अनेक कारणांनी निर्माण झालेली कंबरदुखी मनुष्याला अस्वस्थ करते. बसताना किंवा उठताना कंबरेच्या ठिकाणी तीव्र किवा सौम्य अशा वेदना जाणवतात. शरीराची हालचाल नीट करता येत नाही आणि अशा अवस्थेत या दुखण्यावर काही उपचार आहे का असे रुग्णास वाटू लागते. अगदी सुरुवातीपासून सांगितल्याप्रमाणे हा रुग्ण बरेच प्रयोग स्वतःवरच करून पाहतो. ही गोष्ट अर्थातच चांगली नाही. कंबरदुखीसाठी आपल्या वैद्यकीय सल्लागाराचा सल्ला त्वरेने घेणे आवश्यक ठरते.

कंबरदुखीचा रुग्ण वैद्याकडे आल्यावर सामान्यतः त्या दुखण्याची कारणे शोधून काढणे हे प्रथम कर्तव्य ठरते. ते कारण मिळाल्यावर ते परत घडणार नाही याची दक्षता घेणे महत्त्वाचे ठरते.
योग्यप्रकारे विश्रांती घेणे हा या उपचारातील एक प्रमुख भाग ठरतो. आपली हालचाल नियंत्रित ठेवणे, अधिक श्रम न करणे, वजन न उचलणे या काही गोष्टी पाळाव्यात लागतात.

त्यानंतर प्रत्यक्ष उपचाराचा भाग येतो. त्यामध्ये सांधेदुखीत उपयोगी पडणारे काही गुगुळ कल्प महत्त्वाचे ठरतात. त्यामध्ये लक्षदी गुगुळ इत्यादीचा समावेश आहे. लक्षादि गुगुळ लाक्षा म्हणजे लाख नावाचे वनस्पती द्रव्य असते. कंबरेच्या ठिकाणी असलेल्या अवयवांचे (अस्थी व तत्सम घटक) व्यवस्थित रितीने पोषण करण्याचे कार्य या लाखेमुळे होतो. याचा डोस मात्र प्रकृतीनुसार ठरवावा लागतो. तेल लावून शेक घेणे हेदेखील यावर उपयुक्त ठरते. परंतु, शक्यतो वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच करावे. कारण तेल कोणत्या प्रकारचे वापरावे, शेक कसा घ्यावा याचा निर्णय कंबरेतील विकृती नेमकी कशाची आहे, हे ठरवून मग घ्यावा लागतो.

कंबरेचे दुखणे असणाऱ्यांनी आणखी महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी, ते म्हणजे निजण्यासाठी गादी वापरताना ती फोमची नसावी. वैद्यकीय सल्ल्यानुसार अगदी सपाट फळीवर निजावे. हे अर्थातच आपल्या वैद्यकीय सल्लागाराला विचारून करावे.
नेहमी बैठेकाम करणाऱ्यांनी खुर्चीच्या पाठीच्या भागात जेथे आपली पाठ आणि आसन यामधील कोन आहे, त्या ठिकाणी पातळ उशी घेऊन बसावे म्हणजे कंबरेचे दुखणे आटोक्यात येऊ शकते. स्त्रियांमध्ये असणाऱ्या कंबरदुखीची ती ती कारणे शोधून त्यावर उपचार करता येतात. अशाप्रकारे या कंबरदुखीचा विचार सर्वांगाने करता येते.
वैद्य विजय कुलकर्णी
बातम्या आणखी आहेत...