आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बागलाणची साहित्य चळवळ फुलवणारी रौप्यमहोत्सवी संस्था ‘साहित्यायन’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या समाजाचं साहित्य प्रगल्भ असतं तो समाज प्रगल्भ असतो. समाज साहित्य हे समाज जीवनाचा आरसा आहे. समाजमनातील भावभावनांचे प्रतिबिंबच साहित्यात अधोरेखित होत असते. असे साहित्य पूर्वी मौखिक स्वरूपात लोकसाहित्य म्हणून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. जात्यावरची गाणी, विवाहप्रसंगी म्हटली जाणारी गाणी, उखाणे, म्हणी, वाकप्रचार यांचा वापर दैनदिन जीवनात लोक मोठ्या करतात. ‘अहिराणी’ ही बागलाणची प्रमुख बोली भाषा आहे. या भाषेत खूप सौंदर्य आहे ‘मनी बागलाणी भाष’ या शब्दात प्रत्यक्ष ज्ञानदेवांनी या भाषेचा गौरव केला आहे. अशा या मराठीसाठी काही व्यक्ती व संस्था मिशनरी वृत्तीने काम करत असतात आणि नुसतच काम करत नाहीत तर ते त्या संस्था नावारूपालाही आणतात.

ऐतिहासिक सांस्कृतिक बागलाण :
बागलाणला फार मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. बागलाणची भूमी सुजलाम सुफलाम अशी आहे. ग्रामीण भागात आजही लोकसाहित्याचे जतन होत असलेले आपणास दिसून येते. कानबाई, डोंगºयादेव, धोंड्या आडीजागरण, पोवाडा, गौराई, फुणकं, भुलाबाई, घट स्थापना अशा प्रकारचे अनेक धार्मिक विधी व उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. अशा या लोकसाहित्याने समृद्ध भूमीत 1950 मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सटाणा येथे आलेले डॉ मोहन माजगावकर यांनी प्रा. शं. क. कापडणीस व इतर काही साहित्यावर प्रेम करणाºया रसिक मंडळींना एकत्र करून एक मंडळ तयार केलं.

एकदिवसीय साहित्य संमेलनही :
त्यांच्यात आपसात साहित्य चर्चा होऊ लागली. एकमेकांनी लिहिलेलं, वाचलेलं यावर चर्चा होऊ लागली आणि यातूनच सप्टेंबर 1987 मध्ये कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणेने त्यांच्याच अध्यक्षतेखाली पहिले एकदिवसीय साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाच्या निमित्ताने स्थानिक परिसरातील तसेच बाहेरगावाहूनही लोक येऊ लागले. भरभरून प्रतिसाद मिळू लागला. नामांकित कवी, लेखक मंडळींना जवळून पाहण्याची व ऐकण्याची संधी ग्रामीण भागातील तरुण रसिक श्रोत्यांना मिळू लागली. त्यांची साहित्याची आवड वाढू लागली.

साहित्यायनच्या व्यासपीठावर मान्यवर :
आजपर्यंत साहित्यायनच्या व्यासपीठावर ना. धो. महानोर, डॉ. आनंद यादव, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, वसंत बापट, शंकर वैद्य, विद्याधर गोखले, विजय कुवळेकर, वसंत कानेटकर, प्रवीण दवणे, शंकर सारडा, रामचंद्र देखणे, सदानंद मोरे, कुमार केतकर, अरुण साधू आदी मान्यवरांनी अध्यक्षस्थान भूषविले आहे.

गेल्या वर्षी पार पडले 20 वे साहित्य संमेलन :
या मान्यवर मंडळींचे साहित्यविचार ऐकण्यासाठी रसिक मोठ्या संख्येने जमतात. एक प्रकारे साहित्य पंढरीच्य वारकर्‍यांचा हा मेळा असतो. साहित्यविषयक चर्चा, परिसंवाद, काव्यवाचन हे ऐकून रसिक तृप्त मनाने परततात. ते पुढील संमेलनाची वाट पाहात. गेल्या वर्षी साहित्यायनचे 20 वे संमेलन पार पडले. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.

साहित्याची बीजे पेरलेल्या या मातीला साहित्यायनच्या रूपाने प्रकाश मिळाला. अनेक कवी, लेखक यांना लेखनाची ऊर्मी प्राप्त झाली. अनेक मान्यवरांचे साहित्य या व्यासपीठावर प्रकाशित होऊ लागले. डॉ. दिलीप धोंगडे, प्रा. शं क. कापडणीस, डॉ. एकनाथ पगार, डॉ. कमल आहेर, डॉ. सुधीर देवरे, प्रा, पी. एस. परचुरे, किरण दशमुखे, सीमा सोनवणे, शांता पवार आदी लेखक - कवींची पुस्तके प्रसिद्ध झाली. नवोदित कवींना वाव मिळावा म्हणून ‘साहित्यायन’ दरवर्षी एक स्मरणिका प्रसिद्ध करीत असते. तिला वेगवेगळी नावे देण्यात येतात. यात नवोदित कवींच्या कवितेला अग्रक्रम देण्यात येतो.
अशा प्रकारे गेल्या 25 वर्षांपासून ही संस्था बागलाण तालुक्यात साहित्य सेवेची धुरा मोठ्या नेटाने वाहत आहे. शारदेची पालखी वाहून नेण्यास हे काम अनेक रसिक मान्यवर करीत आहेत. या पालखीचे भोई होण्यात धन्यता मानणार्‍यांनी या चळवळीत सहभागी व्हावे, अशी ‘साहित्यायन’ परिवाराची अपेक्षा आहे.‘साहित्यायन’ने बागलाणच्या जनमाणसांवर आपल्या कार्याचा एक आगळा वेगळा ठसा उमटविला आहे. माउलींच्या शब्दात सांगायचे तर ‘इवलेसे रोप, लावियेले द्वारी तयाचा वेलू गगनावरी’