आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रणातला 'बैजू बावरा'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन्यजीव छायाचित्रणात किती वर्षांपासून आहात? करिअर म्हणून या क्षेत्राची निवड कशी केली?
मी एक छंद म्हणून फोटोग्राफीला सुरुवात केली होती आणि अजूनही छंद म्हणूनच फोटो काढतो. या क्षेत्रात जवळजवळ 10-15 वर्षांपासून आहे. त्या आधी मी एक चांगला चित्रकार आहे. चित्रकलेतली रंगांची जाण आणि आवड मला माझ्या या फोटोग्राफीसाठी पूरक ठरली आहे. पुढे फोटोग्राफीमध्येच रमलो, तेच प्रोफेशन झालं. मी औरंगाबादचा. हे एक ऐतिहासिक शहर आहे. इथे किती तरी प्रेक्षणीय स्थळे आहेत. लहानपणापासून जेव्हा जेव्हा आम्ही अशा एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यायला जायचो, तेव्हा परदेशी पर्यटकांच्या गळ्यातले वेगवेगळे कॅमेरे बघून मलाही असा एखादा कॅमेरा हवा, असं वाटायचं. त्या ध्यासाचा परिणाम म्हणून माझ्याकडे कॅमेरा आला, मी फोटो काढायला लागलो आणि मी काढलेले फोटो लोकांना आवडायला लागले. त्यामुळे मलाही एक प्रकारची ऊर्जा मिळाली. आपण वेगळं, चांगलं काम करत आहोत, हे जाणवलं. त्यानंतर मी अभ्यास करायला सुरुवात केली. त्यासाठी मी बंगळुरू, मुंबई, सिंगापूरला आणि दिल्लीला गेलो. तिथे सगळीकडे बरंच शिकलो. माझ्या लक्षात आलं, की मी माझ्या अनुभवातून आतापर्यंत बरीच मजल मारली आहे. माझे अनुभव मला बरंच शिकवून गेले आहेत. जाणवलं, की या पाच वर्षांत मी जे जे मिळेल ते घेत गेलो, घडत गेलो. तेव्हा प्रत्येकाने स्वत:तच स्वत:चा गुरू शोधावा.

वन्यजीव छायाचित्रण हे जसं धाडसाचं तसंच धोक्याचंही काम. यातला असाच एखादा अविस्मरणीय अनुभव सांगा.
वाइल्डलाइफ फोटोग्राफी करायची म्हणजे युद्धावर जायच्या शारीरिक आणि मानसिक तयारीनेच जायला हवं. तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असायलाच हवं. वाइल्डलाइफ फोटोग्राफीसाठी प्रचंड पेशन्स ठेवायला हवा. निसर्गाचा एक भाग बनून वावरायला हवं. माझ्या आल्बममध्ये दोन सरड्यांच्या भांडणाचा एक फोटो आहे. या फोटोला ‘कॅननबेटर फोटोग्राफी फोटोग्राफर ऑफ द इयर 2011’चा पुरस्कार मिळाला आहे. फॅन थ्रोटेड लिझार्ड जातीचा सरपटणारा सरडा एका मादीला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करतो. त्याचा हा प्रयत्न पाहून दुसरा एक सरडा त्याच्यावर हल्ला करतो. जिवाच्या आकांताने सुरू झालेली त्यांची झुंज मी कॅमेर्‍यात टिपली. हे छायाचित्र जगभरातील 70 हजार छायाचित्रांतून निवडलं गेलं होतं.

हा फोटो काढण्यासाठी मी जवळपास तीन वर्षे तिथे जात होतो. शेवटी त्या सरड्यांना माझी सवय झाली. माझ्या असण्याने ते बिचकत-घाबरत नव्हते. त्यामुळे मला हा फोटो काढता आला. लडाखला पेंगाँग लेक आहे, तिथे ब्राउन नेटेड गल्स हे मायग्रेटरी बर्ड्स येतात. लेकचं पाणी म्हणजे नुकताच वितळलेला बर्फ. पण माझी जिद्द होती. तिथे उभं राहून मला त्या पक्ष्यांचा पाण्यात असतानाचाच फोटो काढायचा होता. माझ्याकडे कोणतीही हायटेक साधनं नव्हती. मी ट्रायपॉड लावून सरळ त्या बर्फगार पाण्यात शिरलो. इच्छित जागी जाऊन कॅमेरा सेट केला आणि तब्बल 25-30 मिनिटे कमरेपर्यंत अशा गोठवून टाकणार्‍या पाण्यात उभा राहिलो. फोटो काढले. जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा मात्र माझी अवस्था बिकट होती. माझं संपूर्ण शरीर बधिर झालं होतं. माझ्या गाइडनं मला लगेच ब्लँकेटमध्ये लपेटलं आणि गाडीतला हीटर चालू करून गरमगरम चहा प्यायला दिला, तरी नंतर माझी गाडी रुळावर यायला तीन तास लागले.

तुमचं ‘वाइल्डस्केप’ नावाचं पुस्तक आहे. या पुस्तक प्रकाशनामागची कथा काय आहे?
औरंगाबादला एकदा एका क्रिकेट सामन्याचे मी फोटो काढत होतो. सोबत माझा कॅमेरा, वेगवेगळ्या टेलिलेन्सेस होत्या. तिथे खासदार विजय दर्डा आले होते. त्यांनी माझी चौकशी केली. त्यांना मी माझ्या वाइल्डलाइफ फोटोग्राफीबद्दल सांगितलं. त्यांनी माझे फोटो बघायची इच्छा व्यक्त केली. मी त्यांना ते दाखवले. त्यांनी त्यांच्या काही परदेशी मित्रांनाही माझे फोटो दाखवले. तेही फारच प्रभावित झाले. या सगळ्या फोटोंच्या संग्रहाचं पुस्तक का काढू नये, असं दर्डाजींनी सुचवलं. मलाही असा काही प्लॅटफॉर्म हवाच होता. या पुस्तकामध्ये बर्‍याच दुर्मिळ प्राणी आणि पक्ष्यांच्या वागणुकीच्या निरीक्षणाच्या नोंदींचाही समावेश केला गेला. लोकमत प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरसुद्धा या पुस्तकाचं खूप कौतुक झालं आहे. आता अंडरवॉटर छायाचित्रणाचं पुस्तक मी काढतोय.

नव्याने फोटोग्राफीकडे वळणार्‍या लोकांना काय सल्ला द्याल?
पहिली गोष्ट म्हणजे, फोटोग्राफी हा अतिशय महागडा छंद आहे. कॅमेरे, लेन्सेस आणि इतर अ‍ॅक्सेसरीज हे सगळं प्रचंड महाग असतं. आपल्याच खिशातून हा पैसा खर्च करावा लागतो. तो परत मिळणारच नाही, हे माहीत असायला हवं. त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून जर याकडे बघत असाल तर ते अगदी चूक आहे. हां, तुम्ही व्यवस्थित स्टुडिओ सुरू केला असेल, तर तुम्हाला नक्कीच त्यातून पैसा मिळेल. मी असंच करतो. माझं नेक्स्ट मिशन प्लॅन झालं, की, मी माझ्या स्टुडिओमध्ये काम करतो. त्यासाठी लागणारा पैसा जमवतो. प्रसंगी सायकलवर ये-जा करून पेट्रोलचेसुद्धा पैसे वाचवतो. पैसे जमा झाले, की मी माझ्या मिशनवर जायची तयारी करतो. तर या छंदाकडे वळताना तुम्ही अर्थार्जनासाठी दुसरं काही तरी करणं गरजेचं आहे, यातून अर्थार्जन होईल ही अपेक्षा ठेवू नये. दुसरं म्हणजे, आपल्या भारतातील निसर्गाचे फोटो काढूया म्हटलं, तरी आपल्याकडे एवढी विविधता आहे की, आपला एक जन्म अपुरा पडेल. त्यासाठी परदेशात जायची गरज नाही.

तुमच्या या मिशनला एखादा प्रायोजक किंवा सरकारी मदत मिळते का?
नाही मिळत. माझ्यासारख्या फोटोग्राफरना जर पूर्ण वेळ काम करता आलं आणि असे अजून निसर्गातले कित्येक दुर्मीळ क्षण टिपता आले, तर किती तरी जास्त आणि चांगलं काम होईल. पण आम्हाला आमचा चरितार्थ चालवण्यासाठी नोकरी-व्यवसाय करावा लागतो. पैसा जमवावा लागतो. मग आम्ही मिशनवर जाऊ शकतो. जर सरकारने वाइल्डलाइफ फोटोग्राफरसाठी प्रोत्साहनपर काही योजना सुरू केली, तर ती नक्कीच स्वागतार्ह असेल.
(कामिनी फडणीस-केंभावी यांनी मायबोली.कॉमच्या हितगुज 2013 दिवाळी अंकासाठी घेतलेल्या मुलाखतीचा संपादित अंश.