आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बैठकीच्या लावणीतील घरंदाज भावकामाचा गौरव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील रसिकमनांचे ‘लावणी’ या लोककला प्रकाराशी घट्ट नाते आहे. लावणीचे विविध प्रकार आपल्याकडे प्रचलित होते. त्यात गणाची, कृष्णाची, टाकणीची, वगाची, फार्साची, भेदिक, ऐकीव, आख्यानपर, फडाची, उपदेशपर, विनोदी, सामाजिक, स्थलवर्णनपर, चित्रपटातील, लोकनाट्यातील असे वैविध्य आहे. या सा-यांत बैठकीच्या लावणीचे स्वत:चे असे एक खास स्थान आहे. मुख्य म्हणजे ही लावणी नावाप्रमाणेच बसून सादर केली जाते. घुंगरू बांधून नृत्य करत ती म्हटली जात नाही. मात्र, अतिशय दर्जेदार अभिनयाने, हस्तमुद्रांनी ती दर्शवली जाते. बैठकीच्या लावणीतील शब्दानुसार केल्या जाणा-या या अभिनयाला भावकाम अशी संज्ञा आहे आणि यमुनाबाई वाईकर यांचा या भावकामात हातखंडा आहे. आज वयाच्या 80 नंतरही बाईचा अभिनय आणि भावकाम त्यांच्या वयाकडे दुर्लक्ष करायला रसिकांना भाग पाडतो इतका प्रभावी आहे.
महाबळेश्वरजवळच्या नुनेकलमे गावात यमुनाबाईचा जन्म कोल्हाटी समाजात झाला. नाचगाणं रक्तातच होतं. आई गीताबाई आणि वडील विक्रम जावळे तमाशातच काम करायचे. सुरेल गायकी बाईना आईकडून मिळाली. आवाजाची उपजत देणगी असली तरी स्वत:च्या मेहनतीने त्याला पैलू पाडले ते त्यांनी स्वत:च. तिन्ही सप्तकात लीलया फिरणारा, धारदार पण सुरेल गळा आणि जाणतेपण आल्यावर जमून आलेले भावकाम यावर बाईच्या कलाजीवनाची बुलंद इमारत उभी राहिली. आईकडून त्यांनी पारंपरिक बैठकीच्या लावण्या शिकून घेतल्या. त्या काळी 1937-40 च्या सुमारास धावत्या लावणीइतकीच बैठकीच्या लावणीलाही मागणी होती. बाईनी एकलव्याच्या निष्ठेने इतरांचे तमाशे, लावण्या ऐकल्या आणि आत्मसात केल्या. भावकाम, हातांची अलवार हालचाल, लावणीतला सारा आशय बैठकीत बसून केवळ देहबोलीतून प्रभावीपणे व्यक्त करायला त्या शिकल्या. लावण्यांसह गझल, कव्वाली, ठुमरीही त्या शिकल्या. खर्जातला त्यांचा आवाज तनाईत सुरू झाली की गोडव्याचे अवगुंठण घ्यायचा. त्यांचा हा आवाज आजही टिकून आहे. त्यांच्या सुरेल गायनाला दाद द्यावी की, त्यांच्या अजोड भावकामाला द्यावी अशा संभ्रमात रसिक वारंवार पडत, असे बुजुर्ग त्यांच्याविषयी म्हणत असत. मुंबईत संघर्षाचा काळ संपत असतानाच त्यांनी यमुना-हिरा-तारा वाईकर ही पार्टी सुरू केली. 1942 मध्ये त्यांच्या या पार्टीचा पहिला कार्यक्रम रंगला. नंतरची सुमारे 25 वर्षे बाईनी आपले साम्राज्य निर्माण केले.
दरम्यानच्या काळात बाईनी शास्त्रीय संगीताचीही तालीम मिळवली. सहा महिने त्या पुरिया शिकत होत्या. या तालमीचा वापर त्यांनी लावणी गायनात असा केला की, बैठकीच्या लावणीला अभिजात गायकीच जणू येऊन मिळाली. लावणीत त्यांनी दमदार ठेका, गायकी अंग आणले. गिरकी ताना, हरकती, आलापही त्या करत. 1970 नंतर मात्र बाईनी फडात, बारीत लावण्या गाणं बंद केलं. काही मोजक्या ठिकाणीच त्या कार्यक्रम करत असत. मुंबईतल्या हनुमान थिएटरचे मालक मधुकरशेठ नेराळे यांच्या प्रयत्नांतून गेल्या वीस-पंचवीस वर्षांत पुन्हा बाईची बैठकीची लावणी संगीतातील जाणकारांसमोर आली. आजतरी पारंपरिक पद्धतीने बैठकीची लावणी गाणा-या त्या एकमेव गायिका आहेत. त्यांच्याजवळचा हा ठेवा जतन करण्याची गरज आहे.
बाईच्या काही गाजलेल्या लावण्या
अर्धा विडा आपण घ्यावा, अर्धा मला द्यावा
सोडा सोडा नाद सवतीचा
पंचकल्याणी घोडा अबलख
कुठवर पाहू वाट सख्याची

पंडित बिरजू महाराजांची दाद
पुण्यातल्या एका कार्यक्रमात पं. बिरजू महाराज यांनी मला एक ठुमरी गायला सांगितली आणि त्यावर ते अदा करत होते. ते पाहून रसिकांप्रमाणेच मीही भारावून गेले. शेवटच्या आवर्तनात मी, बाजूबंद खोलो हो रामा, कान्हा मुखसे ना बोलो...ही ठुमरी म्हटली आणि महाराजजींकडे पाहून हातावर अलगद टाळी वाजवली. त्यांना डोळ्यांनी असं काही खुणावलं की महाराजजींसकट सारं पब्लिक खुळावलं...महाराजजी धावत आले. म्हणाले, ‘आप ने क्या गाया और किया है. ऐसी चीज और अदा मैने आज तक नहीं देखी, न सुनी. आप तो मेरी माँ है...’
jayashree.bokil@mh.bhaskarnet.com