आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीमेवरच्या मायमराठीचे सारस्वतांना वावडे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटकातील मराठी साहित्यिकांनी मराठी साहित्य विश्वाची वर्षानुवर्षे इतकी सेवा करूनही महाराष्ट्रातल्या नामांकित साहित्यिक व्यासपीठावर त्यांना कधी सन्मानाने आमंत्रित केले नाही. कोणत्या प्रस्थापित वाङ‌्मयीन नियतकालिकाने त्यांचे लेखन कधी आवर्जून मागवून घेतले नाही. मराठी वाङ‌्मयाचा आत्तापर्यंत जो इतिहास लिहिला गेला त्यामध्ये कोणाची दखल घेतली नाही.
परराज्यात राहून मायमराठीची सेवा करण्यासाठी आपले अख्खे आयुष्य वेचलेल्या डॉ. भालचंद्र शिंदे व व्यंकटेश वळसंगकर या दोघांचाही मराठी साहित्य विश्वावर आक्षेप आहे. जिथे साधे मराठी वर्तमानपत्रही पोहोचत नाही, अशा कर्नाटकातल्या गुलबर्गा या ठिकाणी राहून कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद ही संस्था चालवणे, या परिषदेतर्फे साहित्य संमेलन घेणे, ‘माझी मराठी’(पूर्वीचे नाव अनुबंध) हे त्रैमासिक नियमित प्रकाशित करणे, कर्नाटकातल्या मराठी बांधवांना ‘मराठी साहित्य’ या एका गोष्टीवर एकसंघ बांधून ठेवणे यांसारख्या गोष्टी आयुष्यभर करूनही मराठी साहित्य विश्वाने साधी दखलही घेऊ नये, याची खंत या दोघांना आहे. हे दोघे प्रातििनधिक स्वरूपात आहेत; असे बरेच मराठीचे शिलेदार बिदर, धारवाड, भालकी, औराद (बाऱ्हाळी), हुमणाबाद, बसवकल्याण, गदग या ठिकाणी आहेत, जिथे मराठी संस्कृतीसोबतच त्यांनी मराठी साहित्यही जिवंत ठेवले आहे.

परभाषिक राज्यात राहून या लोकांनी आपले मराठीपणच जिवंत ठेवले असे नाही, तर मराठी साहित्याची ज्योतही तेवत ठेवली आहे. जिथे मराठी छापायला कोणी तयार होत नाही, तिथे व्यंकटेश वळसंगकरांनी स्वत:ची नऊ पुस्तके प्रकाशित केली आहेत. कर्नाटकात राहून मराठीशी, महाराष्ट्राशी आपली नाळ तुटू दिली नाही. पूर्वी गुलबर्गा येथे अगदी कमी संख्येने काहीच मराठी वर्तमानपत्रे मिळायची. ती वृत्तपत्रे वाचण्यासाठी इथले मराठीजन अक्षरश: तुटून पडायचे, जमेल तेवढे अधाशासारखे या वृत्तपत्रातून लेखन करायचे, हे कर्नाटकातील तमाम लेखक, कवींचे काम! पण आता एकही मराठी वर्तमानपत्र गुलबर्गा येथे मिळत नाही. कोणी पाहुणा, आप्तेष्ट, मित्र महाराष्ट्रातून येत असेल तर भेटवस्तू किंवा खायला काही आणण्यापेक्षा मराठी वृत्तपत्रे घेऊन या, असे हे लोक आवर्जून सांगतात. गेली पंचवीस वर्षे झाली, भालचंद्र शिंदे हे मराठीच्या अध्यापनाबरोबरच समीक्षात्मक लेखन सातत्याने करत आहेत. ‘माझी मराठी’ हे दर्जेदार त्रैमासिक (मुखपत्र) नेटाने चालवत आहेत. प्रसंगी पदरमोड करावी लागते, पण आपला ध्यास त्यांनी सोडला नाही. इतकं असूनही मराठी सारस्वतांनी नेहमीच परक्यासारखी वागणूक आम्हाला दिली आहे; असे ते जेव्हा म्हणतात, तेव्हा तमाम मराठी प्रस्थापित साहित्यिकांना व साहित्य संस्थांना ती एक सणसणीत चपराक असते.

मराठी साहित्य विश्वाची इतकी सेवा करूनही महाराष्ट्रातल्या नामांकित साहित्यिक व्यासपीठावर त्यांना कधी सन्मानाने आमंत्रित केले गेले नाही. कोणत्या प्रस्थापित वाङ‌्मयीन नियतकालिकाने त्यांचे लेखन कधी आवर्जून मागवून घेतले नाही. कोणत्याही प्रकाशन संस्थेने त्यांची पुस्तके छापण्याचे औदार्य कधी दाखवले नाही. मराठी आकाशवाणीच्या कोणत्याच केंद्राने त्यांना कधी संधी दिली नाही. शालेय किंवा विद्यापीठीय अभ्यासक्रमात त्यांच्या एखाद्या ओळीचाही कधी समावेश झाला नाही. मराठी वाङ‌्मयाचा आत्तापर्यंत जो इतिहास लिहिला गेला, त्यामध्ये कोणाची दखल घेतली नाही. या सर्वांमुळे शिंदे-वळसंगकर आणि कर्नाटकातील मराठी लेखक, कवी व्यथित होतात. पण मायमराठीची सेवा आपल्या परीने करता आली, यासाठी ते खूप समाधानीही असतात. कोणी दखल घेवो अगर न घेवो; पण मराठीसाठी आमच्या परीने आम्ही योगदान दिले आहे, असे ते प्रामणिकपणे म्हणतात.

कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, गुलबर्गा ही संस्था मराठी साहित्य महामंडळाची संलग्न संस्था आहे. त्यामुळे या संस्थेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडीसाठी एकूण ५० मतांचा अधिकार आहे. आत्तापर्यंतच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी व उमेदवारांनी या ५० मतांचा फक्त खोटी आश्वासने देऊन उपयोग करून घेतला आहे. प्रचारादरम्यान हे उमेदवार गुलबर्गा येथे आवर्जून भेट देतात. तुमच्यासाठी असे करू, तसे करू, अशी आश्वासने देतात आणि एकदा ही ५० मते मिळवून िनवडून आले, की कधीच या कर्नाटकातील गुलबर्गा येथे फिरकत नाहीत. भालचंद्र शिंदे तर म्हणाले की, मतपत्रिका परत देईपर्यंत दररोज फोन करणारे उमेदवार मतपत्रिका मिळाली की साधा कधी फोनही करत नाहीत. निवडून आल्यानंतरसुद्धा परत संपर्क करत नाहीत. या ५० मतांचा आम्हाला फायदा एवढाच होतो की, कधीतरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एखाद्या कवीचे नाव देता येते. साहित्य महामंडळानेसुद्धा या घटक संस्थेसाठी काही ठोस कार्यक्रम कधी दिला नाही.

कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेतर्फे कर्नाटकात मराठी साहित्य संमेलने घेतली जातात. आतापर्यंत गो. म. कुलकर्णी, इंदिरा संत, कृ. ब. निकुंब, वि. पां. देऊळगांवकर, भगवंत देशमुख इत्यादींच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलने पार पडली आहेत. गुलबर्गा, धारवाड, बिदर, भालकी, औराद (बाऱ्हाळी), हुमणाबाद, बसवकल्याण, गदग इत्यादी ठिकाणी ही साहित्य संमेलने झाली. कर्नाटकातील मराठी साहित्य रसिकांचा उदंड प्रतिसाद या साहित्य संमेलनांना मिळतो, पण ५० मते घेणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नंतर या संमेलनाचे निमंत्रण देऊनसुद्धा इकडे कधी फिरकत नाहीत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी व तसेच प्रस्थापित मराठी साहित्यिकांनी मराठीच्या या साहित्य उत्सवात सहभागी व्हावे व आमचा उत्साह वाढवावा, आम्हाला प्रेरणा द्यावी, एवढेच यांचे म्हणणे असते; पण तेही कधी पूर्ण होत नाही.

भालचंद्र शिंदे, व्यंकटेश वळसंगकर यांच्याबरोबरच गुरय्या स्वामी, बी. ए. कांबळे, प्रभाकर सलगरे, विजयकुमार चौधरी, वंदना किणीकर, कमलादेवी शुक्ला, विजया तेलंग, माणिक चव्हाण, कमला वाघमारे, इंदुमती सुतार, बी. आर. मुंगळे, अनंत कदम, द. रा. पुरंदरे, वसंत कुलकर्णी आदी कर्नाटकातील या मराठी लेखक, कवींची सेवा अजून अखंडपणे सुरूच आहे. यापैकी काही जणांनी ५० मतांमुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपला सहभाग नोंदवला आहे. पण ते तेवढ्यापुरतेच. नंतर कोणी कधी विचारत नाही. गुलबर्गा, बसवकल्याण, बिदर पट्ट्याला मराठवाडा व सोलापूर जिल्हा जवळचा आहे. मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याबाबत या लोकांमध्ये आपुलकी आहे. म्हणून यांना वाटते की, मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे जी साहित्य संमेलने होतात किंवा साहित्यविषयक जे कार्यक्रम होतात, त्यांना आम्हाला बोलावलं जावं. कारण आम्हीही मराठी लेखक, कवी आहोत. परराज्यात असतो हा काय आमचा गुन्हा झाला का? असा त्यांचा सवाल आहे. असे सोलापूरच्या बाबतीतही आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात कन्नड भाषिक लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे या जिल्ह्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जे कार्यक्रम होतात त्यात आम्हाला सहभागी होता यावे, त्यांची निमंत्रणे आम्हालाही यावीत. भौगोलिकदृष्ट्या सोलापूर जिल्हा दळणवळणासाठी सोयीचा आहे, त्यामुळे त्यांची ही अपेक्षा रास्त आहे.

खरे तर कर्नाटक-महाराष्ट्र ही सीमारेषा साहित्यापुरती तरी आपण पुसून टाकायला हवी. मराठवाडा साहित्य परिषदेने आपले आठ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र वाढवून गुलबर्गा आणि बिदर या दोन जिल्ह्यांचा समावेश आपल्या कार्यक्षेत्रात करायला काय हरकत आहे? एकट्या मराठवाड्याच्याच का अख्ख्या महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या मराठी लेखक, कवींना आपल्यात सामावून घ्यायला हवे. किमान साहित्यापुरते तरी कुठले बंध किंवा सीमा यांच्या मर्यादा नसाव्यात. साहित्य हे प्रदेश, भाषा, देश यांच्या बंधनाच्या पलीकडचे असते. साहित्याला असली कुठली बंधने नसतात. आपल्याच मराठी बांधवांना या साहित्य व्यवहारात सामील करून घ्यायला आपण का तयार नाही? मराठीतच लिहिणाऱ्या लेखक, कवींना मराठी सारस्वतांनी आपली दखल घेतली नाही, अशी खंत का वाटावी? मराठीवरच आक्षेप का घ्यावासा वाटावा?

खरे तर विचार करायला लावणारी व प्रस्थापित मराठी लेखक, कवी आणि प्रस्थापित मराठी साहित्य संस्थांसमोर हे एक मोठे आव्हान उभे करणारी परिस्थिती आहे. आयुष्यभर मायमराठीची सेवा करणाऱ्या या लेखक, कवींना आयुष्याच्या शेवटच्या काळात वाटणारी ही खंत दूर करण्याचे खरे आव्हान आता तमाम मराठी साहित्य विश्वापुढे उभे आहे. ज्याने-त्याने आपल्या परीने आता पावले उचलायला हवीत, नाहीतर मराठी विश्व साहित्य संमेलन घेण्याच्या या काळात (की नादात?) आपले मराठी बांधवच आपल्याकडून दुर्लक्षित राहायला नकोत.
बालाजी मदन इंगळे
balajimingale@gmail.com
बातम्या आणखी आहेत...