आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अघळपघळ संमेलनात लैच प्रतिभावंत 42 कवी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलाप्रिय महाराष्ट्राच्या महन्मंगल भूमीत सिनेमा-नाटकांच्या खालोखाल लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे कविसंमेलने. सांप्रत सर्व प्रकारच्या कलावंतांच्या तुलनेत ‘कवी’ ही व्यक्ती संख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रभर सर्वाधिक मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे गावोगावी घाऊक कवींचे संमेलन भरवणे हा खेळ अत्यंत तेजीत चालतो. ‘काही घडले की घ्या कविसंमेलन’ असाच खाक्या गावोगावी चालत असलेला दिसून येतो.
कलाप्रिय महाराष्ट्राच्या महन्मंगल भूमीत सिनेमा-नाटकांच्या खालोखाल लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे कविसंमेलने. सांप्रत सर्व प्रकारच्या कलावंतांच्या तुलनेत ‘कवी’ ही व्यक्ती संख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रभर सर्वाधिक मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे गावोगावी घाऊक कवींचे संमेलन भरवणे, हा खेळ अत्यंत तेजीत चालतो. घरटी किमान एक कवी, असे सामान्यपणे महाराष्ट्रात कवींचे होलसेल प्रमाण असल्याचे कुणीतरी प्राध्यापकाने ‘पीयेचडी’च्या अतोनात अभ्यासपूर्ण प्रबंधात लिहून सिद्धच केल्याचे आपल्याला माहीतच असेल. त्यामुळे ‘काही घडले की, घ्या कविसंमेलन’ असाच खाक्या गावोगावी चालत असलेला दिसून येतो. इंग्रजी-मराठी नवं वर्ष लागणं, शिमगा म्हणजे होळी, रंगपंचमी, दिवाळी, पाडवा, कोजागरी असल्या दिवशी गावोगावी कवींचे जथ्थेच्या जथ्थे कविसंमेलनासाठी हिंडताना आढळतात. काही पुढार्‍यांना आपल्या रसिकतेवर मोहोर उठवून हवी असते. अशांचे स्वत:चे वाढदिवसही तत्सम लोक कविसंमेलने भरवून साजरे करताना दिसतात. कविसंमेलने भरवणे सर्वांनाच सोयीचे असते. कारण नामचीन कवी सोडले, तर बाकी कवी केवळ ‘कविता वाचू दिली जातेय’ एवढ्यावरच खुश होऊन स्वखर्चाने ‘फुकटात’ संमेलनाला हजर राहतात.
काही दिवसांपूर्वी एका आमदाराने आयोजित केलेल्या साहित्य संमेलनातल्या कविसंमेलनात मी स्वत:च निमंत्रित होतो. कार्यक्रमपत्रिकेमध्ये एकूण बेचाळीस कवींची नावे छापलेली होती. एवढ्या बेचाळीस कवींचा सहभाग असलेल्या कविसंमेलनासाठी संध्याकाळी साडेचार ते सहा असा ऐसपैस आणि अघळपघळ तब्बल (!) दीड तासांचा वेळ उपलब्ध करून दिलेला होता. सहा ते सात या वेळेत संमेलनाच्या अध्यक्षा आणि एक मंत्रिमहोदय, दोनेक आमदार महोदय, एक झेडपी अध्यक्ष महोदय आणि इतर अनेक स्थानिक महोदयांच्या महनीय उपस्थितीत समारोपाचे सत्र होणार होते. त्यानंतर गावातल्या शाळेतल्या मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऊर्फ सांस्कृतिक कार्यक्रम होता.
तर गंमत अशी झाली की, कविसंमेलनापूर्वीचे कथाकथनाचे सत्रच मुळात सहा वाजता संपले. मग घाई करून समस्त कवींचा जथ्था हाक-हाकून स्टेजवर नेण्यात आला. जागा सापडेल तिथे दाटीवाटीने आम्ही लैच प्रतिभावंत बेचाळीस कवी स्टेजवर स्थानापन्न वगैरे झालो. मग आधीच उशीर झाल्यामुळे कावलेल्या सूत्रसंचालकांनी अत्यंत घाईघाईने ‘अमुक कवीचे स्वागत, आमच्या संस्थेतील प्राध्यापक अमुक सर करतील...’ असा दरेक कवीसोबत एकेका प्राध्यापकाचे नाव घेऊन, स्वागत समारंभ चालू केला. काही क्षण स्टेजवर एकाच वेळी ऊठ-बस करणारे चारचार-पाचपाच कवी आणि त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यासाठी स्टेजवर चढ-उतर करणारे चारचार-पाचपाच प्राध्यापक, असे अत्यंत हातघाईवर आलेले दृश्य दिसू लागले. शिवाय दरेक कवी-प्राध्यापकाची जोडी फोटोसाठी पोझ देऊन कॅमेर्‍याला पक्की नजर भिडवून स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यासारखी निश्चल उभी राहून फोटोचा फ्लॅश चमकेपर्यंत अजिबात हलत नव्हती.
हा सगळा ‘पानपता’सदृश गोंधळ पाहून दिवसभर साहित्यिकांसारख्या असंगांशी संग करावा लागल्याने अतोनात कावलेले आयोजक आमदार महोदय जास्तीच कावून गेले आणि त्यांनी सूत्रसंचालकाला बोलावून ‘मार्गदर्शन’ केल्यानंतर सूत्रसंचालक महोदयांनी ‘झाले तेव्हढ्या कवींचे स्वागत पुरे झाले. उरलेल्या सन्माननीय कवींचे स्वागत कार्यक्रमाच्या मध्यंतरात लैच सन्मानाने करण्यात येईल,’ असे जाहीर करून ‘आता कवींनी कविसंमेलन ‘च्यालू’ करावे,’ असा संयोजकीय हुकूम देऊन माइक स्टेजवरच्या सूत्रसंचालकाकडे सुपूर्द केला. दुसर्‍या किंवा तिसर्‍याच कवीने ‘आमचे आमदार’ नावाची कविता खड्या आवाजात सादर करून तिच्यात आमदारसायबांच्या आजवरच्या कार्यकर्तृत्वाचा समग्रपणे आढावा घेतला. सदर कवितेत एक ओळ ‘अशोकरावाला शिकविला धडा हो...’ अशी होती. एकूण कविसंमेलनाचा रोख त्यानंतर अनेक कवींच्या लक्षात आला असावा, कारण नंतरही ‘आमदार’ या विषयावर आणखी दोन कविता सादर केल्या गेल्या. मग काही प्रेमकविता, काही ‘कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी गांजाची शेती का करू नये?’ असा ‘आजचा सवाल’ विचारणार्‍या कविता (या कवीचे ऐकून कुणी गांजाची शेती केलीच आणि त्याला पोलिसांनी धरलेच, तर त्यात या कवीच्या काकाचे काय जाणार होते?).
तासाभरात दहा की बारा कवींच्या कविता गाऊन किंवा वाचून झाल्यानंतर समारोपाच्या कार्यक्रमासाठी मंत्रिमहोदय स-लवाजमा आल्याची वार्ता आली. आयोजक आमदार महोदयांनी पुन्हा एकदा सूत्रसंचालकांना मार्गदर्शन केल्यानुसार ‘उर्वरित कविसंमेलन आफ्टर द ब्रेक म्हणजे समारोपाचा ‘कारेक्रम’ झाल्यानंतर पुन्यांदा घेतले जाईल; तस्मात् समस्त लैच प्रतिभावंत कवींनी स्टेजवरून उतरावे आणि कुठेही लांब न जाता तिथेच डाव्या बाजूस थांबून किंवा बसून
राहावे,’ अशी उद्घोषणा करण्यात आली. तेव्हा आम्ही सगळे 40-42 कवी जड पावलांनी खाली उतरलो आणि डाव्या बाजूस बसायला काही सापडते का, याचा निष्फळ शोध घेऊन दाटीवाटीने उभे राहिलो.
समारोपाच्या कार्यक्रमात खास ‘मंत्री’शैलीत मंत्रिमहोदयांची आणि इतर तीन-चार बिनमंत्रिमहोदयांची सविस्तर भाषणे दीडेक तास चालली, तेव्हा नऊ वाजून गेल्यानंतर सदर समारोपाचा कार्यक्रम संपला आणि ‘उरलेल्या कवींनी अजिब्बात वेळ न लावता तातडीने स्टेजवर दाखल होऊन एकेक बारकीशी कविता म्हणून मोकळे व्हावे आणि रसिक श्रोत्यांनाही मोकळे करावे, कारण नंतरच्या शाळेतल्या पोरांच्या सांस्कृतिक कारेक्रमाला आधीच लै उशीर झालेला असून पोरे पेंगुळली आहेत, तर ती झोपी जाण्याआधी तोही कारेक्रम उरकणे आवश्यक आहे,’ असं सूत्रसंचालकरावांनी जाहीर केले. तेव्हा पुनश्च सरसावून पंचवीस-तीस कवी झुंडीने स्टेजवर गेले आणि कविसंमेलन पुन्यापुन्यांदा ‘च्यालू’ जाहले! इतका वेळ इथे-तिथे थांबून अनेक कवी ओशाळलेले, संतापलेले, शरमिंदे झालेले असले, तरी अनेक जण तरीही फॉर्मात होते. या ‘आफ्टर द ब्रेक’ सत्रातल्या पहिल्या कवीच्या कवितेचे बोल होते- ‘कव्हा व्हईन यंकटण्णा, आपली सुदारना, न् कव्हा व्हईन यंकटण्णा, आपली सुदारना?’ कवींच्या किंवा कवितेच्या अधोगतीबद्दल काही एक वाटून न घेता, सदर कविबंधू यंकटण्णाच्या ‘सुदारनेची’ वाट पाहत होते, ही गोष्ट एकूणच कवींच्या तळागाळातल्या जनतेप्रती असलेल्या आस्थेचीच निदर्शक मानता आली असती.
कवितेची अब्रू घालवणार्‍या या सगळ्या प्रकारास एक कविता वाचून आपणही यथाशक्ती हातभार लावला याची लाज वाटून घ्यावी की शरमून जाऊन एखाद्या कोरड्या विहिरीत (यंदा पाऊस बराच बरा झालेला असला तरीही अशा कोरड्या विहिरी आमच्या भागात अतोनात मुबलक संख्येने उपलब्ध आहेत, याची इतर भागांतल्या गरजूंनी नोंद घ्यावी.) उडी ठोकून जीव द्यावा, या संभ्रमात कानकोंडा होऊन अजूनपर्यंत नवी कविता लिहायला पेन उचलावासे वाटेनासे झालेले आहे. कविसंमेलन हा एकंदरीतच ‘च्यामारी गुणिले अतोनात वेळा’ असा लैच यंग्राट प्रकार असतो आणि या अस्ल्या चळवळीत आपल्यासारख्या भल्या माणसाने भाग घेऊ नये एवढे आपण शिकलो, हे मला कबूल असले तरी उद्या आणखी कुणी ‘प्रत्यक्षाहुनि र्होडिंगव्यापी प्रतिमा उत्कट’ स्वरूपाच्या दादा, भाई किंवा अण्णांनी त्यांच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त, कुणाच्या पोराच्या बारशानिमित्त किंवा असल्याच कसल्या तरी एकदम महत्त्वाच्या प्रसंगी कविसंमेलन आयोजित केले आणि त्यात मला बोलावलेच तर मी जाईनच की काय, अशी मलाच स्वत:ला शंका वाटत राहते. कदाचित जाईनसुद्धा! कवींना एवढ्या तरी मानाने दुसरा कोण बोलावतो हो?
(majhegaane@gmail.com)