आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

....तोपर्यंत कविता लिहित राहायचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कवितेशी दु:खाचे दुहेरी नाते असते. आयुष्याला दु:खाची किनार असेल तर कविता त्यातून येते. आणि आयुष्यातले दु:ख विसरायचे असेल, तर कवितेसारखा दुसरा मार्ग नसतो. नापिकीच्या, दुष्काळाच्या काळात शेतक-याला कणगीतले धान्यच तारते; तसे अनेक पडझडीच्या क्षणी कवितेने मला तारले आहे. आपलीच म्हणणारी माणसेही ज्या वेळी दु:ख देतात, वेदना देतात, अशा वेळी रानावर वाळणा-या पिकाला पावसाने अवचित येऊन नवसंजीवनी द्यावी, तशी कविता माझ्यासाठी संजीवनी आहे. मनात साठलेलं दु:ख व्यक्त करण्यासाठी प्रारंभी शब्दांची मदत घेतली. हेच शब्द पुढे मला कवितेकडे घेऊन गेले. मनातील घालमेल अनेक कवींनी त्यांच्या कवितेतून व्यक्त केली आहे, हे जाणवले आणि मग लिहायचे सोडून फक्त वाचत राहिलो. कवितेवर कविता. ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, कुसुमाग्रज, बालकवी, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे, ना. धों. महानोर, इंद्रजित भालेराव, केशव सखाराम देशमुख यांना पुन:पुन्हा वाचलं आणि वाचता वाचताच हळूहळू कविता कागदावर येत गेल्या.
कविता खूप मोठा आधार असली तरी ती सहजासहजी गवसत नाही. निवडुंगाच्या अणकुचीदार काट्यातून निवडुंगाचं रसाळ फळ अलगद विलग करावं, तशी हलकेच टिपावी लागते कविता. हाताला कितीही जखमा झाल्या, तरी कवितेचं फूल आणि कवितेचं फळ घ्यायची इच्छा मरत नाही. त्या जखमाही सुसह्य होतात. अशा जखमांतून मग आनंदच मिळतो.
एखादी विशिष्ट भूमिका घेऊन किंवा एखादा विशिष्ट विचार समोर ठेवून कधी कविता लिहून होत नाही. जे वास्तव समोर असतं, दिसतं, बोलतं, बोचतं, अस्वस्थ करतं, तेच मनात घोळत राहतं. कमी दाबाचा पट्टा तयार व्हावा, ढग जमावेत, वातावरण अनुकू ल असावं आणि मनसोक्त पाऊस कोसळावा; तसा कवितेचा पाऊस कोसळतो. प्रातिनिधिक रूपात बाप म्हणजे शेतकरी आणि आसपासच्या शेतीचे वास्तव कवितेतून येत गेले. येत आहे. जे येत आहे, ते बियांना कोंब फुटावेत तसे सहजपणे येत आहे. हे सगळे अलगद येत असले, तरी या सगळ्यांच्या मुळाशी दु:ख आहे. कवितेचा हा उत्कर्ष दिसत असला तरी त्याचे मूळ वेदनेमध्ये आहे. रिल्केचं म्हणणं मला मनोमन पटतं. तो म्हणतो, ‘दु:ख, अडचणी, वेदना या उत्कर्षाची प्रवेशद्वारे असतात.’
‘मी का लिहितो?’ किंवा ‘मला का लिहावंसं वाटतं?’ याचं उत्तर अवघड नाही. जे वाचत होतो किंवा आहे ते माझ्या सभोवतीचे होते. मला जे सांगायचं होतं, व्यक्त करायचं होतं, तेच वाचलेल्यामध्ये होतं. पण मला आणखी सांगायचं होतं. माझ्या शब्दात सांगायचं होतं. माझ्या सभोवतीच्या जगण्यातील काही दु:ख, वेदना मला अस्वस्थ करतात. काही घटना, परिस्थिती जगण्याची उमेद देतात. हे सगळं मला व्यक्त करावंसं वाटतं, म्हणूनही लिहावंसं वाटतं. माझ्या कवितेच्या अवकाशात शेतीचे प्रश्न आहेत. रोजच्या जगण्यातले, जगण्यासाठीचे संघर्ष आहेत. एक हंगाम गेला; दुस-या हंगामात काय होईल, याची काळजी आहे. आज पाऊस पडला; उद्या पडेल की नाही, याची धास्ती आहे. पेरणी तर झाली; पण राशीनंतर काही हाती लागेल की नाही, याची चिंता आहे. हाती लागलेल्याला भाव मिळेल की नाही, याची अनिश्चितता आहे. परत पुढच्या वर्षी पेरायला काही हातात राहील की नाही, याची खात्री नाही. म्हणजे अनियमितता, अनिश्चितता आयुष्यात भरून आहे.
माझ्या कवितेने बापाचे दु:ख थोडे हलके करावे, असे मला वाटते. पण खरेच माझ्या लिहिण्याने बापाचे दु:ख हलके होते का? ज्यांच्याविषयी मी हे लिहितो, ते किती जण हे वाचतात? शेतक-यांविषयीचे, शेतीविषयीचे माझे हे लिहिणे फक्त सुशिक्षित, सुजाण वाचक वाचत असतील; वाचून त्यांच्या मनात बापाबद्दल सहानुभूती वाटत असेल; तर अशी कोरडी सहानुभूती घेऊन काय करायचे आहे? माझ्या या लेखनाचा लोकप्रतिनिधींवर काही प्रभाव पडत असेल तर आणि त्यांना बापासाठी, शेतीसाठी काही करावे असे वाटत असेल तर या लिहिण्याला अर्थ आहे. पण किती लोकप्रतिनिधी या कविता वाचतात? म्हणून कविता वगैरे लिहिण्यापेक्षा बापासाठी, शेतीसाठी प्रत्यक्ष काही कृती मला करता येईल का? याही प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने ‘नाही’ असेच येते. मी फक्त लिहू शकतो. खरे तर ही माझी पळवाट असेल. शेतीसाठी, बापासाठी मी हे लिहितो खरे; पण प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली की, मी मागे सरकतो. तसं धाडस एक कवी म्हणून माझ्यात नाही. मग अशा वेळी लिहिणं थांबतं. काही लिहावे वाटत नाही, पोकळी निर्माण होते. भणंग अवस्था येते, मग पुन्हा कविताच मदतीला धावून येते. बापासाठी, शेतीसाठी ‘मी काहीच करू शकत नाही’ हे स्वगत मग ‘बाप काहीच करू शकत नाही’ अशा स्वरूपात साक्षात होते -
उंदरांनी संपवून टाकावं सारं धान्य
वाळवीने कुरतडून टाकावं सारं घर
लांडग्यांनी तोडावेत सारे लचके
गिधाडांनी टोचून काढावं, अख्खं शरीर
तसं एकाच वेळी
बापावर आता तुटून पडलेत
उंदीर, वाळवी, लांडगे आणि गिधाडे...
स्वत:च्या बचावासाठी
हातपाय हलवण्यापुरतंही त्राण राहिलं नाही, बापाच्या अंगात...
कवितेची भाषा, रचना, तंत्र कसे असावे? हा प्रश्न खूपदा डोके खातो. रानावरली हराळी जाता जात नाही, बापाचे डोके खाते; तसा प्रकार. अशा वेळी मग मी जास्त विचार करत नाही. आलेल्या अनुभवाला ‘तू जसा आला आहेस तसा ये’ असे म्हणतो. आणि कशाचाही विचार न करता, अनुभव उतरवून काढतो. मग त्याचे दोन-तीनदा पुनर्लेखन केले, की कविता जन्माला येते. मग आजच्या तंत्रज्ञानाची भाषा कवितेत आपोआपच येते. कविता लिहिताना विषय, काळ, वेळ ठरलेली नसते; तशी भाषाही ठरलेली नसते. अमुक एक प्रकारची भाषा या कवितेसाठी असावी किंवा निवडावी, असे कधी होत नाही. किंवा मी ठरवत नाही. विषयाच्या मागणीनुसार ती कविताच स्वत:ची भाषा घेऊन येत असते. कवितेने मला काय दिले?
खरं तर कवितेने इतके दिले की आयुष्यातून कवितेला वजा केले की आयुष्य शून्य राहते. महत्त्वाचे म्हणजे, कवितेने मनातली अस्वस्थता, अगतिकता, घालमेल यांना वाहून जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली आहे. कसोटीच्या काळात कवितेने मला तारले आहे.
‘दु:खाच्या कविता’ असे माझ्या कवितांना म्हटले जाते. मला असे म्हटलेले आवडतेही. कारण ‘दु:ख’ ही एक आदिम गोष्ट आहे आणि अंतापर्यंत ती मानवी जीवनाला चिकटून राहणार आहे. दु:खाशिवाय कोणाचा उत्कर्षही शक्य नाही. म्हणून शेतक-याच्या दु:खाच्या कविता असे म्हटले की समाधान मिळते. जी गोष्ट कोणीही टाळू शकत नाही, अशा गोष्टीविषयी मी कवितेतून काही बोलत असेन, तर ती माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. समोर दिसणारे वास्तव मन उद्ध्वस्त करते, अस्वस्थ करते. आणि ही अस्वस्थताच कवितेची खरी प्रेरणा होते. अजूनही ती अस्वस्थता कायम आहे. थोड्याशा कवितांनी अजून मन तृप्त झालेले नाही. म्हणूनच अस्वस्थता असेपर्यंत आणि मन तृप्त होईपर्यंत आता कविता लिहीत राहायचे आहे...
संकलन - विष्णू जोशी