आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशाचा सेंद्रीय प्रयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेती हा जितका मेहनतीचा व्यवसाय आहे, तितकाच तो संयम आणि प्रयोगशीलतेचाही व्यवसाय आहे. प्रयोग करण्याचे धाडस राखले तर वैयक्तिक पातळीवर यश मिळतेच, पण समस्त शेतकरीवर्गासाठी मदतीचा हातही पुढे करता येतो...
 
पंधरा वर्षांपूर्वी शेती सुरू केली, तेव्हा परिस्थिती खूपच बिकट होती. पाणी टंचाईने सगळे हैराण झाले होते. डोळ्यादेखत ऊस करपू लागला होता. सगळ्यांनीच हात टेकले होते. मुळा धरणाची पातळी केव्हाच खाली गेली होती. बीएससी अॅग्री करून शेतीत उतरण्याचा निर्णय पणाला लागला होता. पाणी टंचाईवर जे जे उपाय सांगितले जात होते ते सारे करून पाहात होतो. त्याच वेळी अहमदनगरला कृषी तज्ज्ञ सुभाष पाळेकर यांचे शिबिर असल्याचे वाचनात आले.

पाळेकरांच्या शिबिरात नैसर्गिक शेतीची पहिल्यांदा ओळख झाली. सोबतच्या शेतकऱ्यांना मोठी जोखीम वाटत होती. उसासारख्या आधुनिक शेतीकडून एकदम नैसर्गिक शेतीच्या पारंपरिक पद्धतीकडे वळण्यात मोठा धोका होता. परंतु पाण्याअभावी तोपर्यंत गमावण्यासारखे बरेच गमावून झाले होते. विचार केला, या पद्धतीने प्रयोग करून तर पाहू. मग कपाशी, हरभरा, सोयाबीन ही तीन पिकं नैसर्गिक पद्धतीने प्रयोग करून पाहिली. पाण्याची टंचाई असूनही या पद्धतीमुळे पिकं चांगली झाली, तेव्हा उभारी आली. त्या दिवसापासून सुरू केलेले नैसर्गिक शेतीचे प्रयोग आजतागायत सुरू आहेत, ते यशाची हमी देतच.

माझे राहुरी तालुक्यातले वळण नावाचे गाव आणि एकूणच आमचा अहमदनगर जिल्हा म्हणजे, सगळीकडे ऊसच ऊस. यातून मी मार्ग काढला. बारा बाय तीन एवढ्या अंतरावर ऊस लावला आणि उसाच्या दोन रांगांच्या मध्ये इतर पिकांना सुरुवात केली. खरिपाची, रब्बीची सर्व पिके घेऊ लागलो. रासायनिक खते पूर्णपणे बंद केली. जीवामृत, शेणखत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जमिनीवरचे जैविक आच्छादन यावर भर देत गेलो. जमिनीतील ओलावा जमिनीतच टिकू लागला. मातीचा कस वाढला आणि पिकांना बहर आला. पुढे सोयाबीन बंद केले, पण सर्व प्रकारची पारंपरिक धान्य, कडधान्य, हळद, भाज्या आणि फळे यावर भर दिला.
 
माझ्या शेतात पिकत नाही, असं एकही पीक आता उरलेलं नाही. उसाच्या दोन रांगांमध्ये एकेक रांग वेगवेगळी पिके घेतो. त्यासाठी एका वेळी पाच वेगळ्या बिया पेरण्याचं टोचन यंत्रच खास तयार करून घेतलं. पेरणीच्या पद्धती बदलून पाहिल्या, मशागतीच्या पद्धती बदलून पाहिल्या. शेवटी नैसर्गिक पद्धतीच्या शेतीतूनच जास्त उत्पादन निघते, हे सिद्ध झाले. 

पिकांसाठी टोचन पद्धतीचा अवलंब करतो. उसाच्या पातांचे संपूर्ण शेतीला आच्छादन झाले आहे. त्याचे थरावर थर चढले आहेत. त्यामुळे पाण्याची कितीही टंचाई निर्माण झाली, तरी त्या थरांखालची जमीन ओलीच राहते. उन्हाळ्याच्या सुरुवातीस टोचन पद्धतीने एकेक रांग पिकांचे बियाणे रोवतो. पहिला पाऊस झाला की, ते आपसूक उगवून येते. आता वाऱ्यापासून पिकाचं संरक्षण व्हावं, म्हणून वनभिंत उभारण्याचा मानस आहे. प्रत्येक फळाचं एक तरी झाड माझ्या शेतात असलं पाहिजे, अशी ही वनभिंत तयार करीत आहे.

नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या उसाचे यंदाचे बारावे वर्ष आहे. पहिली तीन-चार वर्षं ऊस कारखान्याला देत होते. पण हवा तसा भाव मिळत नव्हता. नंतरची दोन वर्षं ऊस चाऱ्यासाठीच वापरला. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला ऊस सरसकटच गणला जात होता. पहिली चार वर्षं त्यावर स्वत:च गूळ तयार करण्याचा विचार केला. त्यासाठी शेतात गुऱ्हाळ उभं करावं लागणार होतं. मनाची तयारी होती, पण त्यासाठी माहिती किंवा सल्ला मिळत नव्हता. तुकड्या- तुकड्यात माहिती मिळत होती. यशस्वी गुऱ्हाळासाठी जो जे सांगेल, ते करून पाहात होतो. शेवटी ते सारे माहितीचे तुकडे आणि स्वत:च्याच विचारांचे, अनुभवाचे धागे जोडून गुऱ्हाळ उभारले.
 
पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. चार एकरात १२ मेट्रिक टन गूळ तयार केला. पहिल्या वर्षी त्याच्या ढेपी घरातच ठेवाव्या लागल्या. विकल्या गेल्या नाहीत. पण धीर सोडला नाही, की प्रयत्न सोडले नाहीत. इतर पिकांवर गुजराण होत होती. त्यामुळे आर्थिक अटीतटीची परिस्थिती आली नव्हती. तसे पिकांमधून मिळालेल्या उत्पादनातून भांडवल साठवूनच गुऱ्हाळ उभे केले होते. एक पैशाचे कर्ज काढले नाही. उत्पादनातूनच गुंतवणूक हे सूत्र ठेवत गेलो, त्यामुळे कर्जापासून सुटका झाली. सारे लक्ष उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढविणे, यावर केंद्रित केले. त्याची फळे मिळू लागली. दुसऱ्या वर्षीपासून गुळाला मागणी वाढली. सध्या माझा गूळ नाशिक, पुणे, मुंबई या बाजारात जाऊ लागला आहे. व्यापारी आधीच मागणी नोंदवत आहेत. 

गुऱ्हाळाचा माझा प्रयोग यशस्वी झाला खरा, पण त्याला बारा वर्षं लागली. दहा वर्षं मी संघर्षच करत राहिलो. आता त्या अनुभवावर मी नवीन शेतकऱ्यांना तीन वर्षांत यशस्वी गुऱ्हाळे उभी करून देत आहे. आता नैसर्गिक पद्धतीने उसाची शेती आणि शेतातच गुऱ्हाळ हा माझा प्रयोग इतर शेतकरी उचलत आहेत. माझ्यासाठी गुऱ्हाळ निर्मितीचा सल्ला देणे, हा जोड व्यवसाय झाला आहे. आतापर्यंत मी अकोला, यवतमाळ, टेंभुर्णी या ठिकाणी गुऱ्हाळे उभी करून दिली आहेत. आता नाशिक आणि परभणीत एकेक प्रकल्प सुरू आहे. नैसर्गिक पद्धतीने यशस्वी शेती करण्याची इच्छा असणारे वर्षाला मी दोन शेतकरी तयार करतो. 

माझे शेतकऱ्यांना हेच सांगणे आहे, नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय नाही. यात नवीन काहीच नाही. दीडशे वर्षांपूर्वी आपले पूर्वज अशीच शेती करत होते. आपण एक पीक पद्धती, रासायनिक पद्धती यामुळे कर्जाचा बोजा ओढवून घेतला. आज सरकार ना पाण्याचा प्रश्न सोडवू शकते, ना विजेचा. या प्रश्नांकडे बघून रडत बसण्यापेक्षा बदलत्या काळातील संधींचा आपण फायदा घेतला पाहिजे. आज ग्राहकांमध्ये बरीच जागरुकता आली आहे. ते नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या उत्पादनांची मागणी करत आहेत. बाजार उपलब्ध आहे, आता आपण त्या पद्धतीने बदलणे  गरजेचे आहे, यश आपलेच आहे, हे मी स्वानुभवातून छातीठोकपणे सांगू शकतो.

» गुऱ्हाळाचा माझा प्रयोग यशस्वी झाला खरा, पण त्याला बारा वर्षं लागली. दहा वर्षं मी संघर्षच करत राहिलो. आता त्या अनुभवावर मी नवीन शेतकऱ्यांना तीन वर्षांत यशस्वी गुऱ्हाळे उभी करून देत आहे.
 
लेखकाचा संपर्क क्रमांक : ८६०५४३६२९८
 
शब्दांकन : दीप्ती राऊत
diptiraut@gmail.com

 
बातम्या आणखी आहेत...