Home »Magazine »Rasik» Balasaheb Thackery English Book

बाळासाहेब आणि शिवसेनेचा उत्कर्षवेध !

अभिलाष खांडेकर | Feb 23, 2013, 23:34 PM IST

  • बाळासाहेब आणि शिवसेनेचा उत्कर्षवेध !

महाराष्ट्राचे लाडके राजकीय व्यक्तिमत्त्व असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर देशभरात मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये विविधांगी लिखाण प्रकाशित झाले. त्यात काही प्रशंसा करणारे लेख होते, तर काही बाळासाहेबांच्या रोखठोक कार्यशैलीचे विश्लेषण करणारे लेख होते. एकूणच महाराष्ट्रातल्या सगळ्याच वृत्तपत्रांनी त्या प्रसंगी विशेष पुरवण्या प्रकाशित केल्या होत्या.
असे असूनही बाळासाहेब ठाकरे हा विषय कदाचित महाराष्ट्रापुरता तरी न संपणारा आहे. त्यांच्याबद्दल जनमानसात इतके कुतूहल, श्रद्धा आणि प्रेम आहे की, आजही वाचकांना बाळासाहेबांविषयीचे साहित्य वाचायला आवडते. अर्थात, इंग्रजीमध्ये पुस्तकरूपात शिवसेना व बाळासाहेब यांच्यावर तुलनेने कमीच लेखन आढळते. ती उणीव वैभव पुरंदरेंच्या ‘बाळ ठाकरे अँड राइज ऑफ शिवसेना’ पुस्तकाने बर्‍याच अंशी भरून काढली आहे. तसे पाहता हे पुस्तक बाळासाहेबांच्या हयातीतच (1999) प्रकाशित झाले होते. स्वत: बाळासाहेबांनीच त्याचे प्रकाशन केले होते. परंतु नवे पुस्तक अनेक अर्थांनी नवे आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर दोनच महिन्यांत हे पुस्तक बाजारात आले आणि पहिल्या आवृत्तीपेक्षा खूप नवे संदर्भ व बाळासाहेब केंद्रित चरित्रात्मक मजकूर लेखकाने यात समाविष्ट केल्यामुळे ते अधिक वाचनीय झाले आहे.
बाळासाहेबांचे एक व्यंगचित्रकार म्हणून विसाव्या वर्षापासून सुरू झालेले करिअर, फ्री प्रेस जर्नलमधले अनुभव, ‘मार्मिक’चा प्रारंभ, इथपासून शिवसेनेचा जन्म, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गिरणी कामगारांसाठीचा लढा, पुढे मराठीसाठी मुंबईतील लढा, मुंबई महापालिकेमध्ये पहिला विजय, भाजपशी दोस्ती, भुजबळांची गच्छंती, महाराष्ट्रातील युतीचे सरकार, पुढे राज व उद्धव यांच्यातील तेढ, असा सगळा इतिहास व प्रत्यक्ष बाळासाहेबांशी वेळोवेळी बोलून लिहिलेले किस्से या पुस्तकातील 32 प्रकरणांमध्ये वाचायला मिळतात. सरळ-सोपी भाषा व पत्रकाराची दृष्टी यामुळे पुस्तक अधिक वाचनीय ठरते.
बाळासाहेब ठाकरेंनी ‘फ्री प्रेस जर्नल’ तीनदा सोडले. कारण, काही प्रसंगांत त्यांची व्यंगचित्रे छापण्यास तेव्हाचे व्यवस्थापकीय संपादक ए. बी. नायर यांनी नकार दिला. सबब त्यात मिनू मसानी, स. का. पाटील यांची नावे होती. ठाकरे रागावले. रागाच्या भरात नोकरी सोडली. परंतु, त्यांना परत बोलावण्यात आले. त्यानंतर एकच वर्षात विन्स्टन चर्चिलवर लंडनमध्ये प्रकाशित होणार्‍या पुस्तकासाठी त्यांची व्यंगचित्रे मागवली गेली. परंतु दुसरे एक संपादक हरिहरन यांनी ती पाठवण्यास नकार दिला, तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी ‘फ्री प्रेस’ सोडले आणि ‘मार्मिक’चा जन्म झाला. आज बाळासाहेबांमध्ये दडलेला व्यवस्थेविरोधातील संताप आणि त्यातून जन्माला आलेले वादळी नेतृत्व याचे श्रेय काही लोक फ्री पे्रस जर्नलला देतात; परंतु तिथेच त्यांची व्यंगचित्रे सतत प्रकाशित होत गेली असती तर कदाचित ते आर. के. लक्ष्मण यांच्यासारखे प्रथितयश व्यंगचित्रकारच झाले असते. मार्मिक, शिवसेना व उर्वरित इतिहास आपल्याला बघायला मिळाला नसता, याची हे पुस्तक पुन:पुन्हा आपल्याला जाणीव करून देते.
शिवसेनेचा जन्मच मुळी दक्षिण भारतीयांना (मद्रासी) विरोध करून झाला. कालांतराने या विरोधाची दिशा बदलून उत्तर प्रदेश व बिहारी शिवसेनेचे लक्ष्य ठरले. अर्थात, ठाकरेंची प्रक्षोभक भाषणे, उपरोधिक टोमणे, ठोकशाही आणि मराठीपणाचा रास्त असा अभिमान यामुळे ते उत्तरोत्तर लोकप्रियच होत गेले. पुढे ते जहाल हिंदुत्वाकडे वळले. ठाकरे मराठीप्रेमी, मुस्लिमविरोधी अशी प्रतिमा असलेले नेते होते; तरी त्यांचे दिलीपकुमार, अब्दुल रहमान अंतुले आदींशी जवळचे संबंध होते. लेखक एका जागी किस्सा सांगतो की, शरद पवारांचे पुलोद सरकार इंदिरा गांधींनी पाडले व अंतुले यांना मुख्यमंत्री केले (1980) तेव्हा ठाकरे श्रीवर्धनला (अंतुलेंचा मतदारसंघ) गेले. तेथे काँगे्रस नेते रामराव आदिक यांच्याबरोबर सभेला संबोधित करून अंतुलेंसाठी मते मागितली. शिवसेनेने तेव्हा काँगे्रस म्हणजे अंतुलेंच्या विरोधात उमेदवारही उभा केला नव्हता.
असे अनेक विरोधाभासी निर्णय बाळासाहेब घेत असत. त्यात त्यांचे ‘पॉलिटिकल टायमिंग’ अचूक असे. असाच एक किस्सा लेखक लिहितो. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुंबई प्रदेश अध्यक्ष मुरली देवरा यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी एक अफवा पसरवली की, मुंबईला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात येत आहे. परंतु यामुळे शिवसेनेचाच अधिक फायदा झाला. कारण मुंबई महाराष्ट्रातच राहावी, यासाठी शिवसेना संघर्षरत होती. वसंतदादांनी देवरांविरुद्ध घेतलेल्या पवित्र्याने सेनेचे फावले आणि मुंबई महापालिकेच्या 170 जागांपैकी 74 जागा जिंकून पहिल्यांदा ‘मुंबई’वर राज्य स्थापन करता आले. सेनेच्या राजकारणात हा मोठा टर्निंग पॉइंट ठरला आणि त्यानंतर सेनेने कधीच मागे वळून बघितले नाही. अर्थात, सार्वजनिक जीवनात बाळासाहेब कितीही आग ओकत असले, तरी वैयक्तिक जीवनात कुटुंबवत्सल, प्रेमळ व लोकांना मदत करणारे, अफलातून विनोदबुद्धी असलेले व्यक्तिमत्त्व होते, हे सगळे बारीकसारीक तपशील या पुस्तकात विस्ताराने येतात. पुस्तकात भुजबळ कसे पक्ष सोडून गेले, राज-उद्धवमध्ये काय बिनसले, मुंबईतील हिंदू-मुस्लिम दंगल, शिवसेनेचे सरकार अशा अनेक घटनांशी निगडित घटना-प्रसंग येतात; ज्यातून बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व व सेनेचा इतिहास उलगडत जातो. याशिवाय राज आणि उद्धव यांचे संबंध; दोघांच्या कार्यशैलीतले बारकावे, उद्धव ठाकरेंची कार्याध्यक्षपदी झालेली निवड हा सगळा तसा ताजा, आतल्या घडामोडी सांगणारा इतिहासही पुस्तकात सविस्तरपणे वाचकांना वाचायला मिळतो.
बाळ ठाकरे अँड राइज ऑफ शिवसेना
लेखक : वैभव पुरंदरे, प्रकाशक : लोटस / रोली
किंमत : 350/- पाने 264
abhilash@dainikbhaskargroup.com

Next Article

Recommended