Home | Magazine | Rasik | balgandharv-kunal-rege

गंधर्वांचा आनंद

कुणाल रेगे, प्रतिनिधी दिव्य मराठी | Update - Jun 02, 2011, 02:06 PM IST

'मला मदन भासे हा', 'कशी या त्यजू पदाला' ही पदे गाताना नारायणरावांच्या हरकती, त्यांनी घेतलेल्या जागा आनंदने हुबेहूब सादर केल्या आहेत. चित्रपटगृहात बसलेला प्रेक्षक या पदांना दाद दे्तोच, पण वन्स मोअरची मागणीही करतो.

  • balgandharv-kunal-rege

    'बालगंधर्व' चित्रपटात सुबोध भावे याच्या सकस अभिनयाने सर्वांची वाहवा मिळवली; पण गंधर्वांच्या पदांचा सुखद पुन:प्रत्यय देणारा गायक मात्र अजून पडद्याआड राहिला आहे. खरे तर या चित्रपटातील गीतांचे मोल मोठे आहे. बालगंधर्वांच्या तोंडी असलेली ही विविध नाट्यपदे गाणारा गायक म्हणजे, आनंद भाटे. पण आनंदची इतकीच ओळख असू शकत नाही. खासकरून 'मला मदन भासे हा', 'कशी या त्यजू पदाला' ही पदे एेकल्यावर तर नाहीच नाही. कारण या पदांत नारायणरावांच्या हरकती, त्यांनी घेतलेल्या जागा आनंदने हुबेहूब सादर केल्या आहेत. चित्रपटगृहात बसलेला प्रेक्षक या पदांना दाद तर देतोच, पण वन्स मोअरची मागणीही करतो.
    ऐंशीच्या दशकात सांगली, मिरज, पुणे, नाशिक या शहरांमध्ये संगीत नाटकांचे प्रयोग जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर होते. एकूणच संगीत रंगभूमीला उतरती कळा लागलेला हा काळ. पण याही परिस्थितीत कलापिनी, गंधर्व संगीत विद्यालय, शारदा संगीत विद्यालय अशा काही संस्था आणि या संस्थांशी संबंधित माणसं संगीत रंगभूमी जिवंत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. पुण्याचे पं. यशवंतबुवा मराठे हे त्यांपैकीच एक. याच यशवंतबुवांकडे आनंदचे गायन आकार घेत होते. त्या दशकातली नाट्यगीत गायनाची एकूण एक स्पर्धा आनंदने आपल्या गाण्यांनी गाजवून सोडली. नाट्य आणि संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांना आपल्या नावाची दखल घ्यायला लावली. नाट्यगीत आणि आनंद हे समीकरणच बनले. 'स्वयंवरा'तील रुक्मिणी, 'मानापमाना'तील भामिनी, 'एकच प्याला'तील सिंधू आनंदच्या गाण्यातून रसिकांपर्यंत पोचत होती. त्याच्या देहबोलीतून जणू नारायणरावच पुन्हा रसिकांची मने जिंकत होते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, साहित्य संमेलन, नाट्यसंमेलन, दूरदर्शन, इतकेच काय तर दिल्ली येथे १९८२ साली संपन्न झालेला महाराष्ट्र दिन आणि शिकागो येथे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे संमेलन आनंदच्या नाट्यगीताने दणाणून सोडले. वयाच्या दहाव्या वर्षी केंद्र सरकारची गायनाची शिष्यवृत्ती मिळवलेल्या आनंदला रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले, आणि आपल्या प्रेमाची पोचपावती म्हणून 'आनंद गंधर्व' ही पदवी बहाल केली. यशवंतबुवांकडे नाट्यगीताचे शिक्षण घेणारा आनंद १९८८ च्या सुमारास भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या किराणा घराण्यात दाखल झाला. नाट्यगीतांसोबत 'मिया की तोडी', 'मुलतानी', 'शुद्ध कल्याण' असे किराणा घराण्याचे प्रभुत्व असलेले दरबारी राग तन्मयतेने आळवू लागला. इथेच आनंदच्या गंधर्व गायकीला परिसस्पर्श झाला. अण्णांना साथसोबत करताना आनंदला देशविदेशांत अनेक ठिकाणी सूरपीठ उपलब्ध झाले. अण्णांची शिस्त, सुरांवर पकड, रागांविषयीचा सखोल अभ्यास, या सगळ्याचा आनंदच्या गाण्यावर प्रभाव पडणे साहजिकच होते. पण त्याच्या व्यक्तिमत्त्वावरसुद्धा प्रभाव पडला. जे सादर करू ते उत्तमच हा अटटाहास आनंदला इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करतो. इथे आनंद विलक्षण सरस ठरतो.
    आनंदच्या आतापर्यंतच्या प्रवासावर नजर टाकली, तर लक्षात येईल की राजाश्रयापेक्षा लोकाश्रय मिळवण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न राहिलाय. २२, २५, २७ अशा तीनही सवाई गंधर्व महोत्सवांतले त्याचे गायन, यमन रागावरचे त्याचे प्रभुत्व सिद्ध करते. २६ मध्ये ठाण्यातील सवाई संगीत संमेलन, गोवा येथील पं. जितेंद्र अभिषेकी संगीत संमेलन, हुबळी येथील अब्दुल करीम खॉं साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित मैफल, २७ साली बर्मिंगहॅम (लंडन) येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित मैफल, २९ मध्ये अमेरिकेत बोस्टन येथे म्युझिक क्वेस्टमधील त्याचा सहभाग, बालगंधर्व स्मृती महोत्सव मिरज, सांगली, जळगाव येथील त्याचा सहभाग अशी काही ठळक उदाहरणे सांगता येतील. याच प्रवासात शौनक अभिषेकी, संजीव अभ्यंकर, कौशल इनामदार, आदित्य ओक असे गुणी, प्रयोगशील मित्र आनंदला मिळवता आले. या मित्रांनी पुढाकार घेऊन आनंदची ओळख नितीन देसाई यांच्याशी करून दिली. सुबोध भावे याने रुपेरी पडद्यावर साकारलेल्या बालगंधर्वांच्या व्यक्तिरेखेला आनंद गंधर्वाचा सूर शोभून आणि उठूनही दिसला. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा गंधर्व गायकीचा आनंद घेता आला. व्यवसायाने संगणक अभियंता असलेला आनंद स्वत:बद्दल फार कमी बोलतो. त्याची गीते जे बोलतात ते आवर्जून एेकत रहावेसे असते. आजच्या काळात हे गुण दुर्मिळ झाले आहेत. म्हणूनच त्याला दाद द्यावीशी वाटते.

Trending