आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकवींच्या नगरमध्ये वास्तव्य असलेल्या वास्तूवर नामफलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे...’ या ओळी सहजच येतात. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या कवितांनी मागील शंभर वर्षांपासून रसिकांना वेड लावलं आहे. या निसर्गकवीला अवघं 28 वर्षांचं अल्पायुष्य मिळालं. नगर, पुणे, महाबळेश्वर या ठिकाणी बालकवींची प्रतिभा बहरली. निसर्गाची रूपं त्यांनी आपल्या कवितेत आणली.


उमेदीच्या काळात बालकवी अहमदनगरमध्ये होते. ‘फुला-मुलांचे कवी’ म्हणून ओळखल्या जाणा-या रेव्हरंड नारायण वामन टिळकांनी त्यांना मोठ्या प्रेमानं नगरला आणलं, आपल्या घरी ठेवून घेतलं. लक्ष्मीबाईंनी बालकवींवर पुत्रवत प्रेम केलं. टिळकांकडून मिळणारं प्रोत्साहन, इथे मिळालेले सवंगडी यामुळे बालकवींची प्रतिभा ख-या अर्थाने बहरली. बालकवींचा जन्म 13 ऑगस्ट 1890 रोजी जळगावजवळील धरणगाव येथे झाला. त्यांना चार भावंडं. जिजी, अमृतराव हे थोरले आणि कोकिळा, बाबू ही धाकटी. वडिलांच्या पोस्टखात्यातील बदल्यांमुळे बालकवींचं शिक्षण एका गावी सलग झालं नाही. 1903 मध्ये मराठी शिक्षण संपल्यानंतर बालकवी धुळ्याला शंकर कृष्णराव देव यांच्या प्रिपेटरी स्कूलमध्ये दाखल झाले. देवांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दासबोधाचं अध्ययन केलं. 1904 मध्ये ते एरंडोलला आले. तिथे भय्यासाहेब काळकरांच्या राष्ट्रीय शाळेत ते दाखल झाले. थोरली बहीण जिजीमुळे त्यांना संस्कृतची गोडी लागली. शब्दपावली, रामायण, महाभारत, तसंच भांडारकरांची पुस्तकं जिजीनं त्यांना शिकवली. रामचंद्र कृष्ण वैद्य ऊर्फ वनवासी यांचे सान्निध्य लाभल्यानंतर बालकवींनी घर सोडलं. त्यांची भटकंती सुरू झाली.


-जळगावच्या संमेलनात कर्नल कीर्तिकरांकडून बालकवीची उपाधी
1907 मध्ये जळगावला भरलेल्या पहिल्या महाराष्ट्रीय मराठी कविसंमेलनात कवी विनायकांच्या प्रोत्साहनामुळं ठोंबरे यांनी कवितावाचन केलं. संमेलनाचे अध्यक्ष कर्नल कीर्तिकर यांनी त्यांचं कौतुक करत ‘बालकवी’ ही उपाधी त्यांना दिली. 1908 मध्ये वडिलांचं निधन झाल्यानंतर कुटुंबांची जबाबदारी बालकवींवर आली. त्याच वर्षी विनायक भाऊ जोशींच्या सात वर्षांच्या कन्येशी, पार्वतीबाईंशी त्यांचं लग्न झालं. 1909 मध्ये बालकवी शिक्षणासाठी बडोद्याला गेले. त्यांची परिस्थिती पाहून रेव्हरंड टिळकांनी त्यांना नगरला बोलावलं. आपल्या घरात ठेवून दहा रुपयांची शिष्यवृत्ती त्यांनी सुरू केली.


-माळीवाड्यातील टिळकांचं घर म्हणजे बालकवींचं कवितेतील जगणंच
नगरच्या माळीवाड्यातील टिळकांचं घर म्हणजे बालकवींचं कवितेतील जगणंच होतं. स्वत:च्या घरापेक्षा ते इथंच जास्त रमले. टिळकांची ‘सृष्टीची भाऊबीज’ ही कविता वाचून आपली कवित्वशक्ती जागी झाली, असं बालकवी म्हणत. त्यांच्या काव्यगुणांचा विकास इथेच झाला. टिळक पती-पत्नीचं वात्सल्य, देवदत्त व ताराबाई यांची संगत यामुळे बालकवी नगरमध्ये रमले. टिळकांचं घर म्हणजे सरस्वतीचा दरबारच होता. टिळक ‘ज्ञानोदया’चे संपादक होते. त्यांच्याकडे नवनवीन पुस्तकं, मासिकं येतं. घरी जमणा-या मंडळींना ते कविता वाचून दाखवत.
कवितांवर चर्चा रंगे. त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळे. भास्करराव उजागरे टिळकांच्या सहवासामुळे कविता लिहू लागले. वृद्ध कवी सच्चिदानंद हेही टिळकांकडे येऊन आपल्या कविता वाचत. अशा वातावरणात बालकवींमधील काव्यवृक्ष बहरू लागला. नगरमध्ये मुळे, दत्तोपंत व पारनाईक असे मित्र त्यांना मिळाले. संगमनेरचे कवी टेंभुर्णीकर हे बालकवींचे जवळचे मित्र. ते बालकवींना बागेत फिरायला नेत. प्रथितयश कवींच्या स्तुतीमुळे बालकवींची कविता नवं रूप घेऊ लागली. ‘आनंद’, ‘मनोरंजन’, ‘खेळगडी’, ‘बालबोधमेवा’ यातून त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. याच सुमारास बालकवींना विषमज्वर झाला. चाळीस दिवस त्यांचे तापात गेले. लक्ष्मीबाई टिळकांनी त्यांची काळजी घेतली. या दुखण्यातून ते वाचले. जणू त्यांचा पुनर्जन्मच झाला.


- नगरमध्ये सुचल्या कविता
बालकवींचा काव्यप्रवास 1903-04 पासून सुरू झाला असला, तरी त्यांच्या गाजलेल्या ‘फुलराणी’, ‘निर्झरास’ या कविता त्यांना नगरमध्ये आल्यावर सूचल्या. त्यांना निसर्गकवी म्हणून ओळख मिळाली, ती नगरमध्ये लिहिलेल्या कवितांमुळे. सृष्टीनियमानुसार वय वाढलं, तरी ते निरागस बालच राहिले. तारुण्यसुलभ गाणी त्यांनी जवळजवळ लिहिलीच नाहीत. वयोमानानुसार माणूस तत्त्वज्ञानाकडे झुकतो. तसे ते झुकले नाहीत. जगाला संदेश देण्याचा आव त्यांनी आणला नाही.


- बालकवी सातभाई गल्लीत वास्तव्यास
चित्रकार व गायक असलेल्या पारनाईकांशी बालकवींचा विशेष स्नेह होता. नगर येथील मिशनच्या शाळेत नोकरी मिळाल्यानंतर बालकवी सातभाई गल्लीतील पारनाईक यांच्या घरी राहिले. तेव्हा टिळक कुटुंबीय नगरमध्ये वास्तव्यास नव्हतं. काही दिवस माळीवाड्यातील मुळे यांच्या घरासमोर बालकवी राहिले.


- प्रत्येक साहित्यिकास ओढ घर पाहण्याची
‘स्मृतिचित्रां’त लक्ष्मीबाई टिळकांनी बालकवींच्या नगरमधील अनेक आठवणी लिहिल्या आहेत. बालकवी कसे मिश्किल होते, हेही त्यांनी सांगितलं आहे. टिळकांच्या वाडीतील कौलारू छपराच्या चाळवजा घरानंही आता शंभरी ओलांडली आहे. टिळक आणि बालकवींच्या आठवणी जपणारं बोरीचं झाडं या घरामागे अजून उभं आहे. नगरमध्ये येणा-या साहित्यिकांना हे घर पाहण्याची ओढ असते.


आता कुणीच राहात नसल्यानं हे घर बंद आहे. नगरच्या रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांच्या पुढाकारानं या वास्तूवर नुकताच नामफलक लावण्यात आला. प्रसिद्ध कवी श्रीधर अंभोरे यांच्या हस्ते त्याचं अनावरण झालं. या नामफलकामुळे बालकवींच्या स्मारकाची उणीव थोडीफार तरी दूर झाली...