आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bandhuraj Lone About Dr.Raosaheb Kasabe Accusation Issue

डॉ. कसबेंच्या आरोपांचीही चिकिस्ता झाली पाहिजे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील एक अग्रगण्य विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे सध्या महाराष्ट्रातील एक मोठे लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्यावर तुटून पडले आहेत. रावसाहेब कसबे तसे शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे कसबेंनी ज्या पद्धतीने नेमाडेंना फैलावर घेतले आहे, त्याचे अनेकांना आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. कसबेंशी वैचारिक नाळ जोडलेला एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे, तसेच नेमाडेंना मानणारा वाचकही मोठ्या संख्येने आहे. मात्र या वादामुळे हे दोन्ही घटक बुचकळ्यात पडलेले असतील.
नेमाडेंचा देशीवाद, इंग्रजीबाबत त्यांचा आग्रह, जातीच्या बाबतीत नेमाडेंचा वैचारिक गोंधळ आणि नेमाडेंची एकूणच राजकीय भूमिका, यावर कसबेंनी जोरदार हल्ला चढवला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत त्यांची सडेतोड भूमिका, मराठी संपादकांविषयी तुच्छता अशा काही बाबींमुळे नेमाडे वाचकांना, लेखकांना नेहमीच वेगळे वाटले आहेत. नेमाडेंची कोसला आणि नंतरच्या कादंबऱ्यांनी नेमाडे वेगळे आणि कसदार लेखक असल्याचे सिद्ध केले. मात्र कादंबरीकार नेमाडे जेव्हा काही वैचारिक आणि मूलभूत विषयांवर भाष्य करतात, तेव्हा नेमाडेंच्या काही भूमिकांबाबत चर्चा होण्याची गरज आहे. मात्र, नेमाडेंना फॅसिस्टांच्या रांगेत उभे करण्याच्या कसबेंच्या युक्तिवादावरही चर्चा करावी लागेल. नेमाडेंची एकूणच राजकीय समज, भूमिका आणि त्यांचा देशीवाद यावर मला फारसे बोलायचे नाही. मी नेमाडेंचे बहुतेक साहित्य वाचलेले आहे, तसेच कसबेंच्या अनेक पुस्तकांनी माझ्यासारख्यांची वैचारिक भूक भागवलेली आहे. वैचारिक भूमिका अधिक प्रगल्भ होण्यात कसबेंच्या ग्रंथांचे योगदान मोठे आहे. मात्र, कसबेंनी नेमाडेंवर हल्ला चढविताना नेमाडे अप्रमाणिक असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नेमाडेंना मिळालेले ज्ञानपीठच कसे मॅनेज होते, असा थेट आरोप कसबेंनी केला आहे. याची दखल माझ्यासारख्या नेमाडेंच्या साहित्यप्रेमींनी घेतलीच पाहिजे.

नेमाडेंनी नेहमीच पुरस्कारांचा विरोध केलेला आहे. पुरस्काराने लेखकाचा ‘लेखकराव’ होतो, असे ते म्हणत. आता मात्र देईल त्याचा पुरस्कार नेमाडे घेत आहेत. मी नेमाडेंची मुलाखत घेतली, तेव्हा हा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावर नेमाडेंचे उत्तर समाधानकारक नव्हते. मात्र, तरीही नेमाडेंना देण्यात आलेले ज्ञानपीठ हे त्यांच्या वाचकांसाठी समाधानच नव्हे, तर एक अभिमानाची बाब आहे. या पुरस्कार निवड समितीत नामवर सिंह हे नेमाडेंचे मित्र होते. मात्र त्यामुळे काय बिघडले? नामवर सिंह या समितीत नसते, तर हा पुरस्कार नेमाडेंना मिळाला नसता का? यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, नेमाडे या पुरस्कारासाठी लायक नाहीत का? माझ्या मते, नेमाडेंना हा पुरस्कार पूर्वीच मिळायला पाहिजे होता. त्यामुळे कसबेंनी नेमाडेंचा वैचारिक समाचार घेताना, त्यांच्या एकूणच साहित्यविषक कुवतीवर शंका घेणे योग्य नाही. नेमाडेंची ‘हिंदू’ प्रकाशित होण्याआधी नेमाडेंनी प्रकाशकांच्या नादी लागून ज्या पद्धतीने प्रचार मोहीम हाती घेतली होती, त्यावर मी ‘महानगर’ दैनिकामध्ये असताना ‘नेमाडे विकणे आहेत’, असा अग्रलेख लिहिला होता. नेमाडे असतील किंवा इतर कोणी, माणसाच्या स्वभावाच्या काही त्रुटी असतात. नेमाडे याला अपवाद कसे असतील? हाच नियम कसबेंनाही लागू होतो. त्यांच्या एकूण भूमिकेत काही त्रुटी आहेत, यावर बोट ठेवता येईल. मात्र त्यामुळे फारसे काही बिघडत नाही, यामुळे त्यांचे एकूण योगदानही कमी होत नाही.

नेमाडेंचे मार्क्सवादाबाबतचे आकलन कमजोर आहे, हा आक्षेप कसबेंनी घेतला आहे. यात काही वाद असण्याची बाब नाही. प्रत्येकांची एक वैचारिक भूमिका असते. कसबेंचे मार्क्सवादाबाबतचे आकलन नक्कीच नेमाडेंपेक्षा सरस आहे, नेमाडेंनी कधीही ते मार्क्सवादी असल्याचा दावा केलेला नाही. जग समजून घेण्यासाठी मार्क्सवादाची किमान ओळख तरी असली पाहिजे. ही ओळख नेमाडेंना नक्कीच असावी. नेमाडेंचे एकूणच लेखण हे काही मार्क्सवादी विचारधारेच्या पठडीतले नाही. मात्र नेमाडे, यांचे लेखन वैज्ञानिकतेच्या कसोटीवर टिकणारे आहे की नाही, ते महत्त्वाचे आहे. कोसला, बिढार, झूल, जरीला हे सारे लिखाण वैज्ञानिक कसोटीवर टिकणारे आहे. पांडुरंग सांगवीकर, चांगदेव पाटील ते हिंदूमधील खंडेराव यांच्यात थोडा गुणात्मक फरक करावा लागेल. पांडुरंग, चांगदेव यांची वैचारिक भूमिका आणि खंडेरावची वैचारिक भूमिका यात फरक करावा लागेल. मात्र कसबेंच्या मते, नेमाडे हे ‘सामंती हिंदूवादी’ आहेत. हा एक गंभीर आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता नेमाडेंवर फॅसिस्ट असल्याचा आरोप कसबेंनी केला आहे. व्यक्तिवादी असणे, कंपूशाही करणे आणि फॅसिस्ट असणे यात मूलभूत फरक असतो. फॅसिस्ट केवळ सामाजिक भूमिकेवरून ठरविता येत नाही, तर त्यासाठी एक आर्थिक भूमिकाही असावी लागते. नेमाडेंची काही सामाजिक भूमिका आहे, मात्र नेमाडेंची आर्थिक विचारसरणी फॅसिस्ट असल्याचे म्हणता येणार नाही. त्यामुळे नेमाडेंना एकदम फॅसिस्टांच्या पंगतीत बसवणे, हे नेमाडेंवर अन्याय करणारे ठरेल. बाकी नेमाडेंची इंग्रजीबाबतची भूमिका ही न पटणारी आहे. मातृभाषेतच शिक्षण दिले पाहिजे, असे सांगणारे नेमाडे काही पहिलेच नाहीत. मातृभाषेतूनच विकास होतो, हे पटविण्यासाठी नेमाडे अनेक दाखले देतात, मात्र ते काही नव्याने मांडणी करत नाहीत. हे एक वैज्ञानिक सत्य आहे. मात्र, आपल्याकडे रोजगाराची भाषा इंग्रजी असेल तर बहुजनांच्या मुलांनी मातृभाषेतून शिकावे, असा आग्रह धरणे गैर आहे. इंग्रजीला विरोध करणारे ‘लोहियावादी’ अनेक आहेत. मात्र, त्यांनी आपल्या मुलांंना इंग्रजीत शिक्षण दिले आणि बहुजनांच्या पिढ्या स्पर्धेत मागे पडल्या. त्यामुळे आपल्यासारख्या अर्ध सरंजामी, अर्ध भांडवली विकसित देशात रोजगाराची जी भाषा आहे, तिचे ज्ञान घेतलेच पाहिजे. या कसोटीवर इंग्रजीबाबतची नेमाडेंची भूमिका पटणारी नाही. मात्र, कसबे या बाबतीत नेमाडे कसे अप्रमाणिक आहेत, त्यांनी कसे इंग्रजीत लिखाण केले, याचे दाखले देतात. ते खरे असले, तरी नेमाडेंना ज्या पुस्तकांसाठी नाव मिळाले, ती सारी मराठीत आहेत. काही शोधनिबंध किंवा काही वेगळी मांडणी करणारे लिखाण नेमाडेंनी आधी इंग्रजीत केले, तर त्यात बिघडले कुठे? यावर नेमाडेंच्या एकूण प्रामाणिकपणावर शंका घेणे योग्य नाही.

नेमाडेंच्या जातीविषयक भूमिकेवर सखोल चर्चेची गरज आहे. जातीच्या उत्पतीबाबत नेमाडेंचे ज्ञान एक तर तोडके आहे, असे स्पष्टपणे दिसते. ब्रिटिशांच्या काळात जातींचा उगम झाला, असाही नेमाडेंचा शोध आहे. जातीय सामाजिक रचनेचे नेमाडे वेगळ्या पद्धतीने समर्थन करतात. नेमाडे वरच्या जातीत जन्मले नाहीत, ते ९६ कुळीही नाहीत. मात्र, एकूणच भारतीय सामाजिक रचनेचे त्यांनी केलेले समर्थन हे नेमाडेंची वैचारिक कुवत स्पष्ट करणारे आहे. नेमाडे आपल्या भाषणात कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारख्या महान विचारवंत नेत्यांचा उल्लेख करत नाहीत. नेमाडेंना हा न्यूनगंड कशामुळे आलाय, ते शोधावे लागेल.
नेमाडे नोबेलसाठी आता लॉबिंग करत आहेत, लक्ष वेधून घेत आहेत, असाही एक आरोप कसबेंनी केला आहे. पण, नेमाडेंनी नोबेलसाठी लॉबिंग केले, तर त्यात बिघडले कुठे? पण नोबेलबाबतची नेमाडेंची आधीची भूमिका आणि आता ते लॉबिंग करत आहेत ती कृती, यात विरोधाभास आहे, असे आपण समजले तरी नेमाडेंना भविष्यात नोबेल मिळाले, तर त्याचे स्वागतच झाले पाहिजे. एक मात्र खरे की, आपल्यासारख्या देशात दखल घेणे, हे इतर अनेक बाबींसह जातीवरही आधािरत असते. त्यामुळेच कसबेंसारख्या मोठ्या विचारवंताची देशव्यापी दखल घेतली गेली नाही. खरे तर महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांपेक्षा कसबेंचे योगदान मोठे आहे. मात्र, त्यांना तशी मान्यता देण्यात येत नाही. दुसऱ्या बाजूला नरहर कुरुंदकरांसारख्यांना जी मान्यता मिळाली, तशी मान्यता कसबेंना मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे. मात्र कसबे ज्या जात वर्गात जन्मले, आणि आज ज्या वर्गाचे ते प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांना मान्यता दिली जात नाही, हाही मुद्दा इथे विचार करण्यासारखा आहे.
(bandhulone@gmail.com)