आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूलभूत मानवी प्रेरणांचा धांडोळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्यप्राण्याचा सारा आटापिटा सुख मिळवण्यासाठी चाललेला असतो; परंतु सुख ही व्यक्तिसापेक्ष संकल्पना असल्यामुळे प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी असते. त्या विविध कल्पनांवर नजर टाकली आणि त्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनाचा शोध घेतला, तर मानवी जीवन किती गुंतागुंतीचे आहे, त्याचा साक्षात्कार होतो. सोलापूरचे व्यवस्थापन तज्ज्ञ विश्वास काकडे यांनी लिहिलेल्या ‘मनाचे कवडसे’ या पुस्तकात मानवी जीवनाच्या गुंतागुंतीचा मनोज्ञ वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक म्हणजे काकडे यांच्या 18 छोट्या लेखांचा संग्रह आहे. सुखाची नेमकी व्याख्या काय असावी आणि मानवाचे जीवन अर्थपूर्ण झाले आहे असे कधी म्हणावे, या दोन प्रश्नांच्या अनुषंगाने काकडे यांनी या लेखांमधून काही मूलभूत मानवी प्रेरणांचा धांडोळा घेतलेला आहे.


मानवी जीवन हे हेतूप्रधान असते. या जीवसृष्टीतल्या अन्य प्राण्यांमध्ये आणि मानवामध्ये हाच मूलभूत फरक आहे. हा फरक अनेक जैविक प्रेरणांतून निर्माण झालेला आहे आणि या प्रेरणांच्या आविष्करणात तो स्पष्टपणे जाणवत आला आहे. हे सारे आविष्कार परिपूर्ण आणि परिपक्व नाहीत. मानवाच्या ब-याच जैविक प्रेरणा वैयक्तिक स्वार्थसाधनातूनच प्रकट होतात. त्या प्रेरणांचा आविष्कार अधिक उदात्त कसा होईल, हा जगातल्या विचारवंतांसमोरचा प्रश्न आहे, असे काकडे यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.


काकडे यांनी यशाची आस, सुखाची लालसा, व्यक्तीचे आकलन, स्वप्न, स्पर्धा, सहजीवन, संघर्ष, प्रेम, नातेसंबंध, बुद्धिमत्ता, ज्ञान, आदर्श अशा विविध जैविक प्रेरणा आणि प्रक्रियांसंबंधी थोडक्यात, पण फार मूलगामी विवेचन केले आहे. यातली प्रत्येक प्रेरणा माणसात विकसित कशी होते आणि तिच्या विविधतेशी मानवी संस्कार, रूढ कल्पना तसेच प्रस्थापित वर्गाने तयार केलेल्या संकल्पना कशा निगडित असतात, याचे मर्मग्राही विश्लेषणही त्यांनी पाश्चात्त्य विचारवंतांचे संदर्भ देत केले आहे.


या निमित्ताने काकडे यांनी मांडलेल्या काही कल्पना आपल्याला नक्कीच धक्कादायक वाटतात. सध्या स्पर्धेचे युग आहे आणि स्पर्धेत जिंकेल तोच टिकेल, हा विचार जगाने जवळजवळ मान्यच केला आहे. आपल्या सर्वांच्या मनावर भोगवादी जीवन पद्धतीतल्या संकल्पनांचा प्रभाव असल्यामुळे आपण स्पर्धेच्या अपरिहार्यतेचा स्वीकार करण्यास शिकलो आहोत. पण आजची जगातली स्पर्धा निरोगी आहे का, याचा खोलात जाऊन विचार केला पाहिजे. अशा स्पर्धेमुळे मानव सुखी होणार आहे का? याचा विचार केला, तर नकारार्थी उत्तर येते आणि स्पर्धेपेक्षासुद्धा विधायक सहजीवन हे अधिक सुखकर असल्याचे लक्षात येते.


मानवी जीवन परिपक्व असले म्हणजे ते विज्ञानाधिष्ठित असते, असा निष्कर्ष काही विचारवंत काढत असतात; पण विश्वास काकडे हेही म्हणणे मान्य करत नाहीत. आपले जीवन निव्वळ विज्ञानापेक्षा ज्ञान, तर्कशास्त्र आणि अनुभव या तिन्हींच्या मिलाफातून परिपक्व होऊ शकते, असे त्यांना वाटते. जगण्याचा हेतू नेमका काय, हे जाणून घेऊन त्याच्या आधारे एक लक्ष्य ठरवून जीवनाचा प्रवास करावा, तर त्या लक्ष्याची प्राप्तीसुद्धा सुख मिळवून देत नाही. तेव्हा अशा कथित अंतिम ध्येयाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा त्याच्यासाठी वाटचाल करण्यातच खरे सार्थक आहे, असे काकडे यांना वाटते. अशा प्रकारची वाटचाल वैचारिक कौशल्यांच्या आधारे केली पाहिजे, यावर काकडे यांचा भर आहे.
मानवी जीवनाच्या उद्दिष्टांवर भारतीय अध्यात्मशास्त्रानेही विचार केलेला आहे. स्टीफन कोव्हे यांनीही माणसाच्या क्षमता शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि आत्मिक अशा चार प्रकारच्या असतात, असे म्हटले आहे; परंतु यापैकी आत्मिक क्षमतांचा विचार भारत, चीन आणि जपान या तीन देशांनी अधिक सखोलपणे केलेला आहे, असा उल्लेख काकडे यांनी केलेला आहे. हा सखोल विचार नेमका काय आहे, हे मात्र त्यांनी या पुस्तकात विशद केलेले नाही. ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे.


काकडे यांच्या या पुस्तकातील प्रत्येक लेख मूलगामी तर आहेच; पण त्यातल्या प्रत्येक लेखावर एक पुस्तक लिहिता येईल, असे केतकर यांनी म्हटले आहे. काकडे तसा प्रयत्न करतील की नाही हे माहीत नाही, परंतु या 84 पानी पुस्तकातली तत्त्वे विशद करताना त्यांनी काही उदाहरणे दिली असती आणि काही तत्त्वांचे विवरण विस्ताराने केले असते, तर हे छोटेखानी पुस्तक पुस्तक न राहता मोठा ग्रंथ झाला असता.
पाण्यात चंद्रबिंबाचे प्रतिबिंब उमटते, पण त्यात पाण्याचे वेगवेगळे थेंब तयार झाले, तरी त्या प्रत्येक थेंबामध्ये चंद्रबिंब मात्र स्वतंत्रपणे उमटत असते. तसेच ज्ञानसूर्याच्या या कवडशांचे झालेले आहे. त्या प्रखर सूर्यप्रकाशात जेवढे तत्त्वज्ञान आहे, तेवढेच ते या छोट्या कवडशातही प्रतिबिंबित झालेले आहे.


‘मनाचे कवडसे’
प्रकाशक : ग्रंथाली
पृष्ठे : 88, किंमत : 100 रुपये