आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅटमॅनला पुनर्जन्म देणारा दिग्दर्शक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरहीरोंच्या दुनियेत नैसर्गिक सुपर पॉवर नसलेला परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दुष्ट शक्तींपासून लोकांना वाचवणारा नायक म्हणजे बॅटमॅन. कॉमिक्समधून रुपेरी पडद्यावर आलेल्या या सुपरहीरोने सुपरमॅन, स्पायडरमॅनप्रमाणे लोकप्रियता मिळवली. परंतु नंतर बॅटमॅन शर्यतीतून बाहेर पडल्यासारखा झाला होता. बॅटमॅनला नव्या रूपात आणि एका वेगळ्या विचाराने प्रेरित करीत पडद्यावर आणले. या नव्या बॅटमॅनला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि आता या बॅटमनचा शेवटचा भाग ‘द डार्क नाइट राइजेज’ दोन आठवड्यांनी प्रदर्शित होत आहे. बॅटमॅनला पुनर्जन्म देऊन यशस्वी बनवण्याचे काम केले क्रिस्टोफर नोलन याने.
युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून इंग्रजी साहित्याचे शिक्षण पूर्ण केलेल्या क्रिस्टोफरला लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. वयाच्या आठव्या वर्षीच त्याने वडिलांचा 8 एमएमचा कॅमेरा घेऊन कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या फिल्म सोसायटीसाठी अनेक लघुपट तयार केले. त्यानंतर त्याने 1998 मध्ये ‘फॉलोइंग’ नावाचा चित्रपट स्वतंत्रपणे तयार केला आणि मेन स्ट्रीममध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, फोटोग्राफी आणि संपादन नोलनने स्वत:च केले. फक्त 3 हजार पाउंडमध्ये त्याने या चित्रपटाची निर्मिती केली होती. आठवड्याच्या शेवटीच चित्रपटाचे चित्रीकरण केले जात असल्याने जवळजवळ वर्षभर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. क्रिस्टोफरचे वडील जाहिरात कंपनीत कॉपीरायटर होते. त्यामुळे त्याला वडिलांकडूनच लिखाणाचे बाळकडू मिळाले आणि हेच बाळकडू त्याला हॉलीवूडमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून स्थान मिळवून देण्यात यशस्वी ठरले.
जेम्स बाँडचा प्रचंड फॅन अससेल्या नोलनने 1998 मध्ये हाँगकाँग फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या ‘फॉलोइंग’ चित्रपटाचे प्रदर्शन करून आपल्या पुढील चित्रपटासाठी म्हणजेच ‘मेमेंटो’साठी लोकांकडून पैसा गोळा केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला. याच चित्रपटाची रिमेक ‘गजनी’ नावाने आमिर खाननेही हिंदीमध्ये केली होती. गोल्डन ग्लोब आणि ऑस्करमध्ये या चित्रपटाचे उत्कृष्ट पटकथेसाठी नामांकन झाले होते.
नोलनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे चित्रपट फ्लॅशबॅकने सुरू होतात. क्लोजअपचे दृश्य तो वाइड अँगलने घेतो आणि कलाकाराच्या मागीस सर्व भाग धुरकट करतो. एवढेच नव्हे तर त्याच्या चित्रपटातील मुख्य पात्रे कोणत्या ना कोणत्या सायकॉलॉजिकल विकाराने ग्रस्त असतात. ‘मेमेंटो’मधील नायकाला शॉर्ट टर्म मेमरीची समस्या होती, तर ‘इन्सोम्निया’मध्ये अल पचिनोला नाममात्र झोपेचा विकार असतो. ‘बॅटमॅन बिगिन्स’मध्ये नायक क्रिस्टियन बेलला वटवाघळांचा फोबिया दाखवला होता, तर ‘द डार्क नाइट’मध्ये त्याने आरोन एखार्टमध्ये ड्युएल पर्सनॅलिटी दाखवली होती. तसेच ‘इन्सेप्शन’मध्ये त्याने लिओनार्ड डिकॅप्रियोला वास्तवापासून दूर पळणारा दाखवले होते.
1197 मध्ये वॉर्नर ब्रदरने बॅटमॅन आणि रॉबिन चित्रपट तयार केला. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळल्याने आणि समीक्षकांनीही चित्रपटाला झोडल्याने वॉर्नर ब्रदर्सने बॅटमॅन फ्रॅंचाइजी बाजूला ठेवून अन्य चित्रपटांची निर्मिती सुरु केली. 2003 मध्ये नोलनने ब्लेड चित्रपट लिहिणार्‍या डेव्हिड गोयरसोबत बॅटमॅनची नव्याने रचना करून की वॉर्नर ब्रदर्सला ऐकवली. नव्या दिग्दर्शकाचा कथेबाबतचा आत्मविश्वास पाहून वॉर्नर ब्रदर्सने बॅटमॅन बिगिन्स चित्रपटाला सुरुवात केली. 2005 मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला आणि जगभरातील प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला. त्या वर्षाचा हा अमेरिकेतील सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला तर जगभरातील सगळ्यात जास्त कमाई करणार्‍या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाने नववे स्थान प्राप्त केले. त्यानंतर नोलने द डार्क नाइटची कल्पना ऐकवली. तीसुद्धा वॉर्नर ब्रदर्सला आवडली आणि 2008 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यशस्वी झाला. ऑस्करमध्ये या चित्रपटाला सवरेत्कृष्ट दिग्दर्शकाच्या नामांकनासह आठ नामांकने मिळाली होती आणि त्यापैकी बेस्ट साउंड एडिटिंग आणि जोकरच्या भूमिकेसाठी हीथ लीजरला सर्वर्शेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला. हीथ यांचे निधन झालेले असल्याने नोलनने हा पुरस्कार स्वीकारला. द डार्क नाइटनंतर आता नोलन डार्क नाइट राइजेज हा बॅटमन त्रिधारेतील शेवटचा चित्रपट घेऊन येत आहे. आधीच्या दोन्ही बॅटमॅनप्रमाणेच हा चित्रपटही प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करेल असे वाटते.