आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढाईच पण एकटीची नव्हे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी बरोबर घेऊन आपली वाटचाल सुरू असते. बरेचसे प्रसंग आपण विसरूनही जातो. पण काही आठवणी मात्र मनात घर करून बसतात, अगदी कायमच्या! चांगले प्रसंग आठवले की आपण पुन्हा त्यात रंगून जातो. पण काही प्रसंग आठवायला नकोत असं कितीही वाटलं तरी ते आपला पिच्छा सोडत नाहीत.
सध्या माझ्या बाबतीत असंच काहीसं घडतंय. कारणही तसंच आहे! मागच्या वर्षी फेब्रुवारीत माझ्या दुस-या मुलाचं लग्न झालं. तत्पूर्वी दोन वर्षे मी बीएसएनएलमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. आणि आता ख-या अर्थाने आपण रिटायर होतोय, अशी भावना डोक्यात होती आणि अचानक गाडीला ब्रेक लागला...
लग्नानंतर महिनाभरातच छातीत उजवीकडे एक गाठ जाणवली. रोजच्या कामाच्या व्यापात ‘तिचा’ विचार उलट-सुलट त्रास देऊ लागला. या बाबतीत खूप सखोल ज्ञान नसलं तरी थोड्याफार वाचनामुळे, ऐकिवामुळे, ती तपासून घ्यावी असं एकदा वाटायचं. तर दुसरं मन हे आव्हान स्वीकारायला तयार नव्हतं. कारण आपल्याबाबतीत वावगं काही घडूच शकत नाही, असा फोल विश्वास होता. मुलगा एमडी आयुर्वेद आहे.
शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो. त्याच्या कानावर ही गोष्ट घातली. मी त्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंटकरिता आग्रह करू लागले. त्याने प्रथम ती गाठ तपासण्याकरिता मला राजी केलं. तोपर्यंत एप्रिलचा दुसरा आठवडा उजाडला. मॅमोग्राफी व नंतर एफएनएसी टेस्ट करवून घेतली आणि दोन दिवसांतच रिपोर्ट आला आणि तो बघताच आमच्या पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला. कारण तो रिपोर्ट ‘मॅलिग्नन्सी पॉझिटिव्ह’ असा होता! मला ब्रेस्ट कॅन्सर झालाय हे कटू सत्य स्वीकारणं भाग होतं. आठ-दहा दिवस खूप टेन्शन! रोजची कामं सवयीनं कशीबशी पार पाडत. पण घरात आम्ही कुणीच एकमेकांच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतो. आमच्याबरोबर घरात आलेली नवी सूनबाईही बावरून गेली. स्वाभाविकच होतं. तिचा काहीच दोष नव्हता पण आलिया भोगासी...
प्रथम ऑपरेशन व नंतर किमोथेरपी ट्रीटमेंट म्हणजे मोठ्ठा राक्षस पुढे उभा असल्याचा भास! आमचे नातेवाईक डॉ. धनेश्वर व माझा मुलगा यांनी खूप चांगल्या प्रकारे मला समजावलं, ऑपरेशनसाठी तयार केलं. आम्ही सारेच एव्हाना बरेच सावरलो. मी घरातील माणसांकरिता व सर्वांनी माझ्याकरिता अश्रूंना बांध घातला व एकमेकांना सांभाळीत आम्ही प्रसंगाला सामोरे गेलो.
30 एप्रिल 2012, नगरलाच नोबेल हॉस्पिटलमध्ये डॉ. सोनावणे यांनी ऑपरेशन व्यवस्थित पार पाडलं. ड्रेन पाइप, भरपूर टाके यांचे खूप मोठं भय मानात होतं. त्यातून कशीबशी बाहेर पडले. पण पुढे किमोथेरपी भेडसावत होती. एक वर्षापूर्वी, 22 मे रोजी पहिली किमो पार पडली. प्रचंड मळमळ, घरी आल्यावर शरीरावर सूज, अस्वस्थता, काय होतंय हे शब्दात सांगताच येत नव्हतं.
खरोखर ही एक मोठ्ठी परीक्षाच होती माझी व माझ्या पूर्ण घराची! सहा पेपर्स होते हे दर 21 दिवसांनी! 6 सप्टेंबरला किमोथेरपी पूर्ण झाली. प्रत्येक किमोनंतर एक दिवसाआड 3 इंजेक्शन्स व ब्लड टेस्ट असायची. सगळं व्यवस्थित पार पाडलं.
ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी आम्ही श्री गुरुमाउलीचं दर्शन घेऊन आलो (श्रीक्षेत्र सोनई.) घरातलं जगदंबेचं अधिष्ठान व सद्गुरूची कृपापाखर यामुळेच या काळात मन शांत ठेवू शकले मी. शिवाय भरपूर ग्रंथवाचन व कॅन्सर संदर्भातील अनेक पुस्तके वाचून झाली, त्याचाही मला फायदा झाला. धीर आला.
सद्गुरूंना मनापासून एकच प्रार्थना होती-
‘मज ज्ञान असे हे भोग भोगणे असती
सहण्या द्या माउली शक्ती!’
आणि माझी हाक त्यांनी ऐकली! माझा पूर्ण गोतावळा अनेक रूपांनी माझ्या पाठीशी उभा राहिला. खरंच सांगते, कॅन्सरमधून बाहेर पडणं एकट्याचं कामच नाही. ते एक टीमवर्क आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला.
माझी धाकटी जाऊ धाकट्या बहिणीप्रमाणे खंबीरपणे माझ्या पाठीशी होती. मोठा मुलगा लंडनला असतो. तो नुकताच येऊन गेल्याने येणं शक्य नव्हतं पण सूनबाई येऊन भेटून गेली. माझ्या दोन्ही भाऊ व वहिनींनी वारंवार येऊन खूप मानसिक आधार दिला व सर्वांनी मिळून आम्ही ही लढाई जिंकली.
घरातील आध्यात्मिक वातावरण, पूर्वजांची पुण्याई, जोडीला माझ्या मुलाने घेतलेले कष्ट, आयुर्वेदिक ट्रीटमेंट, प्रत्येक किमोपूर्वी करवून घेतलेले अभ्यंग वगैरे आणि माझ्या माणसांनी दिलेला धीर यामुळेच मी या दिव्यातून सुखरूप बाहेर पडले. यानिमित्ताने माझ्या मैत्रिणींना मला सांगावेसे वाटते की, प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीवर तीव्र इच्छाशक्ती आणि आपल्या माणसांच्या जोडीने मात करता येते.