आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meghana Shrotri Article About Fabrics From The North East

ईशान्येची बहार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद आला नि आपल्याबरोबर गणपती-गौरी व इतर व्रतवैकल्यं घेऊन आला. सण, व्रतं म्हटली की ओघाने पूजा व त्यामुळे सोवळे-ओवळे, भेटी-गाठी आल्या. या दोहोंसाठी व त्या निमित्ताने पाहू काही आगळीच वस्त्रे - लांबदूर ईशान्य भारतातील. सोवळे नेसून पूजाअर्चा इत्यादी विधी करायचे म्हणजे ते पेहराव कसे नजरेत भरणारे तर हवेत; मात्र नेसणा-यास त्याची फारशी काळजी करायला लागू नये. काम झाले की सोडून जशास तसे ठेवता यावे किंवा ज्यास डाग पडलाच तर तो काढता यावा; खोच तर लागूच नये. तर असे एक जादुई वस्त्र : आसामचे.
हातमाग व पर्यायाने वस्त्र विणणे हा इथला सर्वात मोठा व प्राचीन उद्योग. त्यामुळे ही इथली जीवनशैलीच आहे. इथल्या सर्वांची व या अख्ख्या प्रदेशाची. रेशीम तयार करण्याची कला कदाचित येथेच जन्मास आली असावी. येथेच ती साहजिकच प्रगतही झाली. येथे त्यामुळे रेशमाचे विविध प्रकार पाहावयास मिळतात. एंडी, मूगा, पाला हे त्यातील अधिक लोकप्रिय. यातदेखील ‘मूगा’ हा आपल्या अधिक परिचयाचा. ‘कांचनस्वरूप’ राजस व मोहक! त्याच्या अंगच्या ‘सुवर्ण’ रंगामुळे नजरेत भरतो व मनश्चक्षूही दिपवतो. हे जणू कमीच की काय म्हणून त्याला अंगभूत टिकाऊपणाचीही देणगी आहे. हो आता, जो एवढा राजासम भासतो तो नाजूक थोडाच असणार आहे? तर हे मूगा रेशीम असे दणकट की हे घरी धुऊनही चालते बरं आणि चांगले वापरले तर अधिकाधिक उजळते. मात्र हे रेशीम सहजासहजी ‘ब्लीच’ करणे वा ‘रंगवणे’ शक्य नसते.
आता सोनसळी झळाळी कमी करण्याची वा दुस-या रंगाने झाकायची हौस तरी कोणी व कशासाठी बाळगायची? पण ‘सोने पे सुहागा’ म्हणतात तशागत जरासे उठाव हवेसे वाटू शकतात. ती कारागिरी करण्यात येथील बुद्धिमान लोकांनी चांगलंच यश मिळवलंय व म्हणूनच येथे रेशीम उद्योगाबरोबरीने हातमागावरचे विणकामही बहरले. तर अशा प्रकारे तयार होते ‘मेखला चादर’ जे आहे येथील राजवस्त्र/राज्यवस्त्र - आसामी स्त्रियांचा पारंपरिक वस्त्रप्रकार, बराचसा साडीसारखा दिसणारा. यावरील बुट्टे व किनारीच्या लकेरी सहसा लाल असतात. आसाम, तसेच त्रिपुरा व मणिपूर या सर्व ठिकाणी अत्यंत सुंदर कलाकुसरीचे नमुने पाहायला मिळतात. ब-याचदा निसर्गाच्या प्रेरणेतून वा मदन कामदेव मंदिराच्या वास्तुकलेतून स्फूर्ती घेऊन.
याच्या बरोबरीने येते मणिपूर. वर उल्लेखल्याप्रमाणे रेशीम वस्त्रोद्योगात ते आसामसारखे असले तरी सुती वस्त्रोद्योग ही मणिपूरची आगळी ओळख होय! Moiraingphee, Lasingphee
व phonec हे वस्त्रप्रकार हा लौकिक पटवण्यास पुरेसे ठरावेत. खरं म्हणाल तर वनवासी हातमागच. पंचासदृश. पण हा रोखठोक साधेपणाच याला त्याचे वेगळेपण देतो आणि हातमाग तरी कसा गमतीशीर, एक अशी विणण्याची सोयच म्हणा की जी रकसॅक वा बॅकपॅकसारखी घेऊन जाता येईल! इथल्या सुना हा उद्योग लग्नात आपल्याबरोबरच घेऊन येतात. आता वर्षानुवर्षांच्या मेहनतीने, निगुतीने, त्यांनी या वस्त्रांचे पंचासदृश रूप अत्यंत तलम मलमलवजा केलंय. व्यावसायिक विणकाम मात्र पुरुष करतात.
या नाजूक, सुरेख लावण्यवती त्यांच्या phanec-innaphi

म्हणजेच रॅपअराउंड स्कर्ट व टॉपमध्ये तितक्याच सहज, सुंदर, नाजूकपणे वावरतात. या पोशाखात त्या तितक्याच तरतरीत व चटपटीतही दिसतात. मात्र भडकपणाचा लवलेशही नसून इथे सर्व आसमंत त्या त्यांच्या मोहकतेने व्यापून टाकतात. ही वस्त्रे विणताना जणू त्यास लागणारे ताणे-बाणे हे सौंदर्य व साधेपणा यांचेच असावेत! यात गुंफली जाणारी डिझाइन्स ही इथल्या ताज्यातवान्या व सदाहरित निसर्गातूनच थेट उचलून घेतल्यासारखी असतात.
सरीवर सरींनी सर्व आसमंत हिरवागार झालाय, मग अशा वेळी आपणही तत्सम पेहराव करून त्याच्याशी व पर्यायाने ईश्वराशी तादात्म्य साधण्याचे प्रयत्न केले तर? पण इतके सोपे नाही बरं हे वस्त्रप्रकार मिळवणे. कारण त्यांचा प्रसार व विपणन तेवढ्या प्रमाणात झाले नाहीये (अजून तरी.) तर चला. नेहमीपेक्षा थोडा वेगळा विचार करू. आता सगळीकडे हातमाग प्रदर्शने लागतात, त्यात हे प्रकार सहज मिळू शकतील. वा कोणी तेथे भ्रमंती करायला जाणार असतील तर थेट भेटीत. ही आगळी, अतिसुंदर भेट आपणास लाभावी ही मन:पूर्वक इच्छा.