आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शुभमंगल सावधान!’ असे म्हणण्यापूर्वीच जर सावध होण्याची वेळ जर एखादी मुलगी आणि तिच्या आईवडिलांवर आली तर ते किती चांगले असते याचा अनुभव आम्हाला काही वर्षांपूर्वी आला. त्याचे असे झाले. माझ्या चुलतभावाचा मला फोन आला की, अक्का, तुम्ही दोघेही रविवारी सकाळी लवकरच या. शोभाचा साखरपुडा आहे. माझ्या माहेरचे पहिलेच शुभकार्य म्हणून मला फार आनंद झाला. रविवारी आम्ही लवकरच भावाकडे पोहोचलो. माझ्या माहेरचे झाडून सगळे नातेवाईक जमा झाले होते. टेरेसवर मंडप सजला होता. गुलाबजाम, व्हेज पुलाव इ. स्वयंपाक तयार होता. अन्नपदार्थांचा सुवास, पाहुण्यांचा गलबला आणि सनईचा सूर यामुळे वातावरण मंगलमय झाले होते.


इतक्यात नवरा मुलगा, त्याचे आई-वडील आले. सर्वांनी त्यांचे स्वागत केले. ब्राह्मणांनी पूजा मांडली. ‘चला, चला, पूजा सुरू करू. नवरानवरीचे मामा बोलवा,’ असा पुकारा झाला. नवरीचे मामा आले. त्यांनी नवरदेवाच्या वडिलांना विचारले, ‘काय पाहुणे, सुरू करायची का पूजा?’ नवरदेवाचे वडील काहीच उत्तर न देता बायकोच्या तोंडाकडे पाहत बसले. इतक्यात विजेचा कडकडाट व्हावा तसा नवरदेवाच्या आईने डोळे गरागरा फिरवीत वेगाने हातवारे करीत ओरडायला सुरुवात केली. ती ओरडत होती, ‘काय, काय म्हणता, पूजा सुरू करायची का? माझ्या मुलाला पहाडासारखे चार मामा आहेत. त्याचा बाप बावळट, मूर्ख आहे. त्याला काय विचारता? मामा आल्याशिवाय साखरपुडा होणारच नाही!’


हे सगळे ऐकून लोक अगदी चिडीचूप झाले. नवरीचा मामा आता नवरदेवाला म्हणाला, ‘पाहुणे, फोन लावा बरं तुमच्या मामांना. ते अजून किती लांब आहेत ते पाहा. दुपार भरत आली. आपण त्यांच्या परवानगीने पूजेला सुरुवात करू. तुमचे वडील आहेत ना इथे!’ हे ऐकून नवरदेव उभा राहिला नि म्हणाला, माझी आई म्हणते तसेच होईल. मामा आल्याशिवाय काहीच होणार नाही. माझ्या वडिलांना काय कळते, तो बावळट, मूर्ख आहेत.


एकीकडे नवरदेव आणि दुसरीकडे त्याची आई बडबडत होती. खूप गोंधळ झाला, सगळे नातेवाईक चिनभिन झाले. आता मात्र आम्हाला खूप चीड आली. इतक्या लोकांसमोर वडिलांबद्दल अपमानकारक बोलणारा हा नवरदेव आणि त्याची आई आमच्या अगदीच मनातून उतरली. अशा बाईला आमची नाजूक, सुंदर, निरागस भाची सून म्हणून द्यायची? अशा ममाज् बॉयला आमची मुलगी द्यायची? छे, अजिबात द्यायची नाही.


आम्ही निर्णय घेतला, आता आम्ही मुलगी देणार नाही. आम्ही स्पष्ट सांगितले, देऊ नको यांना मुलगी. हाकलून दे यांना. दुसरा मुलगा मिळणार नाही का?


सगळीकडे गोंधळ झाला. साखरपुडा मोडला. माझी भावजय बेशुद्ध झाली. माझ्या भावावर आकाश कोसळले. खर्च वाया गेला. चार माणसांत चर्चा झाली; पण मुलाची आणि त्याच्या आईची खूप नाचक्की झाली. जे झाले ते लग्नाआधीच उघड झाले म्हणून बरे. लग्नानंतर काय झाले असते? माझ्या भाचीचे लग्न त्यानंतर दुसरीकडे जमले. नात्यातच दिली. चांगला स्मार्ट, सुशिक्षित जावई मिळाला. ती आज सुखाने संसार करते आहे. दोन गोंडस मुलेही आहेत.


स्त्रियांवर अन्याय, अत्याचार होतात हे खरे आहे; पण पुरुषांवर अन्याय, अत्याचार होतात. हे बायकोकडून होतात, हे मात्र झाकले जाते. भर कार्यक्रमात नव-याला बावळट, मूर्ख म्हणणारी ही बायको घरात नव-याचे काय हाल करीत असेल, विचार करण्यासारखी बाब आहे. कुठे तरी सरकारी कार्यालयात जबाबदारीने नोकरी सांभाळणारा हा माणूस इतका दीनवाणा का झाला असेल? हल्ली कुंकू, मंगळसूत्र न वापरता जीन्स घालणा-या, नव-याला पाठीवर थाप मारून ‘अरे यार, तू मला चायनीज खाऊ घाल’ म्हणणा-या मुली. पती-पत्नी समान आहेत. घरकाम एकटीनेच का करायचे? बांगड्या बायकोनेच का घालायच्या, इत्यादी आधुनिक मुलींचे विचार मला पटतात. बरोबर आहे. पुरुष आणि स्त्री समानता असायलाच पाहिजे. काही हरकत नाही. प्रत्येक गोष्टीचे वाईट आणि चांगले परिणाम हे असतातच. ज्या घरात पुरुषांचा कर्त्या पुरुषाचा असा अपमान होत असेल त्या घरातील बालकावर काय संस्कार होतील याचाही विचार व्हायला हवा. तुम्ही अन्याय, अत्याचार सहन करू नका; पण इतरांचा अनादर होईल असे तरी वागू नका. शेवटी जसे बी पेरले तशीच फळे येतात हे विसरू नये.