आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीच्या गोष्‍टी मनावर घ्‍यायच्या....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शऽऽ हात नको माझ्या बॅगमध्ये.’ रंगीत वेष्टनांना भुलून आरतीने सॅनिटरी नॅपकिन्स काढलेले दिसल्यावर दादा आणि बाबांसमोर कधी नव्हे ती गडबडून मावशी ओरडली. खरे तर एक नमुना गिफ्ट देऊन त्याअनुषंगाने ज्ञानात भर पाडण्याची एक संधी होती. वेळ येणारच आरतीने त्या प्रकाराला सामोरे जाण्याची...


शाळेत होतं म्हणे ओरिएंटेशन. छान. नसतं अवघडलेपण नाही राहणार मुलामुलींच्यात. दादाला पण अंदाज असणं आवश्यकच. मस्तीच्या मर्यादा कळतात त्या दिवसातल्या. आताआतापर्यंत आरती अशा वेळी खूप वेळ फुगडी न खेळल्याबद्दल, सर्कशीत भाग नाही म्हणून मावशीला भंडावत असे. बरं नाहीये म्हटलं तर काय होतंय? ताप नाहीये, ऑफिसला गेलीस, झोपायचं नाही, डॉक्टरकडे जायला नको, बरी हो ना... असे डोसही देऊन मोकळी.


तीन दशकांपूर्वी शाळेतल्या शेवटच्या वर्षात मोठ्या मुलींची कुजबुज, स्कर्टचा कोपरा धुणं, मुलांचे विचित्र उत्सुकलेले चेहरे, गोंधळलेल्या लहान मुली. ‘कावळा शिवलाय, जवळ जाऊ नको तिच्या,’ असे घरी येता-येताच मिळणारे आदेश. ‘कावळा? कुठून आला? शिवला म्हणून मी का आत्याला शिवायचं नाही?’ अशा प्रश्नांवर बावळट म्हणून हेटाळणं. ‘अक्काचा तांब्या उपडा झालाय म्हणजे कसा? तसा नको तर उचलून का नाही ठेवायचा उताणा,’ असे लहानग्यांचे शहाणपण, त्यावर अगोचर मेले म्हणून मोठ्यांनी झटकणं. माई-राधांचं येणं, नेहमीसारखं गळ्यात गळे घालून नाही तर रस्त्याच्या दोन टोकांवरून समांतर. हे विभक्तपण आमच्या घराच्या कोप-याहून पुढे त्यांच्या घराचा कोपरा येईपर्यंत म्हणजे मोठ्यांच्या नकळत मोडणं. गावाकडं बेबाक्काचं न्हाणुलीबाई म्हणून गौरीच्या मखरात सजवून औक्षण. नेहमीची हसरी, खेळकर बेबाक्का या सोहळ्यात नाराज, गंभीर. ‘वयनीबायची चोरचोळी होती,’ सख्यांची नळावर कुजबुज. विमलीच्या ओटीभरणासारखं उघड न बोलता भवान्या कानाशी लागून बोलतात? चोरचोळी म्हणजे चोरीसारखंच का काही? श्रावणातल्या कहाणीत नवरीची चोळी उचलून पाहुण्यांच्या अंथरुणात टाकण्याच्या उंदराच्या उपद्व्यापाने नवरीवर आळ घातलाय, का? नदीवर धुण्याला आलेल्या नवपरिणीता रमीस, कळसाचं पाणी म्हणून डिवचणं, रमीचं मुक्त लाजणं, सख्यांचे पदराआड खुसूखुसू. शुक्रवारच्या कहाणीत राणी सुईणीला म्हणते, नाळवारीसुद्धा एक मुलगा आणून दे. म्हणजे कोणत्या वारी याचं उत्तर काकूने दिलंच नाही कधी. सगळंच चिवित्र.
आरतीच्या प्रसंगाने स्मृती मन:पटलावर झरझरत राहिल्या. त्या सर्ववेळी उत्सुकता न शमल्याने, मुळात एरवी कौतुकाने शब्द-अर्थ समजावून देणा-या मोठ्या माणसांकडून टाळाटाळ झाल्याने, वैताग आणि दु:ख यापलीकडे कुतूहल छळत राहिलं. पुढच्या पिढीसाठीही असंच? मागे काकू जोगवा घ्यायला आलेल्या. राणीला म्हणाल्या, ‘बरी आहेस ना? नाहीतर आईला सांग घालायला.’ त्यावर राणीचं फणकारणं, ‘काय बोलतात.’ आईने समजून घेत ‘काकूंसाठी तांदूळ घे डब्यातले,’ असं काम करता करताच राणीला सांगितलेलं. काकूंचा ‘गुणी आहे पोर, कल्याण होईल,’ असा आशीर्वाद, मामीचा घाईघाईत फोन. ‘पाळीत नाहीयेस ना? ये पूजेला.’ पुरणावरणाचं जेवायला माहेरी निमंत्रण नि त्यावर राणीचं फणकारणं. ‘स्पीकर ऑन करण्याआधीच फोन उचलला हे बरंच झालं. हॉलमधल्या फोनवर विचारलेस धडधडीत?’


‘राणी, बरी आहेस ना?’चा अर्थ पुढे कळला तेव्हा त्या काकूपणाला खदखदून हसलेली सख्यांसह. आज पस्तिसाव्या वर्षी, उच्चविद्याविभूषित, संसाराला लागल्यावरही, पाळीसंबंधी शब्द चारचौघात नाही झेपवू शकत. धुसमुसलेली राणी तिकडे जाऊन पूजा देवासाठी नाही, माणसांनी माणसांना भेटून करण्याचा आनंदसोहळा, विशिष्ट नैसर्गिक अवस्थेतल्यांना निमंत्रण नसणे अयोग्य हे का आडभाषेचा आधार घेत समजावणार?


सणकी तरुणाईचे ‘फक-इट’ ‘बुलशिट’सारखीच शिवी असणार असे वाटलेलेच. यूट्यूबवर टोननुसार विविध अर्थ असा व्हिडिओ मिळाला. इंग्रजाचे इंग्रजी समजून घ्यायला वेळ लागेल म्हणून तत्काळ न पाहताच, भाषेशी निगडित म्हणून उत्साहाने मित्र-मैत्रिणींना लिंक पाठवली. एक प्रतिक्रिया, अनुभव घेऊन बघ, मजा येईल. थोडक्यात हे वैषयिक दिसते हे उमजून व्हिडिओ डिलीट आणि मित्राला कट. शांत डोक्याने चित्रफीत पाहिली असती तर कदाचित भाषेतल्या गमतीत रमवून कळसाचे पाणी, अंथरुणात चोळी आणि नाळवारीसारख्या संज्ञा न अडखळता समजावण्याचा खजिना हाती येता. मित्राचे आभार मानल्याने फिरकी घेणा-याची खोडकी जिरती.


शास्त्रीय माहिती मिळवून बायकोच्या गर्भारपण नि बाळंतपणात समरस होण्याचा प्रयत्न करणा-या डीचे मला सादर कौतुक. शिक्षण मनात भिनले तर मोकळेपणा वाढतो. ब्लॉकमागच्या झाडीत हस्तमैथुनासाठी आलेल्या झोपडपट्टीतल्या युवकाला समजून घेता येतं, भीती नाही वाटत. जगणं सुकर होतं.


लैंगिकतेशी संबंधित गोष्टी उच्चशिक्षितांनाही सहज घेता येत नाहीत. प्रबोधनाच्या संधी घालवतो आपण. अफलित स्त्रीबीजांचा तांब्या निसर्ग महिन्यागणिक उपडा करतो नव्या बीजांना संधी देण्यासाठी. कावळा, मेलेल्याचा पिंड, शिवलाय, अर्थात फळलेले नाही असे असेल. शिवाशीव अशुद्धतेची, धकाधकीपासून दूर राहण्याची. जंतुसंसर्ग टाळणे, थकलेल्यास विश्रांती देणे गैर नाहीच. आज रजस्वलेला स्वच्छतेची हमी घेऊन, ताकदीनुसार सामाजिक सोहळ्यात भाग नक्की घेता येईल, स्थिर मनाने जोगवा घालता येईल, बरीच असेल ती. न्हाणुलीचे सोहळे घाबरलेल्या कन्येच्या भरकटलेल्या मनाला कौतुकाने धीर देऊन शरीरधर्म आणि त्याचा जीवनातील अर्थ समजावून सजग करण्यासाठी, भवतालच्यांना त्यातून तिच्या मर्यादांबद्दल सांगणं. नवजात गर्भाचे जवळच्यांकडून स्वागत. गाजावाजा, दगदग नको, अजून वाढीला लागायचाय तो. भरल्या ओटीचा सत्कार यथावकाश, जडावलेलीचे रंजन करून तिची, बाळाची काळजी घ्यायला सारे तत्पर आहेत हा दिलासा देण्यास. असे भाषेतील सूचन शोधून स्पष्ट केले तर विषय पुरेसा सोपा होईल.


दोनेक तासांच्या भटकंतीनंतर शूला जाता येईल? शास्त्रज्ञ सखीस चिंता. आम्ही तिचे ऐकून व्यवस्था कुठे होईल हे सुचवायचो, बाकीचे टरच उडवायचे. दुसरी जीवशास्त्राची प्राध्यापिका, भ्रमंतीचं वेड. चार तासांत एकदा गाडी थांबवणार ना? मला एक नंबरला जावं लागेल. तिच्या या प्रश्नावर वाहकाचे सटपटणे मी अनुभवलेय. सहप्रवाशांच्या नजरांना भिडून शरीरात तयार होणा-या विषद्रव्यांना चार-पाच तासांत बाहेर काढण्याची गरज हे बौद्धिक घ्यायला लागली की त्यात भाग घेण्याऐवजी बहुधा टकळी बंद नि नजर बाहेर असे कितीदा तरी माझेसुद्धा झाले आहे.


बिनधास्त गरारा वर धरून रस्त्याकडेला मोकळ्या होणा-या भटक्या सुंदरी, बसमध्ये आजूबाजूच्या मर्दांची क्षिती न बाळगता राजरोसपणे मुलाला मनमुराद स्तनपान करू देणारी उमदी माता या चित्रांची हिमाचलाची पार्श्वभूमी बदलून तिथे महाराष्‍ट्र माझा नजरेसमोर आणला तर काय दिसले? तीन वर्षांचा सुबोध पंक्तीत दूध मागतो; मिंटी पण काय, पुरुषांसमोरच पाजायला घेते. कसं चालतं घरच्यांना कोण जाणे. पुरेसा मोठा झाल्यावर तो असं करणार नाही आणि बाळाचीच भूक भागवतेय ना, या मिंटीच्या स्पष्टीकरणावर तिची आईसुद्धा बाजू घेण्यास असमर्थ. आडोशाला नको तर स्त्रियांसाठी रस्तोरस्ती मुता-या बांधा. मैत्रीण पोटतिडकेने मांडत होती. गरज आहेच हे कळूनही जमावाच्या नजरेत मैत्रीण वेडी होती किंवा आंदोलक तरी. सहवेदना उणावलेलीच. बेगडी शिक्षितांच्या तुलनेत आदिवासी बांधव ज्ञानाच्या उपयोजनात पुढे आहेतसे वाटले.