आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुर्वात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्याचं आसं झालं बघा...
माझी येक सासू हाये. येक येवड्यासाठी म्हण्लं का आजूक दुसरीबी हाये.
तर या सासू नं. येकचं टकुरं फिरलं. ती आदीमदीच गांगरल्यावानी कराय लागली. तिचं चित्त काई था-यावर -हाईना. येळ -हाइली नाई काळ -हाइला नाई, बाई विहिरीतून पाणी उपसू उपसू घडाघडा आंघोळ करायची आणि तशाच वल्ल्या लुगड्यानं आभाळाकडं बघत बसायची. भाकरी वाढली तर भाकरीये कळंना. ती खायची आस्ती हे उलगडंना. नि-हान टुकूरटुकूर बघत बसायची. सासरा कावायचा. त्यानं तरी शहाण्यासुरत्या सासू नं. दोनकडं बघावं का या येडीकडे बघावं? मी दोनचारदा सांगून पाह्यलं का तिचं दवापाणी करू. ती बरी होईल. पण ती बरी व्हायला होवी होती कोणाला? सासरा खेकसायचा. मग ही तरातरा उठून बाह्येर पडायची. कुठं गावंल कोण्णाला सांगता येयाचं नाई.
रात्री घंटाभर शोधून सासूला हाताला धरून समजावून घरी घेऊन येयाचं काम माझं.
त्यात आमच्या ध्यानाला कोणतरी सांगलं का तिला रामनाम लिहायला सांगा येक कोटी.
येक कोटी? आमच्या ध्यानाला तर सांगता पण यायचं नाही का म्हणजे येकावर किती शून्यं येत्याल? आणि येक कोटी राम कशे काय गिनायचे? तर सांगणा-यानंच हिशेब करून सांगलं का येका वहीत आमुक इत्के राम मावत्येत, तर गिनती करून तमुक इत्क्या वह्या होयाला होव्या.
आमचं ध्यान घरी कोणाला न इचारता न सांगता जिल्ह्याला गेलं आणि आर्धं पोतं वह्या आन थैलीभर दोन-दोन रुपयावाली बॉलपेनं घ्येऊन आलं.
सासू पोतं आंथरून देवापुढं बसायची ल्येकरावानी लिवत. गपगार.
येका दिवशी पोत्यावरच मेलेली कळली. उघड्या वहीवर उघड्या तोंडानं पडली होती. आंग आखडून मुटकुळं झालेलं. तोंडातून लाळ गळल्यानं कागद वल्ले झाले होते. आणि शाईचे डाग झाले होते.
सास-यानं तिचं काय चार सोन्याचे डाग, जरीची लुगडी होती ती सासू नं. दोनला दिली. मला दोन जुनी लुगडी दिली. आता मी काय नववारी नेसत नाई. मग लुगड्यायची गोधडी शिवून घ्येतली ड्रिंकर टेलराकडनं.
या टेलराचं नाव खरं दिनकर हये; पण सदा न कदा त्येनं टाकलेली आस्ते म्हणून आमचं ध्यान त्येला ड्रिंकर म्हणते. आता सगळं गाव त्येला ड्रिंकरच म्हणत्ये.
मग सवाल आला की आता या वह्यायचं काय करायचं? ना जाळता येणार ना पुरता येणार. नदीत वाहावायचं तर नदी कोरडीठाक आमच्या बदलापुरातली. मग आमच्या ध्यानानं लिवलेल्या वह्या रचून त्यावर मखमलीचा कपडा टाकला आणि देव्हारा खाली ठेवलेला होता, तो त्या वह्यायच्या टेबलावर चढला. येताजाता उभ्या उभ्या नमस्कार करायची सोय झाली. नायतर येरवी सासरा खाली मांडी घालून बसायचा. हळद,कुंकू,फुलं-पत्ती वाहायचा. नमस्कार करून सोताच्या फडाफडा थोबाडीत मारून घेयाचा. माफ कर माफ कर पुटपुटायचा.
मी म्हण्ते का आदीच इत्की पापं करावीत कशाला माण्सानं?
तर अशानं उरलेल्या को-या वह्या माझ्या वाटणीला आल्या.
मला आजून ना लेकरू ना बाळ. नाई तर शाळेत जाणारी पोरं आस्ती म्हणताना उप्योग झाला आस्ता. आता वह्या हईत, प्येनं हईत, तं आपणच काईतरी लिवाव म्हण्लं. नाईतरी मी यफवायबीये आर्थशास्त्र शिकल्येय इत्की वरषं, त्ये विसरून कस्काय चालंल? बायायनी शिक्षण विसरू नाई. मग सुर्वात क्येली.
आसं म्हण्ता आसं झालं.
(क्रमश:)