आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिइंग ‘स्मार्ट’!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिइंग स्मार्ट! इथे ‘स्मार्ट’ हा शब्द म्हणजे स्पेसिफिक, मेझरेबल, अचीव्हेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड अशा पाच शब्दांच्या आद्याक्षरांनी बनलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या, वेगवान आणि अनिश्चित युगात ध्येय डोळ्यापुढे न ठेवून फक्त काम करत राहणे आणि मी कसा सुखी आहे, एवढाच चाकोरीबद्ध विचार करणे अयोग्य. नर्मदेतल्या गोट्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाहाबरोबर ढकललं जाणं आणि कौतुकाने ‘खेळलो खेळ झाला जसा’ असं साहित्यिक पंचलाइन लावून उगी राहणे बरे नव्हे.

आयुष्याला वळण लावायचे झाले, तर ध्येय हवे. ध्येय डोळ्यासमोर असल्यावर माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो, एक निश्चित दिशा मिळते. हीच दिशा आपल्याला हेतू देते. हेतू समोर असल्यामुळे कामात, कामावर लक्ष केंद्रित व्हायला मदत होते. आपण भरकटत नाही. वेळ वाया जात नाही. ही ध्येयनिश्चिती स्वखुशीने असावी, आवडीची, गरजेची व स्वत:च्या कुवतीशी सांगड घालणारी असावी. मग बघा, आपल्या हातून कसे अजुबे घडतात ते. ध्येयनिश्चिती म्हणजेच ‘स्पेसिफिक’. ध्येय निश्चित करताना ते ‘मेझरेबल’ म्हणजेच मोजमाप करता येण्याजोगे आहे ना, याची खातरजमा करणे आवश्यक. त्या ध्येयासाठी असणारे वेगवेगळे मापदंड माहीत असावेत म्हणजेच ध्येयपूर्तीच्या मार्गावरचे अजून किती मैलाचे दगड आपल्याला पार करायचे आहेत, ध्येयापासून आपण किती लांब आहोत हे कळते.

ध्येय नेहमीच ‘अचीव्हेबल’ म्हणजे साध्य करण्याजोगे असावे. स्वत:च्या आकलन क्षमतेपेक्षा, सामर्थ्यापेक्षा ते जास्त नसावे. आपली बौद्धिक, शारीरिक, मानसिक कुवत लक्षात घेऊन ध्येय आखावे. त्रयस्थ दृष्टीने स्वत:च्या कुवतींचा विचार करावा. ‘रिअलिस्टिक’ म्हणजे वास्तववादी. ध्येय व्यवहाराला धरून आहे ना, साध्य करण्याजोगे आहे ना, उगीच वल्गना करून हवेत बाण मारलेले नाहीत ना, स्वत:च्या ध्येयाला आपण गवसणी घालू शकू ना, असे ध्येयाला केंद्रबिंदू मानून 360 अंशांनी त्याचा विचार करायला हवा.

‘टाइम बाउंड’ म्हणजे कालमर्यादा नियोजित ध्येय. ध्येयपूर्तीसाठी किती काळ लागेल, हा विचारही फार आवश्यक. ही कालमर्यादा फार महत्त्वाची. नाहीतर ध्येयाप्रती असलेली तुमची जबाबदारी, आपली वचनबद्धता रंग उडाल्यासारखी होऊन जाते. जोपर्यंत आपण ध्येयपूर्तीचा काळ नियोजित करत नाही, तोपर्यंत सुरुवातही जोमाने होत नाही.
ध्येय ठरवणे ही एक प्रक्रिया आहे, जी तुम्हाला काय हवे, कधी हवे, कसे हवे, त्यासाठी काय काय करावे लागेल या सर्वांचा विचार करायला लावते. ध्येय, साधन, साधना आणि साध्य या सगळ्यांची प्रमाणबद्ध सांगड म्हणजेच साफल्य. शीड नसलेल्या जहाजासारखे भरकट राहण्यापेक्षा ध्येय ठरवून, प्रमाणबद्ध, शिस्तबद्ध, व्यवहारी, वास्तव आयुष्य जगणे म्हणजेच स्मार्ट बनणे.

स्मार्ट आहे, म्हणूनच विशिष्ट दिशा आहे. दिशेला पल्ला आहे. पल्ल्याला साधनं आहेत. साधनं आहेत म्हणून साध्याला गवसणी आहे. गवसणीला कालमर्यादा आहे. हे सर्व आहे म्हणूनच सर्व स्पष्ट आहे. सर्व स्पष्ट आहे म्हणूनच आयुष्य नेटके आहे. आयुष्य नेटके आहे म्हणूनच आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास आहे म्हणून वागण्या-बोलण्यात तडफ आहे. तडफ असल्यामुळे चेह-यावर तेज आहे आणि या सगळ्यामुळे तुम्ही चारचौघांत उठून दिसता म्हणूनच तुम्ही ‘स्मार्ट’ म्हणून गणले जाता.