Home »Magazine »Akshara» Belabhandar Fame Author's Autobiography On Mashelkar

‘बेलभंडार’फेम लेखकाचे लवकरच माशेलकरांवर चरित्र

दिव्य मराठी नेटवर्क | Feb 20, 2013, 02:00 AM IST

  • ‘बेलभंडार’फेम लेखकाचे लवकरच माशेलकरांवर चरित्र


पत्रकार, प्रकाशक, लेखक आणि वक्ता अशा चौफेर भूमिकेत सध्या पुणे येथे राहणारे डॉ. सागर देशपांडे वेगळ्या लेखनामुळे नेहमीच चर्चेत असतात. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या बेलभंडारा या बहुचर्चित चरित्रामुळे त्यांच्याकडूक अपेक्षा वाढल्या आहेत. त्या पूर्ण करतानाच आंतरराष्‍ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे चरित्र लेखनाचे काम सुरू असल्याची माहिती डॉ. सागर देशपांडे यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथून पत्रकारितेला सुरुवात करून सध्या पुण्यात जडणघडण हे शैक्षणिक विषयाला वाहिलेले मासिक डॉ. देशपांडे चालवतात. त्यांनी आतापर्यंत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे ‘चर्चा आणि चौकार’ हे पुस्तक प्रकाशित केले असून आंतरराष्‍ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक, मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्यावरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘प्रतिभावंतांचे आजरे’ या पुस्तकाचेही त्यांनी लेखन केले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या समवेत गेली पंधरा वर्षे असल्याने त्यांनी पुरंदरे यांचे चरित्र बेलभंडारा या पुस्तकातून मांडण्याचा निर्धार केला. त्याला बाबासाहेबांनी परवानगी दिली आणि एक अस्सल ऐवज ठरणारा असा पुरंदरे यांच्यावरील चरित्रग्रंथ प्रकाशित झाला. अल्पावधीत या ग्रंथाची दुसरी आवृत्ती संपली असून तिसया आवृत्तीचे काम सुरू आहे. यानंतर देशपांडे यांनी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या ‘रिन्व्हेंटिंग इंडिया’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन केले असून याच्याही दोन आवृत्त्या संपल्या आहेत.

गरिबी असताना केवळ जिद्दीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर आंतरराष्‍ट्रीय संशोधन संस्थांचे अध्यक्षपद भूषवणाया डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे चरित्र हा एक मोठा ठेवा आहे. या चरित्राचे लेखन सध्या डॉ. देशपांडे करत असून लवकरच हा चरित्रग्रंथ प्रकाशित होणार आहे. भारतामध्ये, महाराष्‍ट्रामध्ये अशी अनेक थोर व्यक्तिमत्त्वे आहेत की, त्यांची जीवनगाथा ही युवा पिढीसाठी प्रेरणास्त्रोत ठरणार आहे. याच भूमिकेतून आपण ही चरित्रे लिहीत असल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.

Next Article

Recommended