आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेने इस्रायलींची रुजुवात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत हा अनेक समाज, धर्म, पंथ, जाती, जमाती यांचा एकत्र विणलेला विशाल पट आहे. सर्व जाती-पंथांनी भारतात शांततेने आपले सामाजिक व सांस्कृतिक जीवन व्यतीत केले. त्याच वेळेस या सर्व समाजांनी परस्परांच्या सांस्कृतिक वारशातही भर घातली. त्यापैकी बेने इस्रायली (1951च्या जनगणनेनुसार त्यांची संख्या 20,000 होती.) हा समाज महाराष्ट्रात कोकण प्रदेशात स्थायिक झाला. कोचीन ज्यू (1940च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 3,000) हे केरळमध्ये स्थायिक झाले, तर अलीकडील काळात आलेले इराकी/ बगदादी ज्यू (1940च्या जनगणनेनुसार 8500) 19व्या शतकात प्रामुख्याने मुंबई आणि कोलकाता येथे स्थायिक झाले.

यातील बेने इस्रायलींच्या प्राचीन इतिहासाचा धांडोळा घेतल्यास इ.स. पूर्व दोन हजार वर्षांपूर्वी पॅलेस्टाइनमध्ये भरभराटीला आलेल्या इस्रायली लोकांचे वंशज म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. ‘जुना करार’ हा त्यांचा धर्मग्रंथ. त्यांचा मूळ पुरुष अब्राहम. त्याचा मुलगा ‘याकोब’ हा स्वत:ला परमेश्वराचा प्रेषक म्हणून ‘इस्रायल’ म्हणवून घेई. या याकोबाचा अकरावा पुत्र योसेफ याने इजिप्त म्हणजे पूर्वीच्या मिसर देशात त्याच्या राजाची (फारोची) मर्जी संपादन केली व अधिकारपद मिळवले. तो व त्याचे सर्व कुटुंबीय इजिप्तमध्ये स्वत:ला बेने इस्रायली म्हणवून घेऊ लागले. पुढे फिनिशियन लोकांबरोबर इस्रायली लोक तांबड्या समुद्रातून व्यापार करू लागले.

हे व्यापारी भारताच्या पश्चिम किना-यावरील पूर्वीच्या सोपारा (शुर्पारक), चेमूल (चौल), मलबार किना-यावरील ‘मुझरीन’ या बंदरात येत असल्याचा उल्लेख आढळतो. त्या किना-यावर बोलली जाणारी बोली भाषा तामिळी-द्रविडियन त्यातील मोर (तुकियाइम), तांदूळ (ओरेस), माकड (गोफील) ही नावे हिब्रू भाषेत जशी तशी वापरली जातात. राजा शालोम नंतर इस्रायलचे दोन विभाग झाले. त्यापैकी यहुदाचे राज्य म्हणजेच ज्युडाचे राज्य. त्यातील लोकांना ज्यू हे नाव मिळाले. उरलेल्या राज्याला इस्रायल म्हणून ओळखले गेले. याच राज्यात ‘एलायझा’ व ‘एलिया’ हे संत होऊन गेले (इ.स.पूर्व 900). येलियाहू हन्नाबी या नावाने हे संत ओळखले जातात.

हा सर्व इतिहास देण्याचे कारण म्हणजे, भारतात राहत असलेले बेने इस्रायली हे स्वत:ला ज्यू म्हणवत नाहीत; तर त्यांच्या मते, त्यांचे भारतात आगमन इ.स. पूर्व 730 च्या सुमारालाच झाले. बेने इस्रायली प्रथम भारतात आले ते कोकणात. रायगड जिल्ह्यातील म्हणजेच पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील नौगाव बंदरात. बेने इस्रायलींचे पूर्वज स्वसंरक्षणासाठी आपल्या देशातून बाहेर पडले व तांबड्या समुद्रातून भारताच्या पश्चिम किना-याकडे येत असताना त्यांची जहाजे वादळात सापडून खडकावर फुटली. त्यापैकी बरेच लोक बुडून मेले. त्यातील 7 पुरुष व 7 स्त्रिया अशी 14 माणसे किना-याला जिवंत लागली. नौगाव येथील कोळ्यांनी त्यांना आश्रय दिला. इतर मृत व्यक्तींना किना-याजवळ खड्डे खणून पुरले. हे सामुदायिक दफन स्त्री व पुरुषांचे वेगवेगळ्या कबरीत करण्यात आले. आजही मृताच्या दोन टेकड्या तशाच ठेवल्या आहेत. त्या ठिकाणी अलीकडे भारतीय बेने इस्रायलींनी एक स्मारक बांधले आहे.

अर्थात, भारतात कोकण किनारपट्टीला बेने इस्रायली नक्की कोणत्या वर्षी आले, याबाबत बरीच मत-मतांतरे आढळतात. काहींच्या मते, त्यांचा येण्याचा काळ इ. स. पूर्व 175चा सुमार असावा. कारण या जमातीकडे त्यांच्या स्थलांतरासंबंधी कोणताही लिखित पुरावा किंवा कोणताही निश्चित रीतिरिवाज नाही. परंतु साधारण त्यांचे भारतातील वास्तव्य चौदाशे वर्षांपासून असावे, असे मानले जाते. त्यांनी कुलाबा जिल्ह्यात मुघल, मराठे व ब्रिटिश अशा तिन्ही राजवटीत शांतपणे जीवन व्यतीत केले.

बेने इस्रायलींना आपल्यात सामावून घेताना भारतीय कोळ्यांनी त्यांना परिचित असलेला तेल गाळण्याचा व्यवसाय दिला. हे तेली कोकणात ‘शनिवारे’ किंवा ‘शनिवार तेली’ म्हणून ओळखले गेले. कारण शनिवार या दिवशी इस्रायली आपली सर्व कामे बंद ठेवतात. हा त्यांचा विश्रांतीचा दिवस (‘शब्बाथ’). कोकणात इस्रायलींशिवाय आणखी दोन जाती तेल गाळण्याचा व्यवसाय करत. त्यापैकी हिंदू तेली आपले काम सोमवारी बंद ठेवत म्हणून ते सोमवार तेली, तर मुस्लिम तेली शुक्रवारी सुटी घेत म्हणून ते शुक्रवार तेली. तेल गाळण्याच्या व्यवसायाबरोबर बेने इस्रायली सुतारकाम, शेती, गुरे पाळणे, इ. धंदे करू लागले. कोळी लोकांनी त्यांना वाचवले, पण त्यांच्याबरोबर इस्रायली लोकांचा रोटीबेटीचा व्यवहार मात्र झाला नाही.

बेने इस्रायली कोकणातील नौगावच्या आसपासच्या खेड्यांतून वस्ती करू लागले. त्यांनी भारतीयांप्रमाणेच आडनावे स्वीकारली, ती ग्रामनावांवरून. जसे दिवेकर, चौलकर, अष्टमीकर, नौगावकर, आवासकर, झिराडकर. याच गावांच्या जवळ असलेले खंडाळा हे गाव बेने इस्रायलींचे मोठे श्रद्धास्थान आहे. कारण बेने इस्रायलींच्या श्रद्धेनुसार एलियाद हन्नाबी आपल्या दिव्य रथातून या भागातील वास्तव्य असलेल्या इस्रायली लोकांना बघण्यासाठी आले व पुन्हा घाईने उड्डाण करताना त्यांच्या घोड्याचा पाय कातळावरून सरकला. ती खूण आजही या कातळावर आहे. सुरुवातीच्या काळात या ठिकाणी जत्रा भरत असे. त्याला ‘एलियाद हन्नाबी’चा ‘उरूस’ असे म्हटले जाई. तिथे स्मारक बांधण्याची इच्छाही त्या वेळेस इस्रायली लोकांची होती. परंतु ज्यू धर्मानुसार जत्रा भरवणे व स्मारक उभारणे याला मान्यता नसल्याने ती कल्पना मागे पडली.
कोकणात राहणा-या बेने इस्रायली लोकांची धार्मिक सामग्री वादळात सापडल्याने त्यांच्या सोबत आली नाही. त्यामुळे यहुदी धर्मातील सर्व प्रार्थना व विधी यांचे पालन ते करत नसत. पण तरीही धर्माच्या मुख्य तत्त्वांचे ते पालन करत. उदा. त्यांची मुख्य प्रार्थना (Here Olisrael! Our Lord, The God is one). मुलाच्या जन्मानंतर आठव्या दिवशी त्याची सुंता करण्याची प्रथा, अन्न ग्रहणाचे नियम (वर्ज्य व अवर्ज्य) ‘कुश्रुत’ कटाक्षाने पाळणे आदी. 1650च्या सुमारास डेविड रब्बाय यांचे कोकणात आगमन झाल्यानंतर कोकणातील बेने इस्रायली लोकांत धर्मजागृती झाली. त्यांना धर्माचे शिक्षण देण्यासाठी जगाच्या विविध भागातून इस्रायली धर्मपंडित ‘राब्बी’ भारतात आले.

कोकणातील विविध खेड्यांतील इस्रायली मुलांना धर्मग्रंथांचे वाचन व प्रार्थना करता येईल इतके हिब्रू भाषेचे ज्ञान देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर कोकणातील बेने इस्रायली रहिवाशांतील काही महत्त्व असलेल्या घराण्यातील व्यक्तींना त्यांनी धर्मातील महत्त्वाच्या प्रथा व प्रार्थना शिकवल्या. त्यातील झिराडकर, शापूरकर व राजापूरकर अशा कुटुंबांतील व्यक्तींपैकी काहींना सुरुवातीला ‘काजी’ नेमले गेले व त्यांच्याकडून यापुढे सर्व समारंभाचे पौरोहित्य केले जाऊ लागले.
साधारण इ. स. 15/16व्या शतकापासून पुढे बेने इस्रायलींच्या धार्मिक रीतीरिवाजांना यहुदी धर्मातील प्रथा, परंपरांची जोड मिळाली व इतर इस्रायली ज्यूंप्रमाणे त्यांच्या धार्मिक व सामाजिक रीतिरिवाजांना ख-या अर्थाने प्रारंभ झाला.

bsj286@yahoo.co.in