आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका कुटुंबात एकालाच असावा अारक्षणाचा लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अारक्षण असलेल्या समाजातील गाेरगरीब अाजही अाहे तिथेच अाहेत अाणि अारक्षण मिळालेल्याच प्रत्येक कुटुंबातील इतरजण पुन्हा-पुन्हा ते अाेरबाडून घेत अाहेत. एकाच कुटुंबामध्ये लाभ मिळत असल्याने त्याच-त्याच कुटुंबातील सदस्य गब्बर हाेऊन चालले अाहेत. अारक्षणातून सक्षम झालेली कुटुंबे वगळली की अार्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सवर्ण समाजातील घटकालादेखील अारक्षणाचा लाभ मिळणे शक्य हाेणार अाहे. अशी परखड मते ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शेषराव माेरे यांनी ‘दिव्य मराठी’च्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये व्यक्त केली. ‘अारक्षण हवे, पण कसे’ या विषयावर त्यांनी मांडलेला हा विस्तृत विचार.

मराठा अारक्षण हा खरे तर व्याख्यानाचा विषय अाहे. जातीसंस्थेमुळे समाजातील विषमता जाऊन समतेसाठी घटनेत ही अारक्षणाची तरतूद अाहे. या उद्देशाने हे केलेले अाहे. एससी, एसटीसारखे समाज मागे पडल्याने त्यांना शिकतादेखील येत नाही, असे मानले जात असल्यानेच ती करण्यात अाली हाेती. मंडल अायाेगाने बॅकवर्ड म्हणून ४ हजारांहून अधिक जातींची नाेंद केली. त्यानंतर २०-२५ वर्षांनी महाराष्ट्रातील क्षत्रिय असलेल्या मराठा म्हणवल्या जाणाऱ्या समाजाने अारक्षणांची मागणी केेली. मात्र, मराठा ही एक जात नसून अनेक जातींचा समूह अाहे. अामच्या नांदेडच्या मराठ्यांच्या मुला-मुलींचे लग्न साताऱ्याकडच्या मराठा समाजाशी केले जात नाही. त्यामुळे या समाजात अनेक गटतट असून हा प्रश्न अायाेगाने सुटणार नाही.

अारक्षण हे छाेट्या जातींंच्या संरक्षणासाठी अाहे. मात्र, मराठा समाजातच गरीब, श्रीमंत, वतनदार असे वेगवेगळे गट अाहेत. घटनेने एससी, एसटींना अारक्षण दिल्यावर या मराठा समाजाला काहीच वाटले नाही. अनेक वर्षे त्यांच्यावर अन्याय झाला अाहे, असे समजून त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले. दलित समाजाला अारक्षण मिळाल्यानंतर त्यातील तरुण मुले पुढे जाऊ लागली. ते मराठा समाजातील युवकांनी मान्य केले. मागासांना नाेकऱ्या देणे हा अपवाद अाहे. तसेच गुणवत्तेनुसार नाेकऱ्या देणे हा नियम अाहे. नियमापेक्षा अपवाद माेठा कसा हाेऊ शकताे. म्हणजे अारक्षण मर्यादा ५० टक्क्यांच्यावरदेखील देता येत नाही अाणि एकप्रकारे ते न्यायाच्या तत्त्वाला धरूनदेखील अाहे. त्यांना जेव्हा दिसू लागले की अाेबीसी समाजातील अार्थिकदृष्ट्या सक्षम मुलांंनादेखील अारक्षण मिळून ते अापल्या पुढे जाऊ लागले, तेव्हा असंताेषाला धुमारे फुटू लागले. अाेबीसींना दिले जात अाहे, मग अाम्हाला का नकाे ? मराठा समाजातील मागे पडलेला स्तर संतप्त झाला. जेव्हा १५-२० लाखांचे माेर्चे उतरू लागले, तेव्हा त्यांना तुम्हाला अारक्षण मिळू शकत नाही, हे सांगणे राज्यकर्त्यांना शक्य नाही.

मी माझ्या मुलाच्या टीसीवरदेखील केवळ हिंदू असा उल्लेख केला. अाता मराठा समाजाला काही मिळणार म्हटल्यावर माझी मुले मला विचारू लागली टीसीवर जात का टाकली नाही? म्हणजे माझी पिढी जात मानत नाही अाणि अाता पुढची पिढी जातीची अाेळख मागते अाहे. हे चक्र कसे ताेडणार अाहात तुम्ही? जाती केवळ बेटीबंदीपुरत्याच उरल्या अाहेत. राजकारणासाठी तर जात अत्यंत महत्त्वाची झालेली अाहे. त्या जातीच्या प्रमुखाला अापल्याकडे घेतला की ती जात अापल्याकडे येते. राजकारणात ताकद वाढवण्यासाठी जातीला बराेबर घेतले जाते. जातिभेद, मनुस्मृती हे सर्व काढायची अाता काहीच गरज नाही. तसेच अार्थिक अारक्षण इमप्रॅक्टिकेबल अाहे. हे अारक्षण द्यायचे असल्यास ते कुणी द्यायचे? तलाठ्याने का? ताे तर कुणालाही काहीही देऊ शकताे. बर, एखाद्या बापाला नाेकरी नाही, म्हणून अारक्षणात स्थान दिले अाणि प्रत्यक्षात त्याला नाेकरी लागली व नंतर मुलालाही लागली तर मुलाची नाेकरी काढून घ्यायची का? म्हणजेच हा मुद्दा गैरलागू ठरताे. सगळ्यांचेच अारक्षण रद्द करा असे म्हणता येऊ शकते. तात्त्विकदृष्ट्या ते याेग्य अाहे, पण काेण करणार अाहे ते? जमणार अाहे का कुणाला? त्याएेवजी शाळेत शिक्षण उत्तम देणे अावश्यक अाहे. काेणत्याही मुलाला शिक्षण उत्तम दिले की अारक्षणाची गरजच नाही.

अापल्याकडे शिक्षणच उत्तम दिले जात नाही, त्यामुळे हे पुढचे प्रश्न वाढत अाहेत. एससी, एसटीमध्ये अारक्षण दिल्याचा लाभ नक्की कितीजणांना झाला? की केवळ काही कुटुंबांपुरताच त्याचा लाभ मर्यादित राहिला अाह? गरिबांसाठी अारक्षण मागायचे अाणि विशिष्ट कुटुंबांच्या पुरतेच ते मर्यादित राहते. केवळ विशिष्ट समाजातील काही कुटुंबेच त्याचा लाभ घेतात. अाेबीसी म्हणतात अामच्यात देऊ नका. मग त्यावर उपाय काय? तर उपाय अाहे. अाेबीसीसह सर्व समाजातील जाे घटक अार्थिकदृष्ट्या सक्षम झाला अाहे, त्याला त्या अारक्षणातून वगळावे. काेणतीही राजकीय सत्ता असलेली कुटुंबे, अार्थिक क्षेत्रात पदाधिकारी असलेली कुटुंबे, अायकराच्या कक्षेत येणाऱ्या कुटुंबांना अारक्षणातून वगळावे. तसेच कुटुंबातील एकाला नाेकरीतील अारक्षणाचा लाभ मिळाल्यावर त्या कुटुंबातील अन्य कुणालाही ताे लाभ मिळता कामा नये. तसे झाले तरच अारक्षणाचा लाभ खऱ्या अर्थाने त्या-त्या समाजातील गरीब घटकांकडे जाणार अाहे. शेतकरी माेर्चात अाला नाही, ताे शेतातच हाेता. शिक्षक, डाॅक्टर, वकिलांची मुले या माेर्चात सहभागी झाली हाेती. प्रत्येक ठिकाणी पुढे गेलेल्या कुटुंबांकडूनच अारक्षणाचे फायदे उकळले जात अाहेत, हे वास्तव अाहे. सवर्णांनी त्यांच्या भावांसाठी हक्क साेडला की नाही? मग अाेबीसी का साेडत नाहीत? अशी मागणी का केली जात नाही? ज्यांना अारक्षण मिळाले, त्यांनी त्यांच्यापेक्षा गरिबांना ते मिळू द्यावे. त्यांनी पुन्हा त्यांच्यापेक्षा गरिबांपर्यंत ते पाेहाेचू द्यावे. असा अारक्षणाचा लाभ झिरपत जाणे अावश्यक अाहे.

शब्दांकन : धनंजय रिसाेडकर.
बातम्या आणखी आहेत...