आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

468, बेव्हर्ली हिल्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'स्वप्न आणि सत्य यात कितीसे अंतर असते? तुमचा परिसर, तुमच्यावरचे देशीवादी संस्कार आणि या देशीवादी मध्यमवर्गीय संस्कारांमुळे खोलवर रुजलेली सावधवृत्ती हे सगळे घटक स्वप्न प्रत्यक्षात उतरताना कितीसा अडसर ठरतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे अभ्युदयनगर-काळाचौकी, लालबाग, मुंबई-33 आणि 468, नॉर्थ कॅमडेन ड्राइव्ह, सूट नंबर 244, बेव्हर्ली हिल्स, कॅलिफोर्निया-90210 या दोन पत्त्यांमध्ये दडलेली आहेत. हे दोन्ही पत्ते अभिमानाने मिरवणार्‍या फॅशन डिझायनर शेखर रहाटे याची हॉलीवूडमध्ये फुलत गेलेली ही यशोगाथा. नुकतेच अमेरिका दौर्‍यावरून आलेले सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त प्रवीण नाईक यांनी खास ‘दिव्य मराठी’पर्यंत पोहोचवलेली...'


नव्वदच्या दशकाची ती सुरुवात होती. जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या वाटेने आलेल्या संधींमुळे नवतरुण वर्गाच्या इच्छा-आकांक्षांना पंख फुटू लागले होते. त्याच काळात तोसुद्धा मुंबईतील फॅशन शोजना नियमित जाऊ लागला. प्रोफेशनल फॅशन फोटोग्राफर म्हणून. त्याच्या कामाचा भागच होता तो. अशाच एका फॅशन शोला तो गेला होता. फोटो काढून झाले होते... उगाचच वेळ घालवण्यासाठी तिथे घुटमुळत होता. इतक्यात, त्या फॅशन शोच्या आयोजकाची त्याच्यावर नजर गेली. तेव्हा तो जरासा बावरून म्हणाला, मी फोटोग्राफर आहे...फोटो काढण्यासाठी आलो होतो. त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाकडे पाहून आयोजकाने विचारले, मॉडेल का होत नाहीस? तू चांगला मॉडेल होशील. प्रयत्न कर... आणि तोवर फोटो काढून झाल्यावर बाजूला होणारा शेखर रहाटे नावाचा तरुण आत्मविश्वासाने मॉडेलच्या रूपात थेट रॅम्पवर चालू लागला...

मुंबईतील काळाचौकी. शंभर टक्के कामगार वस्ती. याच परिसरातील अभ्युदयनगर ही हाउसिंग बोर्डाची वसाहत. विक्रीकर खात्यातील वसंत रहाटे यांच्या चार अपत्यांपैकी एक असलेला मी याच वसाहतीमध्ये लहानाचा मोठा झालो. ‘क्रिस्टल बॉल’ या जागतिक पातळीवरील फॅशन जगतातील अत्यंत मानाच्या गणल्या गेलेल्या पुरस्कारासाठी नुकतीच निवड झालेला शेखर रहाटे ग्लॅमरस हॉलीवूडच्या तारे-तारकांचे वास्तव्य असलेल्या ‘बेव्हरली हिल्स’मधील आपल्या अद्ययावत ऑफिसमधून बोलत होता...

मी अगदी अपघाताने फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात आलो. खरे तर आमचे कौटुंबिक वातावरण मध्यमवर्गीय. फोटोग्राफी इज माय पॅशन. फर्स्ट लव्ह... बारावीनंतर मी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फोटोग्राफीसाठी प्रवेश घेतला. छान फोटोग्राफी शिकलो. पदवीधर झालो आणि मित्रांबरोबर काम करू लागलो. ऑन असाइनमेट बेसिस. फॅशन शो हेच माझे कार्यक्षेत्र होते... आमच्या लालबाग-काळाचौकीतल्या मुलांमध्ये पहिल्यापासून व्यायामशाळेत जाण्याची आवड होती. तशीच ती मलादेखील होती. मी नियमित व्यायाम करायचो. चारचौघांत वेगळा उठून दिसेन, अशी माझी शरीरयष्टी होतीच. त्यात माझा व्यवसाय फॅशन फोटोग्राफरचा. त्याचा फायदा झाला आणि अचानक एके दिवशी रॅम्पवर चालण्याची संधी मिळाली. आय वॉज फॉर्च्युनेट... शेखर सांगत होता.
माझ्या हातातला कॅमेरा गेला आणि आता मी फॅशन शोमध्ये रॅम्पवर चालू लागलो. त्या वेळेस म्हणजे साधारण 95-96च्या दरम्यान आघाडीचा मॉडेल आर्यन वेद हासुद्धा माझ्याबरोबर रॅम्पवॉक घेत होता. इथेच माझी एका फॅशन आयोजकाशी ओळख झाली आणि त्यानेच मला पहिल्यांदा स्वतंत्रपणे फॅशन शो आयोजनाची संधी दिली. एका संधीतून दुसरी संधी, अशा एकापाठोपाठ संधी मिळत गेल्या. समयसूचकता दाखवत मिळत गेलेल्या संधीचे सोने करत गेलो. आता मी मॉडेल न राहता स्वतंत्रपणे फॅशन शो आयोजक झालो होतो. भारतात होणार्‍या फॅशन शोसाठी मॉडेल्सची निवड करण्यापासून ते जागा ठरवण्यापर्यंतच्या सर्व पातळ्यांवर मी लक्ष घालत असे. इथेच एक नवीन संधी चालून आली ती म्हणजे दुबईमध्ये फॅशन शो आयोजनाची. आय ग्रॅब दॅट अपॉर्च्युनिटी! आणि 1999मध्ये मी दुबईला पोहोचलो... दुबई ही माझी पहिलीच परदेशवारी. दुबईमध्ये मला खूप मोठी संधी मिळाली. मुंबईपासून हवाई अंतराने अगदी जवळ असलेल्या या आंतरराष्ट्रीय शहरामुळे जगप्रसिद्ध मॉडेल्स, फॅशन डिझायनर्स आणि आयोजकांशी माझ्या गाठीभेटी होत गेल्या.

पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे संधीचे क्षितिज किती मोठे आहे, याची प्रकर्षाने जाणीवही झाली. पुढे नावारूपास आल्यानंतर युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्ली हॉलमध्ये सुमारे 192 देशांच्या प्रतिनिधींसमोर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली कला सादर करण्याची संधी मिळालेला शेखर आपले दुबईतील अनुभव सांगत होता.
दुबईमध्ये तुलनेने माझ्याकडे वेळदेखील भरपूर होता. एव्हाना मला हेही भान आले होते की, आपल्या क्षेत्रात प्रगती साधायची असेल तर केवळ मिळालेले नाव आणि गाठी जमा झालेला अनुभव एवढेसेच पुरेसे नाही. तर स्वत:मध्ये गुणात्मक पातळीवर अधिकाधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी, व्यवसायातील नवनवे प्रवाह समजून घेण्यासाठी, सातत्यपूर्ण प्रशिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच फावल्या वेळात ‘दुबई बीम्स इंटरनॅशनल फॅशन स्कूल’ या जगप्रसिद्ध संस्थेमध्ये रीतसर ‘फॅशन डिझायनिंग’चे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय मी घेतला. आणि एक दिवशी नवीन संधी चालून आली. एका संस्थेला फॅशन शो करायचा होता... बट दे हॅव लेस टाइम टु ऑर्गनाइझ... आय टुक अ चॅलेंज... आणि अधिक वेळ न दवडता मी मॉडेल्सची निवड करण्यापासून सेट डिझायनिंग ते ड्रेस डिझायनिंगपर्यंत सगळ्यांचे काटेकोर आयोजन केले. तो शो तेथील फॅशन जगतात खूपच गाजला. माझे कॉस्च्युमसुद्धा गाजले आणि मी ऑर्गनायझरचा फॅशन डिझायनर झालो... ‘वर्स्याक अवॉर्ड फॉर ग्लोबल एक्सलन्स इन फॅशन’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित शेखर रहाटेने आता आपले कार्यक्षेत्र दुबईतून फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये विस्तारले होते. मात्र अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को हेच बहुधा त्याच्या कलागुणांना दाद देणारे स्वप्नवत शहर होते...

दुबईतून थेट अमेरिकेची वाट धरलेल्या शेखरने प्रारंभी सुमारे चार वर्षे अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमधून भरणार्‍या फॅशन शोमध्ये स्वत:ला आजमावून पाहिले. पुढे न्यूयॉर्क फॅशन वीक, ऑस्कर्स, कान फिल्म फेस्टिवल, एमी अवॉर्ड अशा प्रतिष्ठेच्या समारंभात शेखरला मानाचे स्थान मिळू लागले. पाठोपाठ आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणार्‍या अनिवासी भारतीय नागरिकास देण्यात येणार्‍या ‘महात्मा गांधी प्रवासी’ पुरस्काराने शेखर रहाटेला सन्मानित करण्यात आले. 2012मध्ये हॉलीवूडमध्ये ‘इंटरनॅशनल फॅशन सुपर मॉडेल’ या स्पर्धेमध्ये त्याने अव्वल क्रमांक मिळवला. गेल्याच वर्षी बराक ओबामांच्या अध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्याने खास तयार केलेले पेहराव अनेक मान्यवरांनी परिधान करून त्याच्या कर्तृत्वाला दाद दिली होती. एकूणच मूळचा कोकणातील गुहागर येथील असलेल्या शेखर रहाटे या नावाला आज हॉलीवूडच्या दुनियेत ग्लॅमर आलेले आहे. त्याचे ब्रँडनेम असलेले पेहराव मारिआ अमोर, प्रसिद्ध अभिनेत्री वनेसा विल्यम, मिशेल रोमानो, तसेच मिस एशिया पॅसिफिक, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स आदींनी परिधान केले आहेत.

मधल्या काळात जगभर आर्थिक मंदी आल्यानंतर अमेरिकेतील मोठमोठे उद्योग आपला गाशा गुंडाळत होते. त्याचा फटका अर्थातच मनोरंजन दुनियेला, त्यातही फॅशनच्या दुनियेलाही बसत होता. मात्र तोवर प्रत्येक अडचणीतून संधी शोधणार्‍या या गुणवंताने 2009मध्ये धोका पत्करून सॅन फ्रान्सिस्को येथून हॉलीवूड येथे स्वत:चे बस्तान बसवले. इतकेच नव्हे, थोड्याच कालावधीत हॉलीवूडमध्ये स्वत:चा फॅशन स्टुडिओ थाटला. गेल्या चार वर्षांत हॉलीवूडमधील या स्टुडिओमध्ये जगभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट दिली आहे. सतत काहीतरी नवीन संधी शोधत राहत, त्यातून नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करणार्‍या शेखरला अमेरिकेतील हिल कॉलेजतर्फे चित्रपट, दूरदर्शन या माध्यमांशी संलग्न केलेल्या कार्यासाठी समाजशास्त्रातील डॉक्टरेट देऊन सन्मानित केले आहे. नुकतीच त्याची कंपनी अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ मिशेल ओबामा यांच्या संपर्कात आली आहे. कदाचित येत्या काही दिवसांत त्यांना भेटण्याचा योग येऊ शकतो, अशी आशाही त्याला आहे...

वीस वर्षांपूर्वी अभ्युदयनगर-काळाचौकी, लालबाग, मुंबई-33 येथून सुरू झालेला हा त्याचा थक्क करून टाकणारा प्रवास 468, नॉर्थ कॅमडेन ड्राइव्ह, सूट नंबर 244, बेव्हर्ली हिल्स, कॅलिफोर्निया-90210 या पत्त्यापर्यंत त्याला घेऊन गेला आहे. अर्थात, ध्येय गाठण्यासाठी लागणारी जिद्द, कठोर मेहनतीची तयारी आणि स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी अंगी असलेले धाडस या बळावर हॉलीवूडमध्ये आपल्या नावाची पताका फडकवत ठेवणार्‍या शेखरने आजवर अनेक मानमरातब मिळूनही नावीन्याची कास सोडलेली नाही. त्या अर्थाने अजूनही मोठे ध्येय गाठण्याची आस संपलेली नाही आणि हेच सर्वार्थाने प्रेरणादायी आहे...
vikas.naik@gmail.com