आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचू 'गुगलवर' आनंदे !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेटमुळे वाचन संस्कृती कमी झाली अशी ओरड होत असताना, इंटरनेटवर मात्र अनेक भाषांमध्ये वाचनीय असे साहित्य उपलब्ध आहे. गुगलने त्याच्या पुढचे पाऊल टाकत जगभरातील अनेक पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली आहेत. 2004 मध्ये फ्रँकफर्ट येथे भरलेल्या जागतिक पुस्तक मेळ्यात केलेल्या घोषणेनुसार गुगल प्रिंट नावाने ही सेवा सुरूझाली. आज तुम्ही www.books.google.com वर गेलात तर विविध विषयांवरची हजारोंनी पुस्तकं उपलब्ध आहेत.

जेव्हा तुम्ही एखादे पुस्तक search करता तेव्हा त्याच्या लिंक्स (result) तुम्हाला गुगलच्या तसेच गुगल बुक्सच्या सर्चमध्येही दिसतात. पुस्तकाची काही पानेही एका बाजूला पाहायला मिळतात. जर पुस्तकावर कॉपीराइट असेल तर तुम्हाला काहीच पाने दिसतात, परंतु कॉपीराइट नसेल तर तुम्हाला संपूर्ण पुस्तकच डाऊनलोडसाठी उपलब्ध असते. गुगलने जगभरातल्या वाचनालयातील पुस्तके स्कॅन करून इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचा ध्यास घेतला आहे. हे करण्यासाठी स्कॅनिंगचे तंत्र अशा पद्धतीने वापरले गेले की सॉफ्टवेअरद्वारा पानांवरील अंक आणि अक्षरे दोन्हीही डिजिटाइज करता येतील. स्कॅन केल्यानंतर हे अंक आणि अक्षर संपादित करून सर्च करता (शोधता) येतात. अत्याधुनिक पद्धतीने केले जाणारे हे स्कॅनिंग एका तासात एक हजार पाने स्कॅन करते.

गुगलने न्यू यॉर्क पब्लिक लायब्ररी, हार्वर्ड, मिशिगन आणि सॅन्फर्ड विद्यापीठांच्या वाचनालयातील लाखो पुस्तके स्कॅन करून झाली आहे. याचा एक महत्त्वाचा फायदा असा की आज जगातल्या कोणत्याही कोपर्‍यातून वाचक आपल्याला हव्या त्या विषयाचे आणि आवडीचे पुस्तक सहज वाचू शकतो. ज्यांना आर्थिकदृष्ट्या पुस्तके विकत घेणे शक्य नाही, अथवा एखाद्या ठिकाणी जाऊन तेथील साहित्याचा आस्वाद घेणे शक्य नाही, अशांसाठी गुगलबुक्स तर वरदानच आहे. त्याहीपुढचे पाऊल उचलत, गुगलने दृष्टिदोष असणार्‍या लोकांसाठी फाँट मोठा करणे, तसेच अंध व्यक्तींसाठी ब्रेलचे यंत्र वापरण्याची तसेच पुस्तक ऐकण्याचीही (ऑडिओ बुक्स) सोय उपलब्ध करून दिलेली आहे.

सुरुवातीला पुस्तके स्कॅन करताना केवळ कॉपीराइटमुक्त पुस्तकेच स्कॅन करायची असे गुगलने ठरवले. अमेरिकेत लेखकाच्या मृत्यूनंतर 70 वर्षांनी पुस्तके कॉपीराइटमुक्त होतात. गुगलने ही सर्व पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करण्याचे ठरविले आहे. हे स्कॅनिंग चालू असतानाच गुगलने कॉपीराइट पुस्तकांची काही पानेही वाचायला ठेवली. यावर काही संस्थांनी आणि लेखकांनी आक्षेप घेऊन गुगलविरुद्ध फिर्याद नोंदवली. परंतु आता त्यावरही तोडगा निघून या पुस्तकांची काही पाने उपलब्ध आहेत.

bhagyashree@cyberedge.co.in