आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल लून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा गांधींचे म्हणणे होते की प्रगती करायची असेल तर गावांकडे चला. गुगलने त्याच दिशेने पाऊल टाकत इंटरनेट खेडोपाडी पोहोचवायचे ठरवले आणि सुरू केले प्रोजेक्ट लून किंवा गुगल बलून! गुगल लूनचे ध्येयच मुळी खेड्यात आणि दुर्गम भागात इंटरनेट पोहोचवणे हे आहे. पृथ्वीपासून सुमारे 20 ते 50 किमी उंचीवर असणारा हवेचा थर म्हणजेच स्थितांबरावर (stratosphere) मोठा फुगा सोडला जातो ज्याद्वारे वायरलेस नेटवर्क तयार होते आणि 3G इतका इंटरनेटचा वेग मिळतो.
वार्‍याची दिशा आणि वेग पाहून हा महाकाय फुगा हवेत योग्य त्या उंचीवर सोडला जातो. वार्‍याविषयीची ही माहिती National Oceanic and Atmospheric Administration (NOAA) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून रोजच्या रोज घेतली जाते. फुगा हवेत असताना युजर त्यांच्याकडे असलेल्या खास इंटरनेट अँटेनाद्वारा या फुग्याशी संपर्क साधून इंटरनेट वापरू शकतात. हे इंटरनेट अँटेना त्यांच्या घरांवर लावता येतात. इंटरनेट सिग्नल बलून नेटवर्कद्वारा एका फुग्याकडून दुसरीकडे जातो आणि मग जमिनीवर असलेल्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाडरकडे जातो आणि मग ग्लोबल इंटरनेटकडे. प्रोजेक्टचा मुख्य उद्देश जगभरातील संपर्क अधिक प्रभावशाली करणे, नैसर्गिक आपत्तीत उपयोग करणे.

फुग्याच्या फुगवलेल्या भागाला बलून एनव्हलप म्हटले जाते. हा बलून अत्यंत मजबूत असून स्थितांबरामध्ये 100 दिवसांपर्यंत सहज फिरत राहू शकतो. हे फुगे पॉलिथिलिन प्लॅस्टिक शीट्सपासून बनवलेले असतात. जेव्हा पूर्ण फुगवले जातात तेव्हा ते 15 मीटर आडवे आणि 12 मीटर उंच पसरतात. जेव्हा बलूनचे कार्य थांबवायचे असते तेव्हा त्या एनव्हलपमधून गॅस बाहेर पडतो आणि हळूहळू फुगा पृथ्वीवर उतरत जातो. समजा काही तांत्रिक बिघाडामुळे फुगा लगेच खाली यायला लागला तर त्याच्या डोक्यावरचे पॅराशूट उघडते आणि फुगा अलगद खाली येतो.

प्रोजेक्ट लूनची पायलट टेस्ट जून 2013मध्ये न्यूझीलँडच्या दक्षिण बेटावर घेतली गेली. या वेळी छोट्या समूहाला इंटरनेट वापराची चाचणी करता आली. आता ती मोठ्या समूहापर्यंत वाढत जाऊन 2014मध्ये तर आणखीन मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही पायलट टेस्टमध्ये सामील होऊ शकता त्यासाठी त्यांच्या या वेबसाइटवर संपर्क साधता येतो -http://www.google.co.in/loon/where/
मध्यंतरी बिल गेट्सने या प्रोजेक्टच्या उपयुक्ततेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांचे म्हणणे असे की आफ्रिका आणि आशियातील गरीब देशांमध्ये जेथे आरोग्य आणि शिक्षण या प्राथमिक गरजा आहेत तेथे या प्रोजेक्टचा खरोखरी काय उपयोग? असो. हा वादाचा मुद्दा असला तरी तांत्रिक प्रगती ही आजच्या काळाची गरज आहे. गुगलचा प्रयत्न नक्कीच क्रांतिकारक आहे आणि इंटरनेटचे तंत्रज्ञान सर्वत्र पोहोचावे म्हणून ते म्हणतात, छङ्मङ्मल्ल Loon for all.

bhagyashree@cyberedge.co.in