आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन सुरक्षितता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेट हे दुधारी शस्त्र आहे. हा माहितीचा अल्लादिनचा राक्षस असल्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातही सहजपणे प्रवेश करू शकतो. त्यामुळे इंटरनेटचा वापर करताना तुम्हाला सातत्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खालील टिप्स तुम्हाला अवश्य उपयोगी येतील -
* पोस्ट करण्याआधी विचार करा - फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर काही पोस्ट करण्याआधी विचार मनात आणा की ही पोस्ट स्वत:बद्दलची असो अथवा मित्रांवर असलेली कॉमेंट. प्रत्येक गोष्ट वाचली जाणार आहे. वाचणा-यांमध्ये आदरणीय व्यक्ती, नातेवाईक, मोठे-लहान मित्र असे अनेक स्तरातले लोक असतात. त्या सर्वांनाच ही कॉमेंट शेअर करणे योग्य असेलच असे नाही.
* टोपणनाव नाव धारण करताय?- तुम्ही ट्विटरसारखी साइट वापरत असाल तर ख-या नावाऐवजी टोपणनावाच्या आधारे ट्विट करू शकता. सोशल नेटवर्किंग साइट वापरण्यासाठी तुमचे वेगळे ई-मेलचे अकाउंट उघडा. वैयक्तिक आणि व्यावसायिक ई-मेल अकाउंटपासून वेगळे ठेवा. अशाच लोकांना तुमच्या फ्रेंड्स लिस्टमध्ये घ्या, जे तुम्हाला माहीत आहेत.
* सेटिंग्ज तपासा - प्रत्येक सोशल नेटवर्किंग साइटचे स्वत:चे गुप्त आणि सुरक्षिततेचे (privacy and security) सेटिंग्ज असतात. ते समजून घेऊन त्याचा वापर करा. आपल्या मित्रांनाही त्याबाबत जागरूक करा. कारण त्याच्या खात्यावर हल्ला झाल्यास त्याचा परिणाम तुमच्यावरही होतो. तुमची वैयक्तिक माहिती मित्रांच्या खात्याद्वारे हॅक करता येते.
* वैयक्तिक माहितीविषयी सावध राहा - तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती जशी की फोन, ई-मेल, घरचा पत्ता, वाढदिवस टाकायचा असल्यास तो लोकांना दिसणार नाही असा टाका.
* छायाचित्र आणि चलचित्र - नेटवर्किंग साइटवर छायाचित्र आणि चलचित्र टाकताना खबरदारी घ्यायला हवी. घर, व्यवसाय, शाळा किंवा तुम्ही संलग्न असलेले इतर ठिकाणांचे फोटो अपलोड करणे टाळा अथवा सावधगिरीने टाका. तुम्ही टाकलेले फोटो लोकांना बघता येतातच, पण डाऊनलोडही करता येतात.
* नक्की काय हवे तपासून बघा - साइटवर फॉर्म भरताना माहिती कशाची हवी आहे हे तपासून बघा. शक्यतो कमीत कमी आणि आवश्यक तितकीच माहिती भरून द्या.
* थेट संदेश पाठवा - एखाद्याशी तुम्हाला बोलायचे असेल, संपर्क साधायचा असेल तर पोस्ट करायची गरज नाही. तुम्ही त्यांना वैयक्तिक संदेश थेट पाठवा किंवा ई-मेल पाठवा.
* जुने खाते बंद करा - तुम्ही सोशल नेटवर्किंग साइट वापरणार नसाल तर ताबडतोब तुमचे खाते बंद करा.
* अँटिव्हायरस वापरा - तुमच्या संगणकावर अद्ययावत अँटिव्हायरस सॉफ्टवेअर असेल याची खात्री करून घ्या. तसेच डाऊनलोड करताना किंवा इन्स्टॉल करतानाही सावधगिरी बाळगा.
या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने करता येवो ही नवीन वर्षासाठी शुभेच्छा.