आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन ट्रेडिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑनलाइन ट्रेडिंग म्हणजे इंटरनेटचा वापर करून विविध शेअर्सची खरेदी-विक्री करणे. अनेकांच्या मनात शेअर्सविषयी समज-गैरसमज असतात; परंतु ज्या लोकांना गुंतवणुकीसाठी हा पर्याय योग्य वाटतो त्यांच्यासाठी ऑनलाइन ट्रेडिंग हा अत्यंत सोयीचा पर्याय आहे. तुम्हाला ऑनलाइन ट्रेडिंग करायचे असल्यास सर्वात आधी खालील तीन गोष्टी आवश्यक आहेत -
१) ऑनलाइन ट्रेडिंग करण्यासाठी ट्रेडिंग वेबसाइटवर आपले खाते उघडणे.
२) ऑनलाइन बँक खाते ज्याद्वारे पैशांची देवाणघेवाण ऑनलाइन होऊ शकते.
३) ऑनलाइन डीमॅट खाते जेथे शेअर्स साठवले जातात.
ऑनलाइनची सोय आणि वाढत्या लोकप्रियतेमुळे वरील सर्व सुविधा देणा-या अनेक कंपन्या आज बाजारात आहेत. ग्राहकांना अत्यंत सोयीने सर्व व्यवहार पार पाडता यावेत याकडे त्यांचा कटाक्ष असतो. 5-Paisa.com , Sharekhan, ICICI direct.com, Motilal Oswal, HDFCsec.com, Kotaksecurities, moneycontrol अशा अनेक कंपन्या ग्राहकांना दर्जेदार आणि विश्वासपूर्ण सेवा देतात. ट्रेडिंगला सुरुवात करण्यासाठी सर्वात प्रथम वरील तिन्ही खाती उघडायला हवीत. तुमची ही तिन्ही खाती एकमेकांना जोडावी लागतात. तुम्हाला तुमचा असा स्वतंत्र लॉगइन आणि पासवर्ड दिला जातो. मार्केटचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही शेअर्स खरेदी करण्याचे ठरवता तेव्हा त्याचा आकडा आणि त्यासाठी लागणारी रक्कम बँकेतून वेबसाइटवर जमा करायची. रक्कम जमा झाल्यावर तुमच्या नावावर तितके शेअर्स तुमच्या डीमॅट खात्यात जमा होता. अशाच पद्धतीने हे शेअर्स विकायचे असल्यास वेबसाइटवर विकायचे व त्याचे पैसे तुमच्या खात्यात ताबडतोब जमा होतात.

फक्त खरेदी-विक्रीच नाही, तर या वेबसाइट ग्राहकांना तुमच्याकडे असलेले शेअर्स, त्याची आजची बाजार किंमत, तुम्ही फायद्यात का तोट्यात आहात हे सर्व सांगतात. त्याचबरोबर ग्राहकांना ताजे मार्केट अपडेट्स, अनेक टिप्स व सल्ले देत असतात. या वेबसाइट्सवर डिस्कशन ग्रुप्स असतात ज्यावर शेअर्सविषयी अनेक चर्चा चालू असतात. त्या वाचूनही आपल्याला अनेक अपडेट्स मिळत असतात. त्यांना सल्लेही विचारता येतात. त्यामुळे वेबसाइटवरून व्यवहार करताना विश्वास वाटतो. मात्र हे सर्व व्यवहार करतांना तुमचे ज्ञान, विषयातला अभ्यास महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर हे सर्व व्यवहार ऑनलाइन असल्याने त्याविषयी खबरदारी घेणे आवश्यक आहे. पासवर्ड कोणालाही न सांगणे, दुस-याच्या संगणकावरून व्यवहार न करणे, मालमत्तेविषयी सार्वजनिक साइट्सवर चर्चा न करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी वेबसाइटवरून बँकेचे व्यवहार न करणे या सर्व गोष्टी पाळायला हव्यात. योग्य खबरदारी घेतल्यास घरबसल्या पैसे वाढवण्याचा हा सोयीचा मार्ग तुम्ही वापरायला काहीच हरकत नाही.

टीप - सदर लेख शेअर्स खरेदीविषयी नसून त्यासंबंधीच्या ऑनलाइन पद्धतीबद्दल आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.