आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhagyashree Pethkar's Artical On Vijay Rajadhyaksha Interview

स्त्रीवादी साहित्य सामर्थ्य, स्त्री प्रतिमावरील परिसंवादाने गाजले संमेलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रसिकांच्या पसंतीला उतरले
कथा कथनाचे वेगळे रूप :
विदर्भ साहित्य संघ आणि आधार या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय लेखिका संमेलन नुकतेच 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2013 रोजी पार पडले. दोन दिवसांच्या या संमेलनात ‘मी आणि माझे लेखन’, ‘स्त्रीवादी साहित्य-सामर्थ्य आणि मर्यादा’,‘दृक्श्राव्य माध्यमातील स्त्रीप्रतिमा’ इत्यादी स्त्रीजीवनाशी निगडित विविध विषयांवरच्या परिसंवादांनी संमेलन गाजले. त्याचबरोबर नेहमीच्या कथाकथन या कार्यक्रमाला वेगळे रूप देत अनुभवकथन हा कार्यक्रमदेखील रसिकांच्या पसंतीला उतरला. विजया राजाध्यक्षांच्या प्रकट मुलाखतीनं अख्ख्या संमेलनाला खूप उंच दर्जा बहाल केला.
प्रख्यात साहित्यिकांची उपस्थिती व रसिकांची तुडुंब गर्दी :
सा-याच कार्यक्रमाला महाराष्‍ट्रातील प्रख्यात साहित्यिकांची उपस्थिती आणि त्यांच्यासाठी तुडुंब असलेली रसिकांची गर्दी कार्यक्रमांच्या यशस्वितेची एक पावती होती. तरीही या सर्वात गाजला तो ‘दृक्श्राव्य माध्यमातील स्त्रीप्रतिमा’ हा परिसंवाद! ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या अध्यक्षतेत स्मिता तळवलकर, मोहिनी मोडक व डॉ. सुनीता देशमुख यांचा सहभाग होता. हा परिसंवाद म्हणजे संमेलनाचा प्राण होता. दृक्श्राव्य माध्यमातील नुसत्या दूरचित्रवाणीचाच विचार केला तरी तो आज कळीचा मुद्दा ठरलेला आहे. या माध्यमाचं अन् स्त्रीचं एक घनिष्ठ नातं जुळलेलं असल्याने हा महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरला. आधीच्या दोन्ही वक्त्या माध्यम अभ्यासक डॉ. सुनीता देशमुख आणि मोहिनी मोडक यांनी स्त्रियांची विकृत प्रतिमा निर्माण करीत असल्याबद्दल माध्यमांवर तोंडसुख घेतले. आंतरराष्‍ट्रीय पातळीवर माध्यमामध्ये स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी युनेस्कोच्या अहवालानुसार किमान 75 वर्षांचा काळ लागणार आहे. भारतात त्यापेक्षा जास्त काळ लागेल, असं मोहिनी मोडक यांनी सांगितलं.
जिच्या हाती रिमोटची दोरी...
स्मिता तळवलकर आणि लालन सारंग
यांचे सडेतोड विचार :
श्रोत्यांना खरे आकर्षण मात्र स्मिता तळवलकर आणि लालन सारंग यांच्या बोलण्याचे होते. त्या काय बोलतात याबद्दल प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता होती. परंतु स्मिता तळवलकर यांनी प्रतिहल्ला चढवण्याचा नुस्खा वापरला अन् परिसंवादाचा नूरच पालटला. कसली आली आहे स्त्रीप्रतिमा, असा थेट सवाल करीत ‘रिमोट तुमच्याच हाती असतो, तरीही टीव्ही बंद करण्याचे धाडस का दाखवले जात नाही? असेल हिंमत तर करा ना बंद... नव-याला भ्रष्टाचाराचा घाणेरडा पैसा घरात का आणू देता? त्या पैशात भारी साड्या अन् कानात हि-यांच्या कुड्या करता, त्याला नको म्हण्याची आहे का हिंमत तुमच्यात... ?’ असा खडा सवाल त्यांनी केल्यानंतर नव्वद टक्के महिलांनी व्यापलेल्या सभागृहात स्मशानशांतता पसरली. श्रोत्यांची अशी अनपेक्षितपणे दांडीच गुल केल्यानंतर पुढची सगळी खेळी तळवलकरांच्या हाती आली. आणि हे एकच क्षेत्र असे आहे का? सगळ्याच क्षेत्रांत विसंगती निर्माण झाल्या आहेत... असा आपला सूर आळवीत आपली सुटका करून घेण्याचा युक्तिवादही स्मिता तळवलकरांनी जोरकसपणे केल्याचे बोलले जात होते. आधीच थंड पडलेल्या श्रोत्यांना
नंतर त्यांनी आणखीनच गारद करून टाकले आणि तुम्हीच कशा दोषी आहात हे मत पद्धतशीरपणे रसिक-श्रोत्यांच्या मनावर बिंबवण्यात त्या यशस्वी झाल्या. दोष कुणा एकाचाच नाही हे खरे आहे, पण म्हणून तो मायबाप प्रेक्षकांचाच आहे असेही नाही, अशी संतुलित भूमिका अध्यक्षांनी घ्यायला हवी होती. परंतु परिसंवादाच्या अध्यक्ष लालन सारंग यांनीही स्मिता तळवलकरांचीच री ओढली. आपली प्रतिमा डागाळण्याचे कटकारस्थान आपणच आपल्या नकळत रचले आहे. नुसता बोलघेवडेपणा आणि आरोप करण्यात आपण स्त्रिया धन्यता मानतो. त्याहीपलीकडे जाऊन, आपली जबाबदारी काय आहे हे जाणून घेण्याचा स्त्रीला विसर पडत चालला आहे की काय, अशी परिस्थिती आज बघायला मिळते. माध्यमांनी ज्या प्रतिमेत डांबून स्त्रियांची अवहेलना केली, ती तुम्ही का विसरता, असे म्हणत लालन सारंग यांनी स्त्रीलाच काही प्रमाणात दोषी ठरवल्याची कुजबूज सुरू राहिली.
एक लाखावर पुस्तकांची विक्री / नागपूरकर प्रकाशकांच्या स्टॉलवर :
एकंदरीत सर्वच सत्रांना महिलांची लक्षणीय उपस्थिती, संमेलनस्थळी लावल्या गेलेल्या केवळ नागपुरातीलच प्रकाशकांच्या स्टॉलवरील एक लाखाच्या वर पुस्तकांची विक्री हे सगळे पाहू जाता या राज्यस्तरीय लेखिका संमेलनाने महिलांमध्ये एक पोषक असे वैचारिक मंथन घडवून आणले, यात वाद नाही.