आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाचिये गुंती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ध्यानधारणेच्या माध्यमातून मनरूपी वारूला स्थिरावून त्या स्थितीला चित्रकलेच्या माध्यमातून साकारणं तसं गुंतागुंतीचंच काम. मूळ अमरावतीच्या चित्रकार निशिगंधा गरतकर यांनी कलेतून व्यक्त होण्यासाठी हाच मार्ग स्वीकारला अन् त्यातच नैपुण्यही कमावलं.

रस्त्याने प्रवास करत असताना बऱ्याचदा आपल्याला ‘मनाचा ब्रेक; उत्तम ब्रेक’ अशी पाटी वाचायला मिळते. तर ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशी उपमा देऊन गुरू ठाकूरसारखा कवी या चंचल मनाचं वर्णन करतो. समर्थ रामदास म्हणतात, ‘मना अंतरी सार विचार राहो’, तर ‘कठोपनिषदा’मध्ये एक ‘रथरुपक’ वापरून वर्णन केलं आहे की, बुद्धिरूपी सारथ्याच्या हातून मनाचा लगाम सैल झाला की, इंद्रियरूपी घोडे उधळतात आणि रस्ता सोडतात. मग आत्मारूपी रथाचे अध:पतन होते. थोडक्यात, या चंचल मनाचं अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलं आहे. पृथ्वीतलावर कोणीही या मनाच्या वेगाशी स्पर्धा करू शकत नाही. परंतु मनाला… म्हणजेच क्षणार्धात मनात येणाऱ्या अगणित विचारांना विविध मार्गांनी ‘मॅनेज’ करण्यात यशस्वी झालेले काही लोक नक्कीच दिसतात. कलाकारांसाठी तर हा अतिशय महत्त्वाचा साधनेचा विषय. चित्त स्थिर असल्याशिवाय मनाजोगं काम करता येत नाही. गेली कित्येक वर्षं ध्यान, ध्यानधारणा, चिंतन अर्थात मेडिटेशन करून एका विशिष्ट टप्प्यावर या विषयाला आपल्या कलेच्या माध्यमातून मांडलं आहे चित्रकार निशिगंधा गरतकर हिने. अमरावतीतून तिने ‘आर्ट टीचर डिप्लोमा’ केला. त्यानंतर औरंगाबादमध्ये ‘मास्टर्स इन फाइन आर्ट‌्स’ ही पदवी संपादन करून तिने मुंबईतल्या ‘सर जे जे स्कूल ऑफ आर्ट‌्स’मध्ये ‘डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन’ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. घरी कुठल्याही प्रकारची चित्रकलेची पार्श्वभूमी नसताना तिने या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं.

निशिगंधाला कुठलीही सर्वसामान्य गोष्ट असली तरी ती स्वतःच्या दृष्टिकोनातून कशी दिसेल, ते साकारायला आवडतं. यासाठीच तिने ‘क्रिएटिव्ह पेंटिंग’ या विषयात स्पेशलायझेशन केलं. ‘शॅडो’, ‘निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी’, ‘मेडिटेशन’ अशा विषयांवर तिने कलाकृती निर्माण केल्या आहेत. गेली अनेक वर्षं निशिगंधा नियमितपणे ध्यानधारणा करते. ध्यानधारणेची ही प्रक्रिया नेमकी कशी असते, हे तिने तिच्या चित्रांमधून साकारायचा प्रयत्न केला. ध्यानधारणेची प्रक्रिया अमूर्त असते. तिला चित्ररूपात व्यक्त करण्यासाठी कुठल्या तरी मूर्त स्वरूपाची आवश्यकता असते. या वेळी अत्यंत प्रभावशाली अशा अजिंठा व वेरूळ लेण्यांमध्ये ज्या शिळा वापरल्या आहेत, त्याद्वारे व्यक्त होण्याचं निशिगंधाने ठरवलं. एका चित्रात तिने ‘अजिंठा-वेरूळ’ लेण्यांमधील शिळांचा पोत आणि मानवी शरीरातील अणुरेणू यांच्यातील साम्य दर्शवलं आहे. तिच्या या चित्राला ९५व्या वार्षिक कला प्रदर्शनामध्ये ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे ‘बेस्ट कम्पोझिशन’ विभागात श्रीमती प्रफुल्ला डहाणूकर पुरस्कार आणि ‘बेस्ट
क्रिएटिव्ह पेंटिंग’ विभागात कै. श्रीमती संध्या अमिल जांबुलकर पुरस्कार मिळाला.

अन्य एका चित्रात तिने ‘ध्यान’ करतानाचे टप्पे दाखवले आहेत. चित्राच्या सर्वात वर असलेला भाग हा मनात उद‌्भवणाऱ्या विचारलहरींचं प्रतीक आहे. पुढच्या टप्प्यात लंबगोलाकार भाग हा स्थिरत्व आणि विचारधारा या स्थितीचा क्रम दाखवत आहे. यातील उभ्या रेषा हे स्थिरचित्ताचं प्रतीक आहे. तर चित्राचा तिसरा भाग म्हणजे एक आडवी रेषा आहे. ती रेषा म्हणजे ध्यानधारणेचा परमोच्च बिंदू. केवळ स्थिरतत्त्वाची भावना. हे एकच चित्र तिने झिंक प्लेटवर प्रिंट मेकिंग आणि कॅनव्हासवर चारकोलचा वापर अशा दोन वेगवेगळ्या माध्यमांत केलं आहे. कॉलेजमध्ये असताना चारकोल या माध्यमाशी तिची ओळख झाली होती. दगडाचा पोत जसाच्या तसा साधण्यासाठी चारकोल या माध्यमाचा तिने उपयोग केला आहे. चारकोल म्हणजेच कोळशाची पावडर कापसाला लावून ती कॅनव्हासवर जिथे हवी तिथे लावावी लागते. हवेमुळे ही पावडर उडून चित्र खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे चित्र पूर्ण झालं की, त्यावर हेअर स्प्रे मारतात. यामुळे ती कोळशाची पावडर कॅनव्हासला चिकटून राहते.

द बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबई, ऑल इंडिया आर्ट एक्झिबिशन, पुणे, डॉ. रुक्मिणीबाई लाहोटी व कै. मथुराबाई लाहोटी पुरस्कार, उज्जैन असे अनेक पुरस्कार तिला मिळाले आहेत. तसेच ५३वे राज्य कलाप्रदर्शन, साउथ सेंटर झोन एक्झिबिशन, नागपूर, एलोरा येथील कलानगर या प्रदर्शनांमध्ये तिची चित्रे झळकली होती. तर लवकरच मुंबईतील कोपरखैरणे, ठाणे आणि नेहरू आर्ट गॅलरी या ठिकाणी तिच्या चित्रांची प्रदर्शनं सुरू होत आहेत.

‘या विषयात आणखी बरंच काम करण्याची इच्छा आहे. आजवर जे काही काम केलं ते माझे गुरू, आईवडील आणि सासरच्या मंडळींच्या पाठिंब्याशिवाय शक्य झालं नसतं. या क्षेत्रात स्वतःचं वेगळेपण सिद्ध करून उंच भरारी घेण्याचा मानस आहे,’ असं ती म्हणते.
(bhaktiathavale06@gmail.com)