आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोले तैसा चाले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजातल्या दुर्लक्षित घटकांकडे, अनिष्ट चालीरीतींकडे आपल्या कलेद्वारे लक्ष वेधून स्वतःच्या कृतीद्वारे नवा संदेश देणाऱ्या एक सजग कलाकार म्हणजे कोल्हापूरच्या वैशाली पाटील.
स्वतःतल्या कलाकाराला संपन्न करत असतानाच अध्यापन कार्याद्वारे अनेक विद्यार्थ्यांवर त्या कलासंस्कारही करत आहेत.

“एकदा शिकवणं म्हणजे दहा वेळा शिकणं” असे संस्कार ज्यांच्यावर लहानपणीच झाले, अशा प्राध्यापक वैशाली पाटील गेली पंधराहून अधिक वर्षं कला महाविद्यालयात नव्या दमाचे कलाकार घडवत आहेत. बहुतेकदा मुंबईत आलेली व्यक्ती कायमची मुंबईकर होते. पण वैशालीताईंनी मुंबईच्या सर जे. जे. कला महाविद्यालयातून ‘डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि मुंबईबाहेरच्या कलाशिक्षण संस्थांमध्ये अध्यापनाचं बहुमोल कार्य करण्याचं निश्चित केलं.

मुळात चित्रकलेकडे आणि त्यातही अध्यापनाकडे तुम्ही कशा वळलात, असं विचारता त्या म्हणाल्या, “आमच्या घरी चित्रकलेच्या क्षेत्रात थेट कुणी कार्यरत नसलं तरी माझ्या आईवडलांना कलेविषयी आस्था होती आणि पेशाने दोघेही शिक्षक होते. त्यामुळे त्यांच्यातल्या या दोन चांगल्या आणि मला आवडणाऱ्या गोष्टींचा मेळ घातला गेला असावा. कारण माझी चित्रकलेची आवड ओळखून माझ्या पालकांनी मला भरपूर प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी माझ्या आवडीला महत्त्व दिलं, त्यामुळे मी हे करू शकले.”

‘रचनाचित्र’ या विषयावर त्यांचं प्रभुत्व आहे. स्त्रीशक्तीचं महत्त्व जाणून तिचा गौरव करण्यासाठी त्यांनी भोवताली दिसणाऱ्या विविध समाजातल्या स्त्रिया आपल्या चित्रांतून साकारल्या. याविषयी सांगताना त्या म्हणतात, “सामान्यपणे पारंपरिक स्त्री म्हटलं की, राजस्थानी किंवा अस्सल मराठमोळी स्त्री आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. पण महाराष्ट्रातल्या लहान तालुक्यांमध्येही खूप विविधता आहे. त्यामुळे केवळ समाजातील संस्कृतीला लोकांपुढे मांडण्याऐवजी मी धनगर, गुराखी, बंजारन, आदिवासी, देवदासी अशा दुर्लक्षित समाजातल्या स्त्रियांना अधोरेखित केलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या काही रूढी आणि परंपरादेखील सर्वांसमोर आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. विविध यात्रा, कार्यक्रम, प्रवास, देवळं या ठिकाणी मी या स्त्रियांचं निरीक्षण करत असे. यातूनच ही चित्रं साकारली. या कष्टकरी स्त्रियांना मानाचं स्थान मिळवून देण्याचा माझा हा प्रयत्न!”

ही सर्व चित्रं वैशाली पाटील यांनी आपल्या स्वतःच्या शैलीत साकारली आहेत. रंग, पोत, रेषाप्रधान कम्पोझिशन्स यांच्या मदतीने त्यांनी स्वतःची चित्रभाषा तयार केली आहे. इतका नवनिर्मितीचा ध्यास असतानाच त्या कोल्हापूरच्या आर. गोसावी कला महाविद्यालयात प्राध्यापकपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. त्या म्हणतात, “हळूहळू पालकांचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. आपल्या पाल्याला कलेत करिअर करण्यासाठी त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार विज्ञान आणि वाणिज्य शाखेपेक्षा सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल ‘फाइन आर्ट‌्स’कडे आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. दोन वर्षांचा ‘एटीडी’चा (आर्ट टीचर डिप्लोमा) अभ्यासक्रम केल्यानंतर ग्राफिक डिझायनिंग, अॅनिमेशन, आर्ट डायरेक्शन असे अनेक पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे मुलांचा या अभ्यासक्रमाकडे कल वाढत आहे. परंतु असंही वाटतं की, ज्या वयात मुलं सर्वाधिक संस्कारित होतात, अशा लहान वयातच अगदी प्राथमिक शाळेपासून मुलांना चित्रकलेचं उत्तम प्रशिक्षण मिळालं पाहिजे. बऱ्याच शाळांमध्ये चित्रकलेचं कुठलंही प्रशिक्षण नसणारे, इतर विषय शिकवणारे शिक्षकच चित्रकला हा विषय शिकवत असतात. पण ‘बालकला’ हा विषय शासनाने अत्यंत गांभीर्याने हाताळावा, तरच भविष्यात उत्तम कलाकार घडण्यासाठी मदत होईल, असं वाटतं.”

मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी आणि आर्टिस्ट सेंटर या ठिकाणी त्यांच्या चित्रांची सोलो एक्झिबिशन्स आयोजित करण्यात आली होती; तर सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे ग्रुप एक्झिबिशनमध्येही त्यांचा सहभाग होता. गव्हर्नमेंट कॉलेज, नागपूर; कलामंदिर महाविद्यालय, कोल्हापूर; कलाविश्व महाविद्यालय, सांगली इ. अनेक ठिकाणी त्यांची चित्रं संग्रहित केली गेली आहेत. २०१३मध्ये ‘विमेन आर्ट फाउंडेशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोटस आर्ट शो’मध्ये त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे काही काव्यसंग्रह, दिवाळी अंक यांची मुखपृष्ठे वैशाली पाटील यांनी रेखाटली आहेत.

वैशाली यांची चित्रं आकर्षक आहेत. लक्ष वेधून घेणाऱ्या रंगांचा वापर, अनवट शैली आणि परंपरेवर भाष्य करून विचार करायला लावणारी चित्रे ही त्यांची वैशिष्ट्यं म्हणता येतील. ड्राय पेस्टल, अॅक्रिलिक रंग आणि शाईचा वापर करून ही चित्रं रंगवली आहेत. माणसाच्या संस्कृतीशी नाळ जोडणारी ही चित्रं पाहताना वेगवेगळे भाव अनुभवता येतात. काही चित्रं केवळ ती संस्कृती आपल्यापुढे उभी करतात, तर काही त्या विशिष्ट समाजातील कष्टकरी स्त्रियांचं जीवन अधोरेखित करतात. काही चित्रं रूढींवर भाष्य करतात. वैयक्तिक जीवनातही वैशालीताईंचा अनिष्ट रूढी पाळण्यावर विश्वास नाही. त्या म्हणतात, “एक कलाकार म्हणून, एक शिक्षिका म्हणून आणि एक स्त्री म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या ओघाने येतात, त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला मला आवडतात. पण केवळ कर्मकांडात अडकणं म्हणजे आपला वेळ फुकट घालवणं आहे. विज्ञानाचा आधार नसलेल्या निरर्थक गोष्टी करणं मी जाणीवपूर्वक टाळते. देवाची पूजा करायची असेल तर त्यासाठी मंदिरात जायची गरज नाही. मी तो वेळ माझ्या कलेसाठी देईन. त्या चित्रांच्या नवनिर्मितीला मी प्राधान्य देते. वेळ नाही, ही सबब कुठल्याच गोष्टीसाठी देता येत नाही. त्यामुळे या अशा अनावश्यक गोष्टी टाळल्या तर एक स्त्री म्हणून सगळ्याच बाजू समर्थपणे सांभाळता येतात.” समाजातल्या दुर्लक्षित घटकाकडे, अनिष्ट चालीरीतींकडे आपल्या कलेद्वारे लक्ष वेधून स्वतःच्या कृतीद्वारेही तोच संदेश देणाऱ्या वैशाली पाटील यांच्यासारखे कलाकार विरळाच!
(bhaktiathavale06@gmail.com)