आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhakti Athavale Writes About Art And Artists, Madhurima, Divya Marathi

आपलाही खारीचा वाटा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरी लहान मुलांना चित्रं काढायला प्रोत्साहन देणारे आपण ते मूल मोठं झालं, की मात्र त्याच्या हातातून रंग/ब्रश हिसकावून घेऊन पेन/कागद थोपवतो. मुलांना हौसेने आपण चिकणमाती आणून देतो, त्याचे आकार करायला शिकवतो; पण मोठं झाल्यावर ती माती फेकून देतो आणि त्याला अभ्यासाकडेच वळवतो. कला टाइमपाससाठी ठीक आहे; आधी अभ्यास कर, यावरच बहुतेकांचा जोर आणि भर असतो.

परंतु, कला नसेल तर आपलं आयुष्य रंगहीन होईल, त्यात आनंदाची अनुभूती घेण्याची सोयच राहणार नाही, हे विसरून चालणार नाही. कलेला आणि कलाकारांना आपली दाद, उत्तेजन, प्रोत्साहन द्यायलाच हवं; ते आपल्या सामाजिक आरोग्यासाठीही आवश्यक आहे, याच उद्देशाने हे नवीन पाक्षिक सदर आजपासून तुमच्या भेटीला येणार आहे. यातून काही नवीन कलाकारांची व त्यांच्या कामाची ओळख करून देण्यात येईल.

‘साहित्य संगीतकला विहीन: साक्षात्पशु पृच्छविषाणहीन:’ असं एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे. याचा अर्थ असा की, साहित्य, संगीत, कला यांची आवड नसलेला मनुष्य म्हणजे साक्षात शेपूट नसलेला पशूच होय! आपल्या भारत देशाला प्राचीन संस्कृती आणि भव्य इतिहास लाभला आहे. जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतसा मानव अनेक नवनव्या गोष्टी स्वीकारत गेला. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्या प्राचीन कलांमध्येही कालपरत्वे बरेच बदल होत गेले. त्यांचे स्वरूप बदलू लागले. परंतु ‘कला’ हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक राहिला.

भारतीय संस्कृतीत १४ विद्या आणि ६४ कला आहेत. यांपैकी अनेक कलांचा ‘दृश्यकला’ या प्रकारामध्ये अंतर्भाव होतो. उदा. चित्रकला. अगदी शब्दांचा जन्म होण्याआधीदेखील संवाद साधण्यासाठी ‘चित्र’ हे माध्यम वापरले जात होते. अजिंठा-वेरूळ लेणी, तिथल्या गुंफा किंवा प्राचीन मंदिरं यांसारख्या ठिकाणी आजही आपल्याला चित्रलिपी पाहायला मिळते. वर उल्लेखल्याप्रमाणे चित्रकलेचा प्रवासही वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत गेला. लोक स्वतंत्रपणे या कलेचा अभ्यास करू लागले. Landscape, abstract, portrait, still life अशा वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या. त्याचप्रमाणे शिल्पकलेचाही मोठा इतिहास आपल्याला लाभला आहे. पाषाण, तांबे, जस्त, सँडस्टोन, ग्रॅनाइट, टेराकोटा अशा अनेक माध्यमांद्वारे शिल्पकार व्यक्त होत असतात. ‘प्रत्येक शिळेमध्ये एक शिल्प दडलेलं असतं; आपल्याला फक्त त्यातला नको तेवढा भाग काढून टाकायचा असतो.’ असं सहजपणे म्हणणारे शिल्पकार मात्र प्रत्यक्षात फार मेहनतीने मूर्ती घडवत असतात.

आज संपूर्ण भारतभर पसरलेल्या अनेक कलादालनांमधून अर्थात आर्ट गॅलरीजमधून आपल्याला या कलांचा व्यासंग पाहता येतो. अनेक तरुण कलाकार या कलानगरीत उत्तम काम करण्यासाठी मेहनत घेत आहेत. अनेक भारतीय चित्रकारांनी काढलेली चित्रे, शिल्पकारांची शिल्पे केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही गौरवली जात आहेत. एखाद्या प्रसिद्ध आर्ट गॅलरीमध्ये आपल्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यासाठी ५ ते ७ वर्षं ‘वेटिंग’ म्हणजे प्रतीक्षेचा काळ आहे. आपल्या भावना, चिंतन, अभ्यास अशा अनेक अमूर्त गोष्टींना आपल्या प्रतिभेच्या जोरावर मूर्त स्वरूपात साकारायची किमया कलाकार साकारत आहेत आणि इतर कुठलाही धोपटमार्ग न स्वीकारता एका अनवट मार्गाने जाऊन आपला चरितार्थदेखील चालवत आहेत. एक रसिक म्हणून अशा या नव्या दमाच्या चित्रकारांचं, शिल्पकारांचं कौतुक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं ही आपली जबाबदारी आहे, असं वाटतं.

या दृश्यकलांकडे बऱ्याचदा एका पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिलं जातं. म्हणजे एवढी लाखभर रुपयांची चित्रं विकत घेणं आपलं काम नाही, असं ठरवून चित्रकलेकडे आपण पाठ फिरवतो. पण चित्र विकत घेऊ शकणारी मंडळी त्यांचं काम करतच आहेत की! आपण आपल्याला जमेल तसा खारीचा वाटा उचलू या! आपल्या आजूबाजूला चित्राची आणि शिल्पांची प्रदर्शनं भरतात, त्या वेळी आपण त्या प्रदर्शनांना भेटी देऊन कलाकारांचा हुरूप वाढवू शकतो. सण-समारंभाला एखाद्या उदयोन्मुख शिल्पकाराने साकारलेले शिल्प आपण भेट म्हणून देऊ शकतो. आपल्या घरातल्या लहानग्यांची चित्रकला केवळ ‘एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट’पर्यंत सीमित न ठेवता त्यांच्यात चित्रकलेविषयी आत्मीयता निर्माण करू शकतो आणि अर्थात… या लेखमालिकेद्वारे विविध गुणी कलाकारांची ओळख समस्त वाचकांना करून देऊ शकतो! या नव्या वर्षापासून आपण नव्या दमाच्या कलाकारांविषयी आणि त्यांच्या चित्रांविषयी जाणून घेणार आहोत.

कुठल्याही कलाकारातली कला बहरण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. राजाश्रय आणि लोकाश्रय. ‘दैनिक दिव्य मराठी’सारख्या मोठा वाचकवर्ग असलेल्या वृत्तपत्रामध्ये या कलाकारांना व्यासपीठ देऊन आपण लोकाश्रय मिळवून देण्याच्या कामात खारीचा वाटा उचलू शकतोच! चला तर मग एका नव्या दृष्टिकोनातून, नव्या जोमाने या ‘कलानगरी’मध्ये सामील होऊ या आणि आनंदाची अनुभूती घेऊ या!
(bhaktiathavale06@gmail.com)