आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परि सोडीना ध्यास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या गोष्टीचा ध्यास असेल तर मनुष्याला नवनवे मार्ग सापडत राहतात. ३४ वर्षांच्या अध्यापनानंतर निवृत्ती घेतली खरी, पण प्रा. अस्मिता जगताप यांची चित्रकलेविषयी ऊर्मी जराही कमी झालेली नाही.

मुक्तपणे व्यक्त होत अजूनही चित्रकलेच्या गुंजनात दंग असलेल्या अस्मिताताईंची
ही ओळख...
ए डगर देगास (Edgar Degas) या सुप्रसिद्ध फ्रेंच चित्रकाराने म्हटलं आहे की, Art is not what you see. But what you make others see. एखाद्या सामान्य गोष्टीचं सौंदर्य उलगडून दाखवण्याची किमया कलाकार करत असतो. कोल्हापूरच्या प्राध्यापक अस्मिता जगताप हाच वारसा पुढे चालवत आहेत. “एखादी गोष्ट जेव्हा मला माझ्या कलाकृतीतून व्यक्त करता येते, तोच माझ्यासाठी आनंदाचा क्षण असतो,” असं त्या म्हणतात.

प्रा. जगताप यांनी १९७५मध्ये कोल्हापूरच्या दळवी आर्ट इन्स्टिट्यूट या महाविद्यालयात फाइन आर्टचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. १९७७मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा चित्रकलेसाठी दिला जाणारा राज्य पुरस्कार मिळाला. निसर्गाविषयी प्रेम असणाऱ्या अस्मिताताईंनी या चित्रासाठी नेहमीपेक्षा वेगळा विषय निवडला होता. समुद्राच्या तळाशी निर्माण होणाऱ्या शिंपल्यातल्या मोत्याबाबत आपल्याला आकर्षण असतं. त्यांनी ही मोती तयार होण्याची प्रक्रिया कलात्मक पद्धतीने आपल्या चित्रात मांडली होती. या चित्राबाबत त्या सांगत होत्या, “समुद्राच्या तळाशी शिंपला कसा तयार होतो, ही प्रक्रिया वैज्ञानिकदृष्ट्या अनेकांना माहीत असेल. पण ती कलेच्या अंगाने दाखवायचं मी ठरवलं आणि या चित्राला असा पुरस्काराच्या माध्यमातून उत्तम प्रतिसाद मिळाल्याने नंतर मी या विषयावर चित्रमालिका तयार केली. त्याचं प्रदर्शन मुंबईच्या ‘जहांगीर आर्ट गॅलरी’मध्ये भरवलं.”

कला महाविद्यालयामध्ये ३४ वर्षं शिकवताना त्यांनी कित्येक विद्यार्थी घडवले. अस्मिताताईंनी २०१०मध्ये निवृत्ती घेतली. केवळ स्वतंत्रपणे कलाकार म्हणून आपली कारकिर्द घडवण्यापेक्षा अध्यापनाद्वारे भविष्यातले अनेक कलाकार घडवण्याला त्यांनी पसंती दिली. त्या म्हणतात, “कुठल्याही प्रकारे कलेशी संबंध राहणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं आणि शिकवण्यातून मला खूप समाधान मिळत असे. मी ती प्रक्रिया आनंदाने करत असे. त्यामुळे मी ‘कला प्राध्यापक’ म्हणून काम करण्याचा पर्याय स्वीकारला. शिवाय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकाला जी तयारी करावी लागते, त्यातून मी समृद्ध होत गेले. प्रत्येक विद्यार्थ्याचा एकाच विषयाकडे बघण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो, तोही आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतो. त्यामुळे शिकवताना मीसुद्धा बरंच काही शिकले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या कॉलेजच्या वाचनालयात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध चित्रकार व्हॅन गॉग, गोगा, फेझा यांची पुस्तकं मी वाचली. त्यातून मला कंपोझिशन, कलर अँड अॅप्लिकेशन यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याचा उपयोग मला माझी कला अधिक उत्तम करण्यासाठी झाला.”

‘बॉम्बे आर्ट सोसायटी, इंडिया’चा दलाल राष्ट्रीय पुरस्कार, ‘फ्युएल इंस्ट्रुमेंट्स अँड इंजिनियर्स फाउंडेशन’तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार, रोटरी संस्थेतर्फे ‘आय लव्ह माय इंडिया’ या संकल्पनेवर आधारित घेतल्या गेलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या चित्रकला स्पर्धेत प्रथम पारितोषिक, टॉम अँड बे ट्रॉफी, अभिनव कला विद्यालय, पुणे इ. अनेक पुरस्कार अस्मिताताईंच्या नावावर जमा आहेत. शाहू स्मारक भवन- कोल्हापूर, तरुण भारत स्टेडियम हॉल- सांगली, बाळकृष्ण सभागृह- इचलकरंजी या ठिकाणी त्यांची एकल चित्रकला प्रदर्शने संपन्न झाली आहेत; तर कला अकादमी- गोवा, जहांगीर आर्ट गॅलरी-मुंबई, बालगंधर्व आर्ट गॅलरी-पुणे, इंडिया आर्ट गॅलरी- पुणे, सी-साइड रोटरी कला- वाशी, मुंबई, शील एन्क्लेव्ह ऑल वुमेन्स शो-मुंबई या ठिकाणी सामूहिक चित्रप्रदर्शनात त्या सहभागी झाल्या आहेत.

फोटोग्राफी आणि चित्रकला या दोन वेगळ्या कला आहेत. त्यामुळे कुठलीही गोष्ट आहे तशीच्या तशी न दाखवता कलात्मक पद्धतीने ती साकारली गेली पाहिजे, असं त्या म्हणतात. सागरातील सौंदर्य उलगडणाऱ्या या चित्रमालिकेबरोबरच त्यांनी ‘ह्यूमन लाइफ’ आणि ‘ओंकार’ या विषयांच्या चित्रमालिका केल्या आहेत.

प्राध्यापकपदावरून निवृत्ती घेतल्यानंतर आता संपूर्ण वेळ केवळ स्वानंदासाठी; स्वतःला हव्या त्या विषयावर, हवं त्या प्रकारे, हवं त्या माध्यमातून व्यक्त होण्यात अस्मिताताई रममाण आहेत. सुप्रसिद्ध चित्रकार पाॅल गोगँ यांनी म्हटलंच आहे,
“If you see a tree as blue then make it blue!”
bhaktiathavale06@gmail.com
पुढाल स्लाइड्सवर पाहा, काही अप्रतिम पेंटिंग्स...
बातम्या आणखी आहेत...