आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुभवाधिष्ठित चित्रकला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नियतीने उभ्या केलेल्या परिस्थितीचं सोनं कसं करावं, याचा दाखला प्रसाद निकुंभ याची चित्र पाहिल्यानंतर मिळतो. ‘प्रिंट मेकिंग’सारख्या अनवट क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवू इच्छिणाऱ्या या कलाकाराची ही ओळख…
आपण लहानपणी काढलेलं निसर्गचित्र, आपली पहिली कविता, त्या चिमुकल्या बोटांमध्ये पेन्सिल धरून लिहिलेली कुडमुडी अक्षरं काही वर्षांनी पाहिली की, आपल्याला त्याचं कौतुक वाटतं. पण त्याबरोबर आपण काय हे बालिश केलंय, असा एक गमतीशीर भावही मनाला स्पर्शून जातो. बरं यासाठी फार मोठा काळ मध्ये जावा लागतो असं नाही; दर काही वर्षांनीसुद्धा असे विचार मनात येतात आणि हेच माणसाच्या प्रगल्भतेचं लक्षण आहे, असं म्हणता येईल. वाढत्या वयाबरोबर जसजशी अनुभवांची शिदोरी मोठी होत जाते, तसतसा हा अनुभव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या कलेमध्ये डोकावू लागतो आणि मग त्या वेळी खूप मोठा वाटणारा अनुभव आता मात्र इवलुसा वाटू लागतो. शिवाय या काळात आपल्या मनावर झालेले संस्कारही आपल्या कलाप्रतिभेत मोलाची भर घालतात.
मूळच्या नाशिक जिल्ह्यातल्या प्रसाद निकुंभची चित्रकलासुद्धा अशीच ‘अनुभवाधिष्ठित चित्रकला’ आहे असं म्हणता येईल. उपजीविकेसाठी घरी शिवणकामाचा पारंपरिक व्यवसाय असताना प्रसादच्या मनात मात्र चित्रकलेचे रंग भरले जात होते. लहानपणापासून कलाकुसरीच्या वस्तू, मेंदी, रांगोळी आणि चित्रकलेकडे ओढा असलेल्या प्रसादने औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयातून ‘बॅचलर ऑफ फाइन आर्ट‌्स’चं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मग मुंबईतील ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट‌्स’ या प्रतिष्ठित कला महाविद्यालयातून त्याने ‘प्रिंट मेकिंग’ या अनवट विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
‘प्रिंट मेकिंग’ (छापचित्रकला) हा चित्रकलेचा एक प्रकार आहे. तर वूड कट, इचिंग, फोटो इचिंग, लेथोग्राफ, इचिंग ऑन पेपर हे प्रिंट मेकिंगचे प्रकार आहेत. यापैकी ‘इचिंग ऑन पेपर’ ही प्रसाद निकुंभची खासियत. ‘इचिंग ऑन पेपर’ यामध्ये झिंक, ब्रास, कोपर, लोखंड यापैकी कुठल्याही एका धातूपासून तयार केलेल्या प्लेटवर मेणाचा थर दिला जातो. त्यानंतर सुईने त्या मेणाच्या थरावर चित्र कोरले जाते आणि ही प्लेट काही काळ नायट्रिक आम्लात बुडवली जाते. त्यानंतर त्यावर लावलेला मेणाचा थर रॉकेल किंवा पेट्रोलने स्वच्छ करतात. त्यानंतर मग पेंटिंगसाठी वापरली जाणारी इंक बरोबर त्या चित्राच्या खाचेत जाऊन बसते. मग एक तासाभरासाठी एक कागद पाण्यात बुडवून ठेवला जातो. मग तो कागद इचिंग प्लेटवर पसरवतात. या कागदातल्या बाष्पामुळे प्लेटवरचे रंग कागदावर उतरायला मदत होते. प्रिंट काढण्यासाठी मशीनचं प्रेशर प्लेटच्या जाडीनुसार सेट केलं जातं आणि त्या चित्राची प्रिंट काढली जाते. त्यानंतर या मूळ चित्राच्या अनेक प्रती काढता येतात. ‘इतक्या क्लिष्ट प्रक्रियांवर आधारित आणि मोठी आर्थिक गुंतवणूक असलेल्या कलेची चरितार्थाचा मार्ग म्हणून निवड करताना भीती नाही का वाटली?’ असे विचारताच प्रसाद म्हणाला की, भीती नक्कीच वाटत होती. प्रिंट मेकिंगची ही कला अवगत करण्यासाठी तंत्रज्ञानाचं सखोल ज्ञान आवश्यक असतं. थिअरीच्या ज्ञानाला प्रत्यक्ष कामातून मिळालेल्या ज्ञानाची जोड देऊन मी ही कलासाधना करण्याचं ठरवलं.
प्रसादने प्रिंट मेकिंगच्या अनेक प्रशिक्षण वर्गांना हजेरी लावली आहे. त्याचबरोबर समाजाप्रती असलेल्या आपल्या ऋणाची जाण ठेवून त्याने २०१५मध्ये ‘प्रिंट डे इन २ मे’ या उपक्रमाअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील मुलांना कुठलाही मोबदला न घेता ‘प्रिंट मेकिंग’ या कलेचे प्राथमिक धडे दिले. संपूर्ण जगभरातून अनेक कलाकारांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज केले होते. त्यातून प्रसादची निवड झाली होती.
प्रसादच्या चित्रावर त्याच्या शिवणकाम या परंपरागत व्यवसायाचा फार मोठा पगडा आहे. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये काही चढ-उतार आल्यानंतर इतर मार्गापेक्षा आपल्याकडील पारंपरिक समृद्धीचा ठेवा जोपासून आपल्या शिवणकामाच्या व्यवसायातच जम बसवून आपली उपजीविका करू, या निष्कर्षावर निकुंभ कुटुंब आले. या अनुभवातून प्रसादच्या ‘I found my place’, ‘Want to go’ या चित्रांची निर्मिती झाली. सुरुवातीला कापडाचा एकच आकार घेऊन प्रसादने चित्रश्रुंखलेची निर्मिती केली. परंतु काही काळानंतर आणखी काही अनुभव गाठीशी जमा झाले, घरातील बेताच्या आर्थिक परिस्थितीशी पुन्हा एकदा सामना करावा लागला आणि हे अनुभव माझ्यातल्या कलाकाराला खूप काही शिकवून गेले, असं प्रसाद सांगतो. आपल्या या पारंपरिक व्यवसायाच्या धुरेला कलेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर कसे नेता येईल, याचा विचार करून प्रसादने ‘Fantasy Vision’, ‘Mannequin’ या चित्रांची निर्मिती केली.
लाटव्हिया, ब्राझील, इटली या देशांमधील सामूहिक चित्रप्रदर्शनांमध्ये प्रसादची चित्रे विराजमान झाली आहेत. त्याचप्रमाणे भारतातील अनेक चित्रप्रदर्शनांमध्येही त्याचा सहभाग होता. ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया,’ द बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे दिले जाणारे ‘कै. गोपाळकृष्ण मेमोरियल ट्रस्ट फंड अवॉर्ड फॉर ग्राफिक्स’, ३३व्या मॉन्सून आर्ट शोमध्ये बेंद्रे फाउंडेशनचे प्रथम पारितोषिक यांसारखी अनेक पारितोषिके आणि पुरस्कार त्याच्या नावावर जमा आहेत. प्रिंट मेकिंगच्या क्षेत्रातल्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिग्गजांचा सहकारी म्हणून प्रसाद निकुंभ याने काम केले आहे. तर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, अगरवाल आर्ट फाउंडेशन, वडोदरा यांच्या संग्रहात प्रसादच्या चित्रांनी जागा मिळवली आहे.
गावाकडे पक्ष्यांना घाबरवण्यासाठी शेतात उभारलं जाणारं ‘बुजगावणं’ आणि शहरात कपड्यांच्या दुकानांमध्ये उभारले जाणारे पुतळे यावर भाष्य करणारी कलाकृती ‘बुजगावणं,’ कचरा वेचणाऱ्या लोकांना दिली जाणारी हीन वागणूक आणि बालमजुरीची बळी ठरणारी कोवळ्या वयातील मुलं यांची व्यथा स्पष्ट करणारं ‘prohibited’ हे चित्र, तर शिवणकामाच्या परंपरागत व्यवसायाला झुगारून देण्याचा प्रयत्न केल्यानंतर कुटुंबाला ज्या हलाखीच्या परिस्थितीतून जावं लागलं ती दाखवणारं ‘Tradition’ हे चित्र यांसारखी अनेक चित्रे प्रिंट मेकिंगच्या माध्यमातून उत्तमरीत्या साकारली आहेत.
परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते, असं म्हणतात. पण आहे त्या परिस्थितीचं सोनं कसं करावं, याचा दाखला प्रसाद निकुंभ याची चित्रे पाहिल्यानंतर मिळतो. प्रिंट मेकिंगच्या क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करण्याचा ध्यास घेतलेल्या प्रसादला त्याच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा!
भक्ती आठवले, औरंगाबाद
bhaktiathavale06@gmail.com